स्वयंपाक घर...
खरंतर एक अशी प्रयोगशाळा आहे..
जिथं सगळ्या सख्यांच्या (आता मित्रही स्वयंपाकघरात सक्रिय आहेत तेव्हा त्यांचाही उल्लेख न विसरता करायला हवाय.) नवनवीन कल्पनांना पंख फुटतात.
पदार्थ सगळ्यात आधी देखणा दिसायला हवा.
माझा मुलगा म्हणतो..."आई, केलेले सगळे पदार्थ नीट वाढ..डोळ्यांना छान वाटतं"..
तर आधी डोळ्यांनी जेवणा-या खाबूमोशायांना तो पदार्थ देखणाच दिसायला हवाय.
मग तो पदार्थ पोषणमूल्यवर्धक असावा.
त्यात करणा-याचं प्रेम असावं.
वाढतानाही तो तितक्याच प्रेमानं वाढला तरच तो अंगी लागतो..
मी कल्पनांच्या पंखांबद्दल बोलत होते...
तर झालं असं....
मला आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून मी बाहेरून घरी यायच्यावेळी आमच्या कन्यारत्नाने कांदेपोहे केले...
केले खरे...पण ना त्याला चव होती...ना रंग...ना ही ते योग्य प्रमाणात झाले होते..
दोनतीन जणांचे पोहे करायचे होते ते तिनं आठदहा जणांचे केलेले..
मीठतिखटही पुरतं नव्हतं...खाल्ले जाईनात...
एवढ्या पोह्यांचं करावं काय?
यक्षप्रश्न!!
मग तिला वाटलं..आई आता चिडणार..वैतागणार..
पण तिच्या या नकारात्मक कयासाला खोटं ठरवत माझ्या मधली सुगरण जागी झाली...
कुकरला बटाटे उकडून घेतले.आलं-लसूण-हिरवी- मिरचीचं वाटण करून बटाट्याची झणझणीत भाजी परतून घेतली..
पोहे एव्हाना थंड झाले होतेच..
त्यातला कडीपत्ता, शेंगदाणे, मिरच्या काढून टाकले.
हात ओला करून हाताने सगळे पोहे भरपूर मळून घेतले..
एकसारखा गोळा झाला. त्याचे आणखी छोटे छोटे गोळे करून घेतले..
पोळपाटावर तेलाच्या हाताने तो गोळा पुरीसारखा लाटून घेतला.त्यावर बटाट्याची भाजी पसरली.
नागपंचमीच्या दिवशी दिंडे करतो तसा आकार दिला..काहींना समोशाचा आकार दिला आणि कमी तेलात ते परतून घेतले (शैलो फ्राय)..
नारळ आणि पुदिन्याची मस्त गोडसर चटणी केली..
गरमागरम मुलांना खाऊ घातले..
..
"आई,तू कश्ली भारीयैस गं!!"
मी जगातली बेस्ट शेफ असते अशावेळी..
सविता कारंजकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment