Thursday, April 5, 2018

पालेभाज्या

पालेभाज्या

आईच्या माहेरी पालक, हरभरा ( कोवळी पाने) किंवा मेथीची पातळ भाजी अशी करतात.
पालक / मेथी/ हरभरा ( निवडून, धुवून चिरून)
बारीक चिरलेले गाजर
कच्चे शेंगदाणे
मटार ( कॉर्न पण घालते असतील तर)
हिरव्या चिंच मिरचीचा तक्कु
मोहरी, हिंग, हळद, लाल सुक्या मिरच्या, लसूण ( भरपूर, चिरून)
शिजवलेलं तुरीचे वरण
थोडस बेसन ( पाण्यात पेस्ट करून)

कृती-:

तेलात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करून घ्या, त्यामध्ये दाणे मटार कॉर्न गाजर घालून एक वाफ काढून घ्या मग चिरलेली पालेभाजी आणि तक्कु घालून शिजवून घ्या. त्यात घोटलेलं वरण घाला, चवीनुसार मीठ (तक्कुमध्ये मीठ असत) घालून चांगलं उकळू द्या. मग बेसन पेस्ट घालून एकजीव झालं की बंद करा.
एका छोट्या कढल्यात तेल तापवा त्यात थोडी मोहरी घाला तडतडली की चिरलेला लसूण मस्त कुरकुरित तळून घ्या, त्यात लाल मिरचीचे तुकडे घाला आणि भाजीवर ही फोडणी घालून मस्त गरमागरम भाकरी आणि थंडगार ताका बरोबर खा. ( भाताबरोबर पण मस्त लागते)

अमृता बोकील
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

पालेभाज्या खाऊ घालाव्या कश्या?

पालेभाजी म्हंटले की अत्यन्त आरोग्यपूर्ण आहार अशी भावना मनात येते. पण जिभेवरची चव? ह्याबाबतीत जरा संमिश्र मतं असतात. अगदी थोडी घरे ह्या बाबतीत भाग्यशाली असतात. अश्या घरांतील मुले, पुरुष सर्व भाज्या नाकं न मुरडता खातात. इतर घरांतील मुलांनी/ नाटक करणाऱ्या मोठ्यांना त्यांच्या न कळत पालेभाज्या खाऊ घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या घरच्या सुगृहिणी कोणत्याही थराचे प्रयत्न करत असतात. ह्या प्रयत्नांमध्ये जमले तर lovely green curry आणि फसले तर कोरडी पोळी बरी असला प्रकार होतो.
सुदैवाने मी पहिल्या प्रकारच्या घरात आहे, माहेरी आणि सासरी देखील. आता सासरी सगळेजण सगळ्या भाज्या का खातात ठाऊक नाही. पण माहेरी आम्ही लहानपणापासून सर्व पालेभाज्या खायला लागलो त्याचं मोठं श्रेय माझी आई रांधायची त्या खान्देशी हिरव्या वाटणातल्या डाळ घालून केलेल्या भाज्यांना जाते. ह्या रश्श्याचं वैशिष्ट्य असं, की बहुतेकदा भाजीचा कोणताही उग्र वास न येता ती भाजी खाल्ली जाऊ शकते. लहान मुलांना पोळी/ भाकरी चुरून छान काला करून दिला, वर लोणच्याचा खार वाढला की ती बिनदिक्कत खातात. (अर्थात प्रत्येकाचं मूल वेगळं आहे, पण हा प्रयत्न बरेचदा यशस्वी होतो असं मला वाटतं)

तर खान्देशी हिरव्या वाटणाची भाजी:

साहित्य
एक जुडी पालेभाजी (ह्यात मुळा, पालक, मेथी, करडई, माठ, पोकळा, चवळई, कांदापात इतकेच नव्हे तर दुधी, गवार, गिलकी, दोडकी,ढेमशी, चवळीच्या शेंगा अश्या कोणत्याही भाज्या बिनदिक्कत खपतात)
शेंगदाणे (किती प्रमाणात रस्सा हवा आहे त्यानुसार)
लसूण चवीनुसार
आलं, हिरव्या मिरच्या,
कोथिंबीर, कढीपत्ता,
गरम मसाला, धणेपूड, फोडणीचे साहित्य
डाळी शिजवून (तळतीप पहा)

कृती:
कढई तापवून त्यात शेंगदाणे थोडा पाण्याचा हबका मारून मग खरपूस भाजून घ्या. (आयता कूट वापरणे म्हणजे आपला जिंकण्याचा चान्स कमी करणे आहे)
हिरव्या मिरच्या डेखं काढून कढईत टाका. मिरच्यांना तेलाचा एक दोन थेंब दाखवा. मंद आचेवर मऊ आणि सोनेरी रंगावर येईतो भाजून घ्या.
मिक्सर मध्ये दाणे, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, धणेपूड (कोथिंबीर असली तरी थोडी घ्याचं. कोथिंबीर नसेल तर सढळ घ्या) आणि गरम मसाला घालून, थोडे पाणी घालून वाटून घ्या.
इकडे तापलेल्या कढईत फोडणीसाठी तेल टाका. 2-3 लसूण पाकळ्या कापून तेलात ब्राऊन रंगावर होऊ द्या. मग मोहरी, जिरं, मेथ्या, हळद, (हिंग ऐच्छिक) असं पंचफोडण झालं की वाटलेला मसाला परतून घ्या.
आता कापलेली भाजी आणि अर्धशिजली डाळ घाला. मीठ घाला. 5 मिनिटे झाकून शिजवा.
मग रश्श्याच्या प्रमाणात गरम पाणी टाका. भाजी शिजली की आंच बंद करा.

तळटीप:
चणा डाळ घालण्याच्या भाज्या:

मुळा, कांदापात, दुधी
तूर डाळ:
पालक, मेथी, करडई, माठ, पोकळा, चवळई, दोडकी,गिलकी

डाळ न घालता करण्याच्या:

गवार,ढेमशी, चवळीच्या शेंगा
डाळी रश्याच्या घट्टपणासाठी टाकायच्या आहेत.
चला सख्यांनो, मुलांच्या पोटात पालेभाज्या घालण्याची लढाई जिंकण्याचा प्रयत्न करू.

© दीप्ती पुजारी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

मुळ्याच्या पानांची पचडी पण छान लागते.

    मुळ्याच्या पानांची पचडी

मुळ्याची पाने बारीक चिरलेली व बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यात तिखट मीठ तेल आणि अर्धवट कुटलेले भाजलेले शेंगदाणे घालून सगळे चांगले एकत्र करावे. तोंडीलावणाला छान लागते.
   अस्मिता भस्मे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

ताकातला पालक

साहित्य :

एक जुडी पालक , 1वाटी शेंगदाणे आणि चणा डाळ भिजवून शिजवलेली, भरपूर लसूण , 3 चमचे तेल, हिंग, हळद, मोहरी जिर,2 चमचे लाल तिखट 1 चमचा गरम मसाला, 3 कोकम, 2 वाट्या थोडं आंबट ताक ,1 चमचा चण्याचं पीठ , चवीनुसार मीठ, गूळ

कृती:

1)प्रथम पालक साफ करून स्वच्छ धुवून जाडसर चिरून घ्यावा.
2)पातेल्यात तेल गरम करत ठेवा तेल तापले की त्यात मोहरी जिर घाला तडतडल की हळद घाला लगेच शिजलेले डाळ दाणे घाला.
3) पालक घालून नीट परतून घ्यावे.नंतर त्यात पाकल बुडे पर्यंत पाणी घाला तिखट गरम मसाला घाला मीठ गुळ कोकम घाला छान उकळी आणा.
4)नंतर एक वाटीत 1 चमचा चण्याचं पीठ घेऊन ते पाण्यात कालवा आणि हे मिश्रण त्या पालक आमटीत घाला उकळी आली की दाट पणा येईल .
5)छोट्या कढईत तेल गरम करून भरपूर लसूण घाला खरपूस भाजली गेली की गॅस बंद करून हिंग घाला आता ही फोडणी त्या आमटी वर ओता झाकण लावा लगेच.वास मरतो छान फोडणीचा.गॅस बंद करा.त्या नंतर त्यात ताक घाला नीट ढवळून घ्या
अशा रीतीने हा तकातला पालक पोळी भात कशा ही बरोबर छान च लागतो मी स्वतः नुसतं वाटीत घेऊन ही डिश खाते भात पोळी काही लागत नाही मला.

समिधा पाताडे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

करडईची भाजी

साहित्य—

एक जुडी करडई, तीनचार हिरव्या मिरच्या, मूठभर हरभर्‍याची डाळ अर्धा तास भिजवलेली, एक मध्यम आकाराचा कांदा, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंगवमीठ
कृती— थंडीच्या दिवसात  करडईची छान भाजी मिळते. ती एक जुडी निवडून स्वच्छ धुऊन घ्यावी व नंतर चिरावी.
कढईत तेल टाकून जिरे ,मोहरी हिंगाची फोडणी करावी.

मिरच्या तुकडे करुन घालाव्यात.
नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा.
आता बारीक चिरलेली करडईची भाजी घालून परतावे चवीपुरते मीठ घालून दोन वाफा काढाव्यात.

मंगला डोंगरे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
मी करत असलेला हिरव्या चिंचेचा ठेचा-
हिरव्या चिंचा (चिंचोके तयार न झालेल्या)
हिरव्या मिरच्या
मीठ घालून वाटून घेणे.
कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून ती थंड झाल्यावर त्यात घालावी. तेल थोडेसे जास्त लागते.
गीतांजली देगावकर
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
कांदा पात
मी वांग्याच्या भरतात घालते चिरून ,खानदेशी पध्दत.
कांदा पातीत डाळ हरबरा किंवा मूग डाळ घालून करते
तिसरी पीठ पेरून किंवा भाजणी घालते .

डॉ.वृंदा कार्येकर
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

शेपूची भाजी

साहित्य:

भाजी,मुगाचे डाळ ,तेल कांदा, हिरवी मिरची,हळद ,मीठ

कृती-

शेपूची भाजी धुवून पाणी निथळू देने ,मग कापणे मुगडाळ भिजलेली ,तेलात कांडा मिरची व  डाळ परतून घेणे, मग मीठ व भाजी टाकून शिजून घेणे

निष्मण
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कांदा पात

साहित्य

१जुडी कोवळी  कांदा पात , भिजवलेली हरबरा वा मूगडाळ १मूठ, चवीप्रमाणे मिरच्या व मीठ फोडणीचे नेहमीचे साहित्य

कांदापात धुवून चिरून घ्या फोडणी तडतडली की त्यात डाळ टाका   मिरची टाका व नंतर पात टाका .  ३मिनिटाची एक वाफ येऊ द्या आता मीठ टाकून पुन्हा हलवून एक वाफ येऊदे . भाजी ताजी असेल तर हिरवीच रहाते शिजल्या वरही.

डॉ.वृंदा कार्येकर
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

हिरव्या किंवा लाल माठाच्या देठांची भाजी

मधले मोठे देठ घेऊन त्याचे एक ते दिड इंचाचे तुकडे करावेत ,१वाटी तुकडे असतील तर साधारण १ कांदा बारीक चिरून घ्यावा,लोखंडी तवा किंवा कढईमध्ये थोड्या तेलावर परतुन घ्यावा लाल झाल्यावर देठ धुवून घालावेत तिखट मीठ आवडीनुसार घालावे ,पाण्याचा शिपका मारून मऊ सर शिजवावे पौष्टीक आहे,आवडत असल्यास खाताना थोडा लिंबू पिळावा.

संध्या
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

मजेदार ताकातला चाकवत

साहित्य

एक जुडी चाकवत,
हिंग, हळद, लाल मोहरी,जिरे,
लालमिरच्या (जास्त तिखट खात असाल तर,4 मोठ्या मिरच्या घेणे, )

2 वाट्या थोडं आंबट ताक,चवीनुसार मीठ,व पिठीसाखर (वेलदोडामिश्रित  )

ताजे..कोथिंबीर व कडीपत्ता

कृती

1)..प्रथम चाकवत स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या,

2)..शिजवा,

3)..गार होऊ द्या

4)..नंतर एक वाटीत 1 चमचा मुगाचे पीठ घेऊन ते पाण्यात कालवा आणि हे मिश्रण त्या चाकवतात घाला, उकळी आणा..गाठी राहूं द्यायच्या नाहीत,

5)..लोखंडाच्या कढईत तेल गरम करून, तमालपत्र 2 अगदी  छोटी पाने,कढीपत्ता, हिंग,1लवंग,लालमोहरी व जिरे घाला,
ते मिश्रण फोडणीवर..
ओतत असताना,सतत मोठया चमच्याने हलवत रहाणे, नाहीतर,गच्च गोळा होते नि सर्व मजा जाते,

नंतर त्यात ताक घाला नीट ढवळून घ्या,

आमटीसारखे पातळ राहिले पाहिजे,
नंतर,

मीठ व पिठीसाखर घालताना, *गोड~आंबट* च्या चवीचा समतोल राखला गेला पाहिजे...

पोळी,उडीद पापड,खुरासणीची चटणी,फ्लॉवर~बटाटा रस्सा..असे ताट सजवायचे...

आमटीऐवजीच ही *रसदार चाकवत* करायची आहे,त्यामुळे आमटी नसली तर,चाकवताची मजा चाखता येईल..

वृषाली गोखले
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

आमच्याकडे अळूच्या देठांचं रायतं सगळ्यांना खूप आवडते.
अळूच्या देठांचं रायतं-

अळूच्या देठांचं साल काढून बारीक तुकडे करू ते वाफवून घ्यावे. एका भांड्यात काढून त्यात दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ व साखर घालून घ्यावे.
फोडणी करून त्यात मोहरी, हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे इ. घालून फोडणी रायत्यावर घालावी. आयत्यावेळी वाढताना दही घालावे.

गीतांजली देगावकर

दोडका/ दुधीच्या सालीची चटणी-

भाजी करताना बरेच लोक या भाज्यांची साल काढतात. ही साल कुरकुरीत परतून घेणे. मिरच्यांचे तुकडे पण परतुन घेणे. भाजलेले तीळ, परतलेल्या साली, मिरच्या, साखर मीठ वाटून घ्यावे. यात लिंबू रस थोडासा घालणे. कैरीच्या दिवसात थोडी कैरी लिंबाच्या रसाऐवजी घालावे. साखरेऐवजी गूळ वापरावा.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

शेपूची भाजी करताना लसणाची फोडणी करावी जेणे करून शेपूच्या भाजीचा जो वास येतो तो सगळ्यांना आवडत नाही पण लसणाच्या फोडणीने तो वास कमी होतो व खतानाही ती छान लागते

सुचेता दरपे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

मुळ्याची भाजी

साहित्य:-

मुळ्याच्या भाजीच्या दोन जुड्या, 3 ते 4 कांदे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, ओल्या कोबरयाचा किस आणि चवीपुरतं मीठ

कृती:-

मुळ्याचा पाला चांगला बारीक चिरून घ्यावा, मुळा किसणीवर किसून घ्यावा नंतर त्यात मीठ घालून भाजी मिठात चुरून घ्यावी आणि 20 मिनिट किंवा अर्धा तास तरी ती भाजी तशीच ठेऊन द्यावी त्यामुळे भाजीला चांगलं पाणी सुटत नंतर कांदा बारीक चिरून घ्यावा आणि मिरच्यांची चिरून घ्याव्यात कढईत तेल गरम करत ठेऊन त्यात कांदा व मिरचीची फोडणी करावी कांदा तेलात चांगला परतून झाला कि त्यात चुरलेली मुळ्याची भाजी त्याला सुटलेल्या पाण्यासाकट फोडणीत घालावी ती चांगली परतून घ्यावी व वाफेवर शिजू द्यावी (झाकण ठेऊ नाये कारण झाकण ठेवलं तर वाफेच्या पाण्यामुळे भाजी काळपट होते) भाजीतले पाणी भाजी शिजून आटले कि त्यात किसलेल्या ओल्या नारळाचा किस घालणे भाजी आधीच मिठात चुरलेली असल्यामुळे मीठ बरोबर लागले असेल तर पुन्हा मीठ घालण्याची आवश्यकता नाही अशाप्रकारे मुळ्याची भाजी तयार चपाती किंवा भाकरी सोबत खायला

 सूचित सर्पे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

पळीवढी

पालक मेथी शेपू मुगडाळ किंवा मसूर डाळ व (आवडत असल्यास टोमॅटो किंवा बटाटा)...

साहित्य

छोट्या जुड्या...
पालक,मेथी व शेपूच्या,

भिजवलेली,मसूर किंवा मूग डाळ,लाल तिखट किंवा लाल मिरच्या

कृती

तिन्ही भाज्या चिरल्यावर अंदाज घ्यायचा आणि पुढीलप्रमाणे क्रम घ्यायचा..
1..पालक जास्त घेणे
2..जेव्हढा ..पालक,त्याच्या अर्ध्यात शेपू,
3..जेव्हढा शेपू,त्याच्या अर्ध्यात मेथी घेणे...
....तिन्ही भाज्या सारक असल्याने,हा क्रम ठेवायचा,नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता असते...

फोडणी त जिरे टाकणे,मोहरी नाही,हळद थोडी जास्त टाकली तरी बिघडणार नाही,
फोडणीत लालमिरच्या व सर्व चिरलेल्या भाज्या टाकणे,
सगळीकडे फोडणी लागेल असे हलवून घेणे व भिजवलेली डाळ घालणे(मूग किंवा मसूर )...परत सगळे नीट परतून घेणे...थोडे पाणी घालणे ,वरून मीठ पसरणे
( अंदाजानेच,
कारण,भाजी शिजल्यावर थोडी कमी होते,खारट नको व्ह्यायला),धने~जिरे पावडर टाकणे,

घट्ट झाकण ठेवणे..5,7 मिनटं!...झाकणात थोडे पाणी घालणे..झाकण 5 मिनिटाने काढणे,(थोडी वाफेवरच शिजली पाहिजे)
भाजी दाट झालेली दिसेल, *पळीवाढ* करायची आहे,
त्याप्रमाणात पाणी वाढवणे..
फोडणीत लाल मिरच्या टाकल्या नसतील तर,
आत्ता, झाकण काढल्यावर,मीठ व तिखट अंदाजाने घालून,सगळीकडून छोट्या पळीने हलवणे व गॅस बंद,झाकण नको!

अर्ध्या तासाने,भाजी ढवळुन बघणे,खूप घट्ट वाटली तर,अगदी थोडेसे पाणी वाढवणे..

शिजतानाच,(आवडीप्रमाणे बटाटा किंवा टोमॅटो घालू शकता,पण खूपच बारीक चिरुन)

पोळीबरोबर किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर खावी
छान लागते,
या दिवशी,जेवणात साधे मुगाचे वरण,तूप व ताक घ्यावे...
( कांदा/लसूण वापरायचे नाही,फोडणीतही व नुसतं सुद्धा...तसेच लालतिखटशिवाय कुठलाही मसाला मजा घालवेल)

वृषाली गोखले

घोलाना

साहित्य -
हरभरा कोवळी पाने एक वाटी
हिरव्या मिरच्या
भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी
चवीनुसार मीठ
लसूण पाकळ्या पाच सहा
कोथिंबीर
आलं

कृती-

      प्रथम मिरच्या +लसूण +आलं याचा ठेचा बनवून घेणे
हरभरा कोवळी पाने धुवून कोरडी करून घेणे.
जेवणाची वेळ झाली की भाजी बारीक चिरून त्यात ठेचा आणि शेंगदाण्याचं कूट घालून वरून मीठ घालावे
हलकेच हाताने मिक्स करून कोथिंबीर घालावी  .
घोलाना खाण्यास तयार......
यात हवे असल्यास कांदा ही घालता येईल

सविता काइंगडे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment