Thursday, March 14, 2019

दणदणीत धपाटे

दणदणीत धपाटे

अहो !
काय ?
भाजणीचं पीठ संपलंय ,धपाटे कशी करणार ! माझ्या पाठीवर ...
काय...? काय म्हणाला...? पाठीवर ?अहो ...त्याने काय पोट भरणारंय थोडंच !
" जाऊ दे नंतर करू !
"पोरानं मागितलंय आणि त्याला मिळालं असं होतंच नाही. खानावळीचं खाऊन खाऊन तोंड बेचव झालं असेल आणि मेलं पीठ नेमकं संपलं!"
"थांब ,धपाटेच पाहिजेत ना ! मग बिनधास्त राहा.तुझ्या लाडक्याला ते मिळतील .तू आता काय केलंय !"
"मी ,चपात्या भाजी वरण भात श्रीखंड ." "तू जा इथून .नको ते सांगू नको धपाटे झालेल्यावर बोलवतो."

💠साहित्य:
🔸तीन चार गरम गरम चपात्या मिक्सरमध्ये बारीक केल्या .अगदी बारीक .मस्त दिसत होत्या .मेक अप केलेल्या चेहऱ्यासारख्या! एका ताटात ते मिश्रण ओतले . त्यात
🔸बारीक चिरलेला कांदा
🔸कोथिंबीर
🔸ठेचा /लाल तिखट
🔸हळद
🔸मीठ
🔸वोवा पावडर
🔸कसूरी मेथी आणि
🔸बेसन पीठ थोडंस तेल टाकून.

💠 कृती :किंचित पाणी टाकत टाकत मिश्रण चांगलं मळून घेतलं .थोडं सैल ठेवलं. पाचसात मिनिटात बाकी पाक सामग्री सज्ज केली. ऐन वेळी कोणतंही क्षेपणास्र लागू शकतं.शत्रूला सांध नको .पीठ एवढ्यात चांगले भिजले होते. पोळपाटावर थापता येईल असे ! तवा गॅसवर मंद आचेवर होताच पोळपाट ,ओले फडके ,तेल व बाकी आवश्यक साहित्य हाताशी घेतले. हाही एका अर्थाने पाक सर्जिकलच ! पहिला गोळा फडके ठेवून पाण्याचा हात घेऊन पोळपाटावर मस्त थापला.मध्ये व साईडला बोटाने छिद्रं पाडली .तव्याचा अंदाज घेतला .तेलाचा शिडकावा दिला आणि फडके उचलून बरोबर मध्यभागी धपाटे तव्यावर उतरवले .पहिले क्षेपणास्र तर डागले . कडेने तेलाचे अर्ध्य दिले आणि वर झाकण ठेवून धपाट्याने जणू समाधी लावली .सूर लावून एकेका स्वराची विलंबित आळवणी करावी तशी गॅस सीम करून वाफेवर धपाटे मस्त भाजून घेतले .

आता वाफेने सीमा ओलांडली होती . "अहो , काय मस्त खमंग सुगंध!" माजघरात व्यापून राहिला होता. एवढ्यात माग काढत काढत हॉलमध्ये बसलेली ही आवडती धारावाहिक पाहण्याचं खंडित करून सुगंधाच्या वासानं प्रवेश करून म्हणाली , "शेजाऱ्यांकडून आणलं की काय पीठ ?" मला तरी हे का सहन व्हावं ? "नाही." "माझ्या अडाणी आईची ही दणदणीत धपाटी आहेत ती मला सहलीला जाताना अशाच घाऱ्या,धपाटी करून द्यायची .अडाणी होती पण कोंड्याचा मांडा करून घालायची." अबोल ...........तिकडून उत्तराची अपेक्षा महत्त्वाची नव्हती .!!! "बरं ते जाऊ दे ! तिखट मीठाला कसं झालंय ते बघ." खा तुम्हीच ! हेही उत्तर नवीन नव्हते पुढं काय झालं असेल ते नवरा म्हणून बिचारे नवरे जाणतातच .
बाकी राहिलेली ताटालील मंडळी धपाधप तव्यावरून भोवल्यावरून नवरानवरी फिरवून आणावीत तशी सन्मानाने फिरवून आणली आणि ताट भरले. दही ,काकडी ,लालबुंद रसरसते बीठ ,गोड चिंचेचा कोळ .एक भाजका पापड .लोणच्याची फोड ताजा हाताच्या बुक्कीत फोडलेला कांदा , झीरो नंबरची शेव व साईडला शुभ्र लवणाची चिमूटभर रास ! काय सुटले ना तोंडाला पाणी ! हो छानच झालंय ! शेजारीण आजी म्हणत होत्या ...। काय? "आहो बाई ,आद काय तांदाभद्दीचा बेत हाय वातथं !" "नाही नाही ! हो हो ! ह्यांना वेळ असला की करतात हे त्यांच्या आईने शिकवलेली दणदणीत धप्पाटी.." मला टोमणा लागूनही लागला नाही .... (नेहमीच नवऱ्याने असेच वागावे म्हणजे नामोहरम होण्याचा, अर्ज, विनंत्या ,समेट ,तहाचा प्रश्न येत नाही.)
हो, दंतपंक्ती गमावून बसल्यामुळे अशी थ फ ची हवादार बाराखडी शेजारच्या आजी हमखास बचाळी नसेल तेव्हा ऐकवतात. "अहो खरंच छान झालेत .अगदी शेजारच्या आजीने ही खावीत अशी लुसलुसीत !" "मग एक काम कर हे शेवटचं गरम गरम आजीला देऊन ये बचाळी नाही घातली तरी चालेल." "असं तू काही म्हणू नकोस. मग देऊन आल्यानंतर तू आणि लाडका खा.पण हो माझ्या लाडकीलाही ठेव आता येईलच कॉलेजातून आवडतात तिला " आणि एक विशेष, ही धपाटी रागक्षामक व अनुरागवर्धक आहेत.
चेहरा फुलला .ओठांनी जागा स्मितभर घेतली रागाचा अनुराग झाला. हे बरे!
आपणही अजमावून पाहावेत!
साधे सोपे खमंग!
रुचकर खाऊ पोटभर !
खमंग दणदणीत धपाटे!

काकासाहेब वाळुंजकर 🙏

धन्यवाद!
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा