इटालियन लजानिया
जमलं.. जमलं... आज जमलं..
खूप दिवसांची इच्छा होती करून बघायची, पण कधी साहित्याची कमतरता तर कधी वेळेची...
आज सग्गळ जुळून आलं, पेशन्स सकट...
पण जाम घाम काढते ही डीश...हुश्श.. सुरवात करते....
लजानिया ही एक फुल मिल डीश आणि इतकी इतकी टेस्टी आहे कि बस्स..
हव्या त्या भाज्या, व्हाईट सॉस, टोमॅटो ग्रेव्ही, चीझ हे सर्व एकावर एक रचून बेक करायचे...
ज्यातील घटकपदार्थांमुळे रसना तृप्तीसोबतच खूपशा भाज्याही पोटात जातात.
पण अर्थात चीझचे प्रमाण जास्त असल्यामुळे वन्स इन अ ब्ल्यू मून... फाईन..!!
( तसंही उद्याच वर्कआऊट अर्धा तास जास्तीच असेल..)
साहित्य आणि कृती
महत्त्वाचे साहित्य :लजानिया शीटस्
लेअरींग प्रमाणे साहित्य बघू...
*१) स्टर फ्राईड भाज्या*
साहित्य- लाल-पिवळी-हिरवी सिमला मिरची, बटन मशरूम,ब्रोकोली,गाजर, पालक, बारीक चिरलेला कांदा, बटर, मिरेपूड,चिली फ्लेक्स,मिक्स हर्बज् ,तेल,मीठ
कृती -
गाजर किसून घ्यावे.
* पालक धुवून बारीक चिरून घ्यावा.सर्व शिमला मिरची बारीक चिराव्यात.
* पॅनमध्ये तेल गरम झाले कि बटर टाकावे, कांदा घालावा, चांगला परतून घ्यावा.
* आधी मशरुमस् , मग गाजर,मग पालक परतावा,शिमला मिरची ऍड कराव्यात आणि ब्रोकोली घालून परतून घ्यावे.
* मीठ,मिरे पूड, चिली फ्लेक्स,मिक्स हर्बज् घालून मोठ्या आचेवरच परतून घ्यावे.
* एका भांड्यात काढून बाजूला ठेवून द्यावे.
*२) टोमॅटो ग्रेव्ही*
साहित्य- ३-४ मोठे टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, भरपूर लसूण बारीक चिरलेला, चिली सॉस, टोमॅटो सॉस,मिक्स हर्बज्,चिली फ्लेक्स,मीठ,साखर,तेल
कृती-
*टोमॅटो ब्लांच करून घ्यावेत, नीट बारीक चिरून घ्यावेत.
* तेल तापले कि लसूण मस्त लालसर परतावा, कांदा छान परतून घ्यावा.
* टोमॅटो घालावेत,परतत परतत मिक्स हर्बज्, चिली फ्लेक्स,मीठ,साखर, चिली सॉस, टोमॅटो सॉस घालून मिश्रण रटरटू द्यावे... गरजेप्रमाणे पाणी घालून सरबरीत ग्रेव्ही बनवून घ्यावी.
* एका भांड्यात काढून बाजूला ठेवावी.
३) व्हाईट सॉस
२ चमचे मैदा, ७-८ चमचे बटरमध्ये खमंग भाजून घ्यावा.
सावकाश..थोडे थोडे दूध मैद्यात मिसळावे.
शिजू द्यावे.सतत हलवत रहावे.
उकळी फुटल्यावर चीझ मिक्स करावे.आच बंद करावी.
मेल्ट झालं की सॉस तयार...
लजानिया शीटस् उकळत्या पाण्यात टाकून २-३ मिनिटे झाकून ठेवाव्यात. नंतर पसरून ठेवाव्यात.
झाले..
आता लेअरींग ला सुरुवात करू.
लेअरिंग:
* ओव्हन १८०-२००°सें १५-२० मिनिटे प्रीहीट करावा.
* चौकोनी आणि साधारणपणे २" डेप्थ असलेल्या ट्रे ला किंचित बटर चोळून घ्यावे.
*सर्वात आधी टोमॅटो ग्रेव्ही लावून घ्यावी, लजानिया शीटस् पसरावेत,त्यावर भाजी पसरावी,मग ग्रेव्ही ,त्यावर व्हाईट सॉस पसरावा.
* त्यावर शीटस् पसराव्यात,आणि परत वरची कृती रिपीट करावी.
* साधारणपणे ३ लेअरनंतर चीज पण ऍड करावे.(घालावे)
* पेरभर उंचीची जागा ठेवून लेअरींग पूर्ण करावे.
* यावर सगळीकडे व्यवस्थित चीझ पसरावे. किचन फॉइलने ट्रे कव्हर करुन घ्यावा.
* १९०°सें वर १५-१७ मिनिटे बेक करावे.
* नंतर फॉइल काढून ७-८ मिनिटे परत बेक करावे...
सुंदर ब्राउन कलर येतो चीझला...
* थंड होऊ द्यावे.
* कट करून सर्व्ह करावे.
* लजानिया-द-इटालिआना... तय्यार!!
जयश्री खराडे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा