Monday, February 26, 2018

लेख-सविता करंजकर


लेख-सविता करंजकर-आ-बा कटलेट्स

हॅलो फ्रेंडस्...

आज सुटीचा दिवस ना?
अर्थात सगळ्यांनाच नसेल सुटी..पण आमच्या घरात आहे आज सगळ्यांना सुटी.
सगळ्यांना सुटी म्हणजे चॉइसने आणि सवडीने पोटपूजा करण्याचा दिवस!

वेगळं काहीतरी हव़ंच असतं..मुलांनाही आणि मलाही वेगळं काही प्रयोग म्हणून करायला मजा वाटतेच की....
मग  आज दिवस उगवला तो हाच भुंगा डोक्यात घेऊन..

वेगळं हवं..काय करु बरं वेगळं?

अशावेळी जिच्या लालोत्पादक ग्रंथी खूपच काम करू लागतात ती आमची सु(?)कन्या मदतीला येते..

तिला विचारले.. काय हवं नाश्त्याला?
ती एकदम मुरलेल्या स्वयंपाकीगत म्हणाली...काय काय उपलब्ध आहे सामग्री ते सांग...

फ्रीज उघडला...कोणतीही भाजी नाही..
एकही कांदा नाही घरात..
अगदी कणीकही नाही, रवा नाही (सिनेमात पाहतो ना आपण..छोटेमोठे सगळे डबे-डबडे उघडून पाहते नायिका...अगदी डब्याच्या आत कैमरा...रिकामा डब्बा...मग बिचारी पितळेच्या उभ्या पेल्यात माठातलं पाणी घेते आणि आढयाकडे पहात घटाघटा ते पाणी पिऊन दोन्ही पाय मुडपून पोटाशी..झोपते .अगदीं च तशी वेळ आली की काय? )

मग सुपीक डोक्यात एक एक कल्पना येऊ लागल्या..
काही आयडिया सामग्री नसलेने डोकं सोडून गेल्या.
कसलंतरी कटलेट कर ...या नोटवर कन्येची निर्णयप्रक्रिया संपली..आता त्या निर्णयावर काम करायचं होतं ते मला...
 
अशा प्रसंगात चिरंजीवांचे किचनमधले हेलपाटे वाढतात..काहीतरी वेगळं खायला मिळणार याची खात्री असते च..पण प्रत्यक्ष प्लेट समोर कधी येणार या यक्षप्रश्नाने तो येरझाऱ्या घालून माझ्या हातांचा वेग वाढवत असतो हे खरंय.

काहीच निश्चित होतच नव्हतं..
शेवटी शेवटच्या तीन बटाट्यांवर नजर पडली..काढले..धुतले..साली काढल्या आणि किसले बाई...

काय करायचंय या किसलेल्या बटाट्यांचं?

मग त्यात आलंलसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घातली भरपूर..उगीच च..

मग (पुढचं येईपर्यंत घरात असावं म्हणून खास राखून ठेवलेलं इवढूसं) ज्वारी चं पीठ घातलं..मग जरासा बाजूला पडलेला बाजरीच्या पीठाचा डबा दिसला....

अग्गोबाई...धावलं कुणीतरी मदतीला....

घातलं की बाजरीचं पीठ मीठ मसाले( मसाले मुबलक प्रमाणात उपलब्ध होते..नशीब !)तोवर नुकत्याच श्रीयुतांनी मंडईतून भाज्या आणल्या होत्या ते ही चिडून..... त्यातली मूठभर पेक्षा जास्त कोथिंबीर चिरून घातली हं....
स्वारी वैतागलेली...!
इतका खडखडाट होईतोवर लक्ष कुठं होतं म्हणे !

(बाई..बरोब्बरचै ह्यांचं )

मग सॉफ्ट असा "डो" तय्यार !!!

कटलेट म्हणजे रव्यात घोळवावे लागतात हा विचार डोक्यात मघापासून घोळत होता पण रवा शिल्लक नसल्याने तो डोक्यात च घोळवत कालच आणलेल्या ब्रेडच्या पाचसहा स्लाईसेस नी लक्ष वेधून घेतलं .
हल्ली रोजच यू ट्यूबवर विविध डिशेस ची रेसिपी पहात असल्याने डोक्यात घोळत असलेल्या रव्याची जागा ब्रेडक्रम्स् नी  घेतली.

गर्र्र्र्र र्र र्र...मिक्सर फिरला हो....

ब्रेडक्रम्स् तय्यार..

तळहातावर मऊशार "डो"चा छान कटलेटी आकार साकारला..(दरम्यान तव्याचं अंग तापलं होतंच..हे सुगरणींना सांगायला नकोच.)ब्रेडक्रम्स् मधे घोळवलेल्या
चारपाच कटलेटस् नी स्वतःला तव्यावर झोकून दिलं आणि खरपूस भाजून घेतलं.

शॅलोफ्राय की कायसं म्हणतात बाई !!

भाजून होईतो ताज्या छानशा दह्याचं रुपांतर मसाला दह्यात झालेलं...

कटलेटस् तव्यावरून डिशमधे स्थानापन्न झाले आणि मसाला दह्याच्या वाटीला जागा करून दिली त्यांनी...

दिसताना तर  देखणं दिसत होतं ते "काहीतरी वेगळं"

मुलांच्या समोर ठेवली डिश...

म्हटलं हे "आ-बा कटलेटस्"
(खुलासा - आ म्हणजे आलू आणि बा म्हणजे बाजरी ..आलूबाजरी मिक्स करून केलेले कटलेटस्.. ते आ-बा कटलेटस्)

पुढच्या प्रतिक्रिया वगैरे पहायला तुम्ही सगळे इथे..आमच्या घरात..कटलेटस् च्या डिश आणि आमच्या खाबूमोशायांसमोरच हवे होतात...

करकरून थकलेय..

आता लंच ...

काही वेगळं करणार नाहीए..रोजचीच पोळीभाजी हं...

सविता कारंजकर.
धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment