Tuesday, February 27, 2018

अनोखे नूडल्स

काही महिन्यांपूर्वी एक ध्वनीचित्रफीत सतत पहायला मिळत होती.शस्त्रक्रिया सुरु आहे.डॉ. त्या रुग्णाच्या अन्ननलिका कट् करतात..त्यातून नूडल्स जशाच्या तशा बाहेर येतात...

इतकं भयानक वाटत होतं ते पहायला.. माझ्या मुलांना मी तो विडीओ दाखवला...

नूडल्स खाणं बंद करा..

हे सांगायची गरजच पडली नाही मला...

चांगलं गूळपीठ आहे दोघांचं...

निर्णय ठाम झाला त्यांचा...

नूडल्स वर बहिष्कार..

पण नूडल्स खायला मिळत नाहीत.. ही खंत सतत बोलण्यात जाणवत होती..

काहीतरी शक्कल लढवावी ,असं वाटत होतं..
मग मी रव्याच्या नूडल्स करायचा प्रयत्न केला..जरा कडक झाल्या..
बेसनपीठाच्या ही आवडल्या नाहीत..

मग ज्वारीच्या पीठाच्या करता येतायत का हए पहायचं ठरवलं..पूर्वी तसं कुठंतरी वाचल्याचं स्मरत होतं...
करून पहायचंच..असं ठरवलं..
आणखी एखादा प्रयोग वाया जाईल..यापेक्षा काय होणार?

मग भाकरी करताना जसे ज्वारीचे पीठ मळतो तसे मीठ घालून मळले.

शेवेची ताटली सो-याला लावली..
मोदकपात्राला तेल लावून त्यावर शेवेसारख्या नूडल्स पाडल्या.एकावर एक रचलं नाही मात्र..

असे दोनतीन मोदकपात्रं करुन घेतलं.

छान झाले.. अजिबात चिकटलं नाही..

भरपूर कांदा ,टोमॅटो चिरले.
कांद्याची पात बारीक चिरली.
कोबी एकदम पातळ , लांबसडक चिरून घेतला.
गाजर कीसलं..
सगळे जिन्नस छान परतून ,वाफवून घेतले.आलं-लसूण भरपूर प्रमाणात वाटून घातलं त्यात..

मीठ, किंचीत तिखट घातलं.
थोडे नूडल्स आणि थोडं भाज्यांचं मिश्रण  परत एकदा गरम केलं..
एका वाडग्यात घेतलं..त्यावर टोमॅटो सॉस , कोथिंबीर पेरली..
काटेरी चमचा दिला..

हे नूडल्स आता पोटात साठून नाहीत ना राहणार... याची खात्री झाली की चिरंजीव गाऊ लागले..

आई माझा गुरू..

आई कल्पतरू....

एक उणीव जाणवत होती.
हॉटेलमध्ये चकाकणारे नूडल्स मिळतात...हे घरी बनवलेले नूडल्स चकचकीत नव्हते..
शिवाय भूकंप झाल्यागत होते...
मग

काही वेळा हा प्रयोग केल्यावर लक्षात आलं...
ज्वारीच्या पीठात पाणी घालण्यापूर्वी अंडं फोडून (कच्चंच) घातलं तर नूडल्स मऊसूत दिसतातही आणि चकाकतातही..

अगदी मुलांना फरक जाणवण्याइतपत.

बाहेर चायनीज खायला जाण्याची गरजच नाही उरली...

मग तर काय !!

आईचा भाव चांगलाच वधारला...

मुलांनी मला चायनाचं नागरिकत्व दिलं..

सविता कारंजकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

Monday, February 26, 2018

चकोल्या

चकोल्यांना वरणफळं असंही म्हणतात..
आम्ही वेगवेगळ्या प्रकारे चकोल्या करतो..
१.कणीक घट्ट मळली की कणकेचे गोळे पोळपाटावर लाटून पट्ट्या कापून..
२. घट्ट कणकेचा बोराएवढा गोळा अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये ठेवून दाब द्यायचा..मात्र हाताला तेल भरपूर लावूनच..आणि अशाप्रकारे सगळ्या कणकेचे करून ते शिजवायचे.
३.पट्ट्या कापून शिजवण्यापूर्वी फोडणीत बारीक चिरलेली शेपूची भाजी घालायची....
अप्रतिम चव येते...
४.हिरव्या मिरचीच्या चकोल्याही सुंदर लागतात...
मात्र मिरचीचे पोट फाडून एका मिरचीचे दोन तुकडे करून घालायचे..या चकोल्यांना रंग फार छान येतो
सविता करंजकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

फणसाची भाजी

🔷फणसाची भाजी🔷

कोकणातून आलेला फणस ,
ह्या हंगामात मिळालेला पहिलाच फणस, ज्याला कुवरी म्हणतात.  फणस चिरणे हे मोठे कष्टाचे, त्याचे लहान तुकडे करुन घेणे, कुकरमध्ये थोड पाणी घालून उकडून घेण, आवडत आसल्यास शेंगदाणे भिजत घालून तेहि उकडून घ्यावे ,2 कांदे  बारिक चिरुन घ्यावेत, उकडलेला फणस फोडि कुस्करुन घ्याव्या, त्यामध्ये तिखट, हळद, मिठ टाकून सगळं एकत्र करून घ्यावे ,
कढईत तेल गरम करावे त्यामध्ये राई टाकावी , सफेद तिळ टाकावे,  तडतडल्यावर हींग टाकावा त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून पारदर्शक होईपर्यंत परतणे, उकडलेले शेंगदाणे व भाजी घालुन व्यवस्थित परतणे,  चवीपूरता गुळ घालावा, फणस उकडताना घातलेल पाणी असेल तर ते घालून परतणे , थोडावेळ झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी, वरुन ओल खोबरे घालावे

वंदना मानकीकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

टीप:-डॉ.वृंदा कार्येकर

फणसाच्या भाजीत वालाची डाळ घालून  हिरवी मिरची व भरपूर नारळ घातला की भाजी तयार . गूळही घालते मी .छानच लागते .सध्या सुरू झालेत फणस करायला हरकत नाही .
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

कुवऱ्याची अजून एक पद्धत.
कुवरा म्हणजे कच्चा लहान फणस.

शक्यतो विळीला गोडे किंवा खोबरेल तेल लावून (खूप नाही) आणि हाताला देखील तेल लावून, फणसाचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. अगदी पातळ नको. विळीवरच सालं तासावीत. सरसर तुकडे होतात. थोडे धुवून, कापं बुडतील इतक्या पाण्यात चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून उकडून घ्यायची. साधारण 5 ते 7 मिनिटात शिजतात.

सगळं पाणी निथळून उकडलेली कापं छोट्या दगडाने (लसूण चेचायच्या) चेचून घ्यायची. लगदा करायचा नाही.
साधारण एक कांदा बारीक चिरून, 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या कापून, मोहरीची फोडणी करायची, आवडत असेल तर थोडा हिंग घातला तरी चालेल. चेचून घेतलेला फणस त्यात परतून, वर झाकण ठेवून एक वाफ काढायची. आदण उतरल्यावर त्यात थोडं खोबरं शिवरून टाकायचं.
ही भाजी चवीला अत्यंत सुंदर लागते. काहीजण पोह्यांसारखी डिश मध्ये घेऊन खातात. किंवा उकड्या तांदळाच्या पेजे सोबत या भाजीची चव बेस्ट लागते.

- उषा राणे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

स्वयंपाक घर-सविता करंजकर

स्वयंपाक घर...

खरंतर एक अशी प्रयोगशाळा आहे..

जिथं सगळ्या सख्यांच्या (आता मित्रही स्वयंपाकघरात सक्रिय आहेत तेव्हा त्यांचाही उल्लेख न विसरता करायला हवाय.) नवनवीन कल्पनांना पंख फुटतात.

पदार्थ सगळ्यात आधी देखणा दिसायला हवा.
माझा मुलगा म्हणतो..."आई, केलेले सगळे पदार्थ नीट वाढ..डोळ्यांना छान वाटतं"..
तर आधी डोळ्यांनी जेवणा-या खाबूमोशायांना  तो पदार्थ देखणाच दिसायला हवाय.

मग तो पदार्थ पोषणमूल्यवर्धक असावा.
त्यात करणा-याचं प्रेम असावं.

वाढतानाही तो तितक्याच प्रेमानं वाढला तरच तो अंगी लागतो..

मी कल्पनांच्या पंखांबद्दल बोलत होते...
तर झालं असं....

मला आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून मी बाहेरून घरी यायच्यावेळी आमच्या कन्यारत्नाने कांदेपोहे केले...
केले खरे...पण ना त्याला चव होती...ना रंग...ना ही ते योग्य प्रमाणात झाले होते..

दोनतीन जणांचे पोहे करायचे होते ते तिनं आठदहा जणांचे केलेले..
मीठतिखटही पुरतं नव्हतं...खाल्ले जाईनात...

एवढ्या पोह्यांचं करावं काय?

यक्षप्रश्न!!

मग तिला वाटलं..आई आता चिडणार..वैतागणार..

पण तिच्या या नकारात्मक कयासाला खोटं ठरवत माझ्या मधली सुगरण जागी झाली...

कुकरला बटाटे उकडून घेतले.आलं-लसूण-हिरवी- मिरचीचं वाटण करून बटाट्याची झणझणीत भाजी परतून घेतली..
पोहे एव्हाना थंड झाले होतेच..

त्यातला कडीपत्ता, शेंगदाणे, मिरच्या काढून टाकले.
हात ओला करून हाताने सगळे पोहे भरपूर मळून घेतले..
एकसारखा गोळा झाला. त्याचे आणखी छोटे छोटे गोळे करून घेतले..

पोळपाटावर तेलाच्या हाताने तो गोळा पुरीसारखा लाटून घेतला.त्यावर बटाट्याची भाजी पसरली.
नागपंचमीच्या दिवशी दिंडे करतो तसा आकार दिला..काहींना समोशाचा आकार दिला आणि कमी तेलात ते परतून घेतले  (शैलो फ्राय)..

नारळ आणि पुदिन्याची मस्त गोडसर चटणी केली..

गरमागरम मुलांना खाऊ घातले..
..
"आई,तू कश्ली भारीयैस गं!!"

मी जगातली बेस्ट शेफ असते अशावेळी..

सविता कारंजकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

पालक पराठा

साहित्य:
पालकाची जुडी, गव्हांच पीठ, मीठ, तेल, पाणी, पांढरे तीळ, हिरवी मिरची/ लाल तिखट, हळद, जिरं.
तुम्हाला हवं असल्यास लसूण आणि आलं घालू शकता.
कृती
पालक बारीक चिरून त्यात आलं आणि लसूण हिरवी मिरची घालून मिक्सर मधून वाटून घ्यावं. हे मिश्रण पिठात मिसळून त्यात तेलाचं मोहन, मीठ, तीळ, जिरं घालून मळून घ्यावं नंतर चपाती सारखं लाटून भाजून घ्यावं.
कृतिका शहा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

शेंगाची पोळी

🍪शेंगाची पोळी🍪

💠साहित्य

🔸दोन वाटी शेंगादाणे,
🔸एक वाटी गूळ,
🔸अर्धी वाटी साखर,
🔸चवीपुरते वेलदोडे(आवडत असल्यास) चार नग,
🔸गव्हाचे पीठ एक वाटी,
🔸मीठ,
🔸तेल,
🔸मैदा पाव वाटी.

💠कृती

🔸प्रथम शेंगदाणे भाजून थंड करून टरफल काढून घ्यावे.
🔸नंतर मिक्सर मध्ये शेंगादाणे,गूळ बारीक करावे.
🔸कूट बारीक करावा.
🔸साखर व वेलदोडे मिसळून बारीक वाटावेत.
🔸चवीला हवे तेवढी गोडीप्रमाणे तयार पिठी साखर व  वेलदोड्याची पूड मिसळावी.
🔸एक चमचा कुटात पाणी मिसळून एकजीव करावे.
🔸पाणी वाढवू नये (लाडू बसतील इतकेच वापरावे).
🔸गव्हाचे पीठ,मैदा चाळून त्यात मीठ मिसळून कणीक मळावी.
🔸कणीक अर्धा तास भिजू द्यावी.
🔸कणकेचे लिंबाच्या आकाराइतके गोळे घेऊन तितकाच शेंगदाणा गुळाचा लाडू घेऊन ते सारण पिठाच्या गोळ्यात भरावा.
🔸जास्तीचे पीठ काढावे.सावकाश पोळीच्या आकारात लाटावे.
🔸कडेला पीठ जास्त आल्यास कातणीने कातावे.मंद आचेवर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजावे.
🔸भाजताना उलताणाचा वापर करावा.(गुळाचा चटका बसणार नाही).

पोळी थंड झाल्यावर साजूक तुपासोबत आस्वाद घ्यावा.

--- सौ.वैशाली पाटील
🍪🍪😋😋😋😋🍪🍪

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

मटार उसळ-कविता अन् पाककृती

मटाराची ऊसळ सगळेच करतो पण सुकीही ऊसळ चांगली होते .
मटार ताजे सोललेले हवेत,   फोडणीला मिरची आल्याचं वाटण व सुका वा ओला नारळ घालायचा,  कांदा घालून फक्त लोखंडी तव्यावर परतायचं की एका वाफेत झटपट ऊसळ तयार .

एक  वाटाणा गडगडत आला
मातीत जाऊन रूतूून बसला .
रुजून त्याचा झाला वेल
ईकडे तिकडे पसरे वेल
वेलाला आली फुलेच फुले
पांढरी ,निळसर,  जांभळी फुले
फुलांच्या मग झाल्या शेंगा
आखूड  ,टपोऱ्या , हिरव्या शेंगा
प्रत्येक शेंगेत वाटाणे पाच
त्यांची करूया ऊसळच आज

डॉ.वृंदा कार्येकर पुणे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

स्वयंपाकाची भांडी

आमच्या  आईला पितळी भांडीच लागायची , त्यात कधी करपलयं असं मलाआठवत नाही, नंतर स्टील ,अॅल्युमिनियम आली पण आईचा व माझाही जीव रमला तो पितळी भांड्यातच . जुन्या कमलाबाई ओगल्यांच्या पुस्तकात पहिले वाक्य असतं  , जाड बुडाचे पितळेचे कल्हईचे पातेले घ्यावे.व त्यात वड्या कराव्यात . पितळी भांड्यातअन्न खूप काळं चांगलं गरम रहातं .पदार्थ जास्त चांगला होतो हा अनुुभव मला आहे. मला स्टीलची भांडी स्वयंपाकासाठी आवडली नाहीत , अॅल्युमिनियमची मी वापरत नाही . लोखंडी पळी, ऊलथणं ,झारा ,कढई, तवा ह्या पाचांशिवाय माझा स्वयंपाक पुराच होत नाही , 
ते घासून मी नेहमीच  पांढर करीत नाही  काळा तवाही मला चालतो .

मी स्टीलच्या भांड्यात फक्त टोमॅटोचं सार करते बाकी फक्त कोशिंबीरी  .
प्रत्येक पालेभाजी लोखंडी कढईतच होते . झाली की काढून ठेवते . लगेच जेवायचं तर नाही काढत. पण बाकी ईतर कितीही चमकदार जाहिरात बाजी केल्या भांड्याचा मला मोह पडला नाही

पितळ हे तांबं व जस्त यापासून करतात . तापवताना त्या पदार्थात
जस्ताचाzink_  चाअंश ऊतरतो  . व तेवढा रोजच्या गरजेपुरता असतो .  त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही असं संशोधन फार वर्षापूर्वी वाचलं होतं  . सध्या बाजारात पितळ आहे पण मोडीत जास्त , घासणार कोण कल्हई करणार कोण ? प्रश्नच फार! ऊत्तरे शोधायचा आळस !सोयशास्त्राचे ऊपासक  !मग तब्येत खराब झाली तरी चालेल पण आम्ही नाही पितळी भांडी वापरणार . 
पण मी या बाबतीत मागासलेली. मी काही माझा हट्ट सोडला नाही . मी तीच जुनी पितळी भांजी वापरत राह्यले ,कल्हई करून कल्हईवाला  शोधून काढून फार काय मी कल्हईही शिकले . 

शोधलं की सापडतचं पण शोधायला मात्र हवं .

       डॉ व्रुंदा कार्येकर
संपूर्ण स्वास्थ्य सल्लागार

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

लेख-सविता करंजकर


लेख-सविता करंजकर-आ-बा कटलेट्स

हॅलो फ्रेंडस्...

आज सुटीचा दिवस ना?
अर्थात सगळ्यांनाच नसेल सुटी..पण आमच्या घरात आहे आज सगळ्यांना सुटी.
सगळ्यांना सुटी म्हणजे चॉइसने आणि सवडीने पोटपूजा करण्याचा दिवस!

वेगळं काहीतरी हव़ंच असतं..मुलांनाही आणि मलाही वेगळं काही प्रयोग म्हणून करायला मजा वाटतेच की....
मग  आज दिवस उगवला तो हाच भुंगा डोक्यात घेऊन..

वेगळं हवं..काय करु बरं वेगळं?

अशावेळी जिच्या लालोत्पादक ग्रंथी खूपच काम करू लागतात ती आमची सु(?)कन्या मदतीला येते..

तिला विचारले.. काय हवं नाश्त्याला?
ती एकदम मुरलेल्या स्वयंपाकीगत म्हणाली...काय काय उपलब्ध आहे सामग्री ते सांग...

फ्रीज उघडला...कोणतीही भाजी नाही..
एकही कांदा नाही घरात..
अगदी कणीकही नाही, रवा नाही (सिनेमात पाहतो ना आपण..छोटेमोठे सगळे डबे-डबडे उघडून पाहते नायिका...अगदी डब्याच्या आत कैमरा...रिकामा डब्बा...मग बिचारी पितळेच्या उभ्या पेल्यात माठातलं पाणी घेते आणि आढयाकडे पहात घटाघटा ते पाणी पिऊन दोन्ही पाय मुडपून पोटाशी..झोपते .अगदीं च तशी वेळ आली की काय? )

मग सुपीक डोक्यात एक एक कल्पना येऊ लागल्या..
काही आयडिया सामग्री नसलेने डोकं सोडून गेल्या.
कसलंतरी कटलेट कर ...या नोटवर कन्येची निर्णयप्रक्रिया संपली..आता त्या निर्णयावर काम करायचं होतं ते मला...
 
अशा प्रसंगात चिरंजीवांचे किचनमधले हेलपाटे वाढतात..काहीतरी वेगळं खायला मिळणार याची खात्री असते च..पण प्रत्यक्ष प्लेट समोर कधी येणार या यक्षप्रश्नाने तो येरझाऱ्या घालून माझ्या हातांचा वेग वाढवत असतो हे खरंय.

काहीच निश्चित होतच नव्हतं..
शेवटी शेवटच्या तीन बटाट्यांवर नजर पडली..काढले..धुतले..साली काढल्या आणि किसले बाई...

काय करायचंय या किसलेल्या बटाट्यांचं?

मग त्यात आलंलसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घातली भरपूर..उगीच च..

मग (पुढचं येईपर्यंत घरात असावं म्हणून खास राखून ठेवलेलं इवढूसं) ज्वारी चं पीठ घातलं..मग जरासा बाजूला पडलेला बाजरीच्या पीठाचा डबा दिसला....

अग्गोबाई...धावलं कुणीतरी मदतीला....

घातलं की बाजरीचं पीठ मीठ मसाले( मसाले मुबलक प्रमाणात उपलब्ध होते..नशीब !)तोवर नुकत्याच श्रीयुतांनी मंडईतून भाज्या आणल्या होत्या ते ही चिडून..... त्यातली मूठभर पेक्षा जास्त कोथिंबीर चिरून घातली हं....
स्वारी वैतागलेली...!
इतका खडखडाट होईतोवर लक्ष कुठं होतं म्हणे !

(बाई..बरोब्बरचै ह्यांचं )

मग सॉफ्ट असा "डो" तय्यार !!!

कटलेट म्हणजे रव्यात घोळवावे लागतात हा विचार डोक्यात मघापासून घोळत होता पण रवा शिल्लक नसल्याने तो डोक्यात च घोळवत कालच आणलेल्या ब्रेडच्या पाचसहा स्लाईसेस नी लक्ष वेधून घेतलं .
हल्ली रोजच यू ट्यूबवर विविध डिशेस ची रेसिपी पहात असल्याने डोक्यात घोळत असलेल्या रव्याची जागा ब्रेडक्रम्स् नी  घेतली.

गर्र्र्र्र र्र र्र...मिक्सर फिरला हो....

ब्रेडक्रम्स् तय्यार..

तळहातावर मऊशार "डो"चा छान कटलेटी आकार साकारला..(दरम्यान तव्याचं अंग तापलं होतंच..हे सुगरणींना सांगायला नकोच.)ब्रेडक्रम्स् मधे घोळवलेल्या
चारपाच कटलेटस् नी स्वतःला तव्यावर झोकून दिलं आणि खरपूस भाजून घेतलं.

शॅलोफ्राय की कायसं म्हणतात बाई !!

भाजून होईतो ताज्या छानशा दह्याचं रुपांतर मसाला दह्यात झालेलं...

कटलेटस् तव्यावरून डिशमधे स्थानापन्न झाले आणि मसाला दह्याच्या वाटीला जागा करून दिली त्यांनी...

दिसताना तर  देखणं दिसत होतं ते "काहीतरी वेगळं"

मुलांच्या समोर ठेवली डिश...

म्हटलं हे "आ-बा कटलेटस्"
(खुलासा - आ म्हणजे आलू आणि बा म्हणजे बाजरी ..आलूबाजरी मिक्स करून केलेले कटलेटस्.. ते आ-बा कटलेटस्)

पुढच्या प्रतिक्रिया वगैरे पहायला तुम्ही सगळे इथे..आमच्या घरात..कटलेटस् च्या डिश आणि आमच्या खाबूमोशायांसमोरच हवे होतात...

करकरून थकलेय..

आता लंच ...

काही वेगळं करणार नाहीए..रोजचीच पोळीभाजी हं...

सविता कारंजकर.
धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा