गोड दह्यातील बुंदी बटाट्याचे रायते..
हे रायते,मी,
नरसोबाची वाडी(जिल्हा कोल्हापूर ),कराड,
सांगली येथे खूप वेळा खाल्ले आहे..
त्यामुळे हा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रातला आहे,असे सांगता येईल.
साहित्य
मोठे,बटाटे 2
खारी बुंदी
कोथिंबीर,जिरे,लाल मिरच्या
हिंग,हळद
कढीपत्ता
गोड,घट्ट दही
कृती
बटाटे खूप मऊ शिजवणे
नंतर साल काढून,कुस्करून घेणे खारी बुंदी वर पेरून भांडं झाकून ठेवणे...
फोडणीत,साजूक तूप,लाल मिरच्या,कढीपत्ता,जिरे,हळद व हिंग घालून,ती गरम फोडणी,बटाटा बुंदीवर घालणे,
बारीक चिरलेली कोथिंबीर वर घालणे आणि सर्व गार झाल्यावर गोड दही व मीठ (साखर आवडत असेल तर ) घालून,खाणे
आवडत असेल तर काकडीचाही ( हिरव्या सालाची)वापर करता येतो...
वृषाली गोखले
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
चटपटीत बाळबटाटे
बटाटा आपल्या खाद्यसंस्कृतीतच नव्हे तर बोलीभाषेत पण मोठ्ठी जागा व्यापून आहे. (अगदी खूप बटाटे खाणारी माणसं होतात ना तश्शी)
डोक्यात बटाटे भरलेत का? रे त्या बटाट्याला कुणी दिलं हे काम? बटाट्यासारखा फुगलाय नुसता. इतकी शेलकी विशेषणं कमी म्हणून की काय, बटबटीत असं अजून एक बटाट्याशी नामसाधर्म्य साधणारं विशेषण आहेच.
पुलंनी सुद्धा ' बटाट्याची चाळ' अजरामर केली असली तरी चाळीचं नाव काही उदात्त अर्थाचं नाही हेच उद्धृत करण्याकरिता हे नाव ठेवलंय. (अक्षरशः नावं ठेवली जातात बिचाऱ्या बटाट्याला)
पण खाद्यसंस्कृतीत मात्र हाच बटाटा अन्नपूर्णेच्या हातच्या जादुई सिद्धीसारखा नांदतो.
पोरं भुकेजली, स्वयंपाक व्हायला अवकाश आहे- दे उकडलेल्या बटाट्याला मीठ लावून. अग्गोबाई किती मसालेदार तिखट/खारट झालाय रस्सा- टाक एखादा बटाटा कुस्करून की झणझण/ खारटपणा कमी होईल. आयत्यावेळी पाहुणे येताहेत, पालेभाजीचा बेत केला होता- टाक बटाटा थोडी वाढवायला. चारिठाव स्वयंपाक करायचाय, वेळ कमी आहे- अगं भाजी कापण्यात वेळ काढू नकोस, सरळ भातासोबत बटाटे लाव उकडायला आणि डोसा भाजी कर चटकन.......
असा हा बहुगुणी आणि लाडका बटाटा. आज त्याचेच लाड करणारी पाककृती पाहू.
साहित्य: बाळबटाटे (खाणाऱ्या लोकांच्या क्षमतेनुसार), चाट मसाला, तळणीसाठी तेल, जिरेपूड, आमचूर, तिखट, मीठ
कृती:
बाळबटाटे म्हणजे हल्ली बिग बझार, रिलायन्स फ्रेश अश्या ठिकाणी छोटे छोटे बटाटे जाळीच्या पिशवीत भरले असतात ते.
असे बाळबटाटे त्यांना दाभण नाहीतर दातकोरणी काडयांनी टोचून टोचून छोटी छोटी 5-6 भोकं पाडून घ्यावी.
उकळत्या पाण्यात मीठ घालून त्यात हे बटाटे सोडून छान उकडून घ्यावे. उगाच सालं काढण्याची फालतू मेहनत करू नये, नंतर ही सालं कुरकुरीत होणार आहेत.
आता कढईत तळणीसाठी तेल गरम करा, बाळबटाटे सोनेरी रंगावर तळून घ्या. (ह्या पायरीवर कमी उष्मांक करण्यासाठी फ्राय पॅन मध्ये परतून घेऊ असा विचार ज्या फिरलेल्या डोक्यांत आला असेल त्या अकलेच्या बटाट्यानी .. आपलं कांद्यानी हे प्रात्यक्षिक करूच नये. वाचूनच समाधान मानावे)
ह्या बटाट्यांवर जिरेपूड, तिखट, चाट मसाला, आमचूर असा मसाला शिंपडवा.
जेवणासोबत फरसाण म्हणून किंवा भज्यांऐवजी हटके प्रकार म्हणून खायला मज्जा येते. चहाच्या वेळी केलेत आणि सोबत कैरी पुदिना चटणी, चिंच खजूर चटणी आणि बारीक शेव हजर ठेवलीत तर छान आलूचाट खाल्ल्याचे निखळ समाधान मिळवू शकाल.
(ही चव आवडून, त्याचं व्यसन लागून पुन्हा पुन्हा खाऊन बटाट्यागत फुगलात तर प्रस्तुत लेखिका जबाबदार नाही बरं)
©दीप्ती पुजारी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
झटपट चविष्ट बटाट्याची भाजी.
साहित्य :
४ बटाटे ,२ कांदे ,१टोमॉटो ,
तेल ,जीरं ,मोहरी , हळद ,हिंग कढीपत्ता, तिखट ,मीठ ,कोथिंबीर
कृती
कच्च्या बटाट्याच्या एकदम छोट्या छोट्या छानश्या चौकोनी फोडी करुन घ्याव्यात. फोडणी साठी ३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी जीरं हळद हिंग कढीपत्ता टाकावा. बारीक चौकोनी चिरलेला कांदा टाकावा.थोडेसेच परतावे. नंतर बटाटा टाकून ३-४ मि. परतावे. नंतर टोमॉटो तिखट मीठ टाकून वरून कोथिंबीर पेरावी. अगदी चविष्ट आणि झटपट भाजी होते.
डॉ. अस्मिता भस्मे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
बटाटा...आमच्या घरात सगळ्या मुलांना बटाट्याचे सगळे पदार्थ प्रिय भारी....
कोणत्यातरी एका पारंपरिक गीतावर आधारित एक बटाट्याचे गाणेही माझ्या मुलीने तयार केलेले..
आजही ते तशाच ठेक्यावर आमची मुलं (आता सगळी तरुण या प्रकारात मोडतात ..तरीही) गातात...
बटाट्याच्या काही पाककृती पूर्वी ते गीत तुम्हाला वाचायला देते....
बटाटा रे बटाटा...
तू असा कसा एकटा?
आईने तुला धुतला कसा?
समूहस्वर : खसाखसा
चिरला कसा?
समूहस्वर :पटापटा
शिजला कसा?
समूहस्वर : रटारटा
खाल्ला कसा?
समूहस्वर : मटामटा...
(जल्लोष.. एकसाथ)
मग ताव मारणे सुरू....
कशावर?
बटाट्याच्या पाककृतींवर...
१. बटाट्याचे भरीत....
साहित्य:
उकडलेले बटाटे , बारिक चिरलेला कांदा ,कोथिंबीर, मीठ ,तिखट,हळद
फोडणीसाठी :तेल,हिंग, जिरं-मोहरी
कृती :
उकडलेले बटाटे हाताने कुस्करून / किसणीवर किसून घ्यावेत.त्यात भरपूर कांदा( कच्चा) कोथिंबीर, मीठ घालावे.
फोडणीसाठी पुरते तेल गरम करून जिरं-मोहरी ,हिंग ,काळं तिखट घालून सगळं साहित्य मस्तपैकी कालवून घ्यावं..
गरमागरम भाकरीसोबत..
डब्यात चपातीसोबत..
अथवा तोंडीलावण म्हणून झक्कास पदार्थ आहे. मात्र तिखटमीठ पुरतेच असावे.
२. बटाट्याची खीर...
साहित्य : उकडलेले बटाटे, दूध,साखर,वेलदोडा पूड ,सुकामेवा (यात बदाम,काजू ,पिस्ता ,चारोळी,हवं ते घालू शकतो )
कृती :
बटाटे किसूनच घ्यावेत.फोड राहता कामा नये.
स्टीलच्या भांड्यात दूध उकळायला ठेवावे.त्यात साखर , वेलदोडा पूड ,सुकामेवा घालून छानशी उकळी आली की बटाट्याचा कीस घालावा..
घट्ट / अथवा पातळ..आपल्या आवडीनुसार.. दूध वाढवावे / कमी करावे.
सतत ढवळत रहावे.
ही खीर थोडी गोडच चांगली लागते.
उपवासाच्या पदार्थात मोडते.
केशर घातलं तर चवीसोबत देखणीही दिसते...
सविता कारंजकर
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
गोड शिरा
उकडलेले , कुस्करून घेतलेले दोन्ही.. बटाटे आणि रताळे
तुपावर परतून त्यात साखर, वेलची पूड,केशर घालावे
गरज पडल्यास थोडा दुधाचा हाबका मारुन , झाकण ठेवून एक वाफ आणावी.
वरुन बदाम,पिस्ता काप घालून सजवावे
मस्त उपवासाचा पदार्थ
गोड शिरा
Dessert... Sweet dish
😄😄
नक्की try करा
अंजली जोशी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
बटाट्याचा/उपवासाचा शिरा
साहित्य :
उकडलेले बटाटे, थोडासा खवा,खजूर (बिया काढून, मिक्सर मधून बारीक करून) साखर, वेलचीपूड,सुकल्या मेव्याचे काप
कृती
pan मधे थोडं साजूक तूप घालून मेव्याचे काप खरपूस तळून घ्यावेत.
त्याच तुपात कुस्करलेले बटाटे छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यावे. खजूर पेस्ट मिक्स करावी.
खवा हाताने थोडासा मळून, बटाट्यात मिसळावा.
मिश्रण सारखे परतत रहावे.भांड्याला चिटकू देवू नये
चवीनुसार साखर मिसळावी न एक वाफ काढावी
(शिरा थोडा अगोडच छान वाटतो)
चिमूटभर मीठ अजून चव वाढवते
वेलचीपूड न मेव्याचे काप..
शाही बटाट्याचा शिरा तय्यार..!!
अप्रतिम लागतो.
जयश्री खराडे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
बटाट्याच्या चकल्या
उपवास म्हटल की बटाटा आलाच .तसा त्याचा उपयोग खीरीत , खिचडित , आमटित तर करतोच पण नाशिक ,पुणे अहमदनगर ईथे चकल्या केल्या जातात.त्या कडक चकल्या तेलात तळुन कुरकुरीत खायला खुप छान लागतात
सोपी कृती आहे
साबुदाणा आदल्या रात्र भर भिजवुन घ्यायचा समप्रमाणात बटाटे उकडुन कुसकरुन मऊ करुन घ्यायचे चवीनुसार तिखट , मीठ घालुन चकलीच्या साच्यातुन चकल्या पाडुन घ्यायच्या कडक उन्हात वाळत घातल्या की झाल हवाबंद ड्ब्यात ठेवल्या की वर्षभर वापरता येतात
सागर महाजन
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
साऊथ स्टाईल बटाट्याची भाजी
साहित्य: ५ बटाटे, २ कांदे, २ टोमॅटो, ३ चमचे धने, २ चमचे जिर, अर्धी वाटी ओल खोबर, आलं अर्धा इंच, ३ लसणीच्या पाकळ्या, ४ लाल सुख्या मिरच्या, फोडणीच साहित्य, मीठ , गूळ(चवीप्रमाणे)
कृती:
प्रथम बटाटे सोलून घ्यावेत. कांदे बटाटे आणि टोमॅटो उभे चिरून घ्यावेत , वाटीत धने-जिर-सुख्या मिरच्या भिजत घालाव्यात, थोड्या वेळाने भिजलेले धने जिर सुख्या मिरच्या ओल खोबर आलं लसूण वाटून घ्यावीत. कढई तापत ठेवून तेल घालावे तेल तापलं की त्यात मोहरी जिर हिंग जरा जास्त घालावं हळद भरपूर कढीपत्ता घालावा. नंतर बटाटे कांदे आणि टोमॅटो च्या फोडी घालाव्या चांगलं परतून घ्यावं. नंतर वाटण घालावं बऱ्या पैकी तळ बुडे पर्यंत पाणी घालाव नंतर त्यात मीठ गुळ घालावं जास्त आंबट आवडत असेल तर १चमचा चिंचेचा कोळ घालावा झाकण ठेवून व्यवस्थित शिजू द्यावं नंतर वरून कोथिंबीर घालावी , पोळी बरोबर छान लागते ही भाजी.
टीप: उकडलेले बटाटे असतील तर कच्च्या बटाट्या च्या जागी उकडलेले बटाटे थोडे कुस्करून घालावे बाकी कृती तशीच. ही भाजी मस्त रसरशीत एकसंथ मिळून येते पोळी भाकरी पराठा कशाही बरोबर छान च लागते
समिधा पाताडे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
दमालू
( हे दमालू माझे वडील बनवतात,त्यांनी सांगितले,तेच साहित्य देत आहे)
साहित्य
लहान बटाटे( खूपच लहान,अगदी लिंबापेक्षाही)
फोडणीसाठी जिरे ,आलं हिरव्या मिरच्या,कोथिंबीर
कृती
बटाटे अर्धवट उकडून,मग सोलून,थोडासा चिरा देऊन, फोडणीला टाकायचे,सगळीकडून नीट परतून घेतले की,
मग मिरच्या,आले,जिरे यांचे एकत्र वाटण टाकायचे,थोडे पाणी टाकणे,
..रस जसा आणि जितका हवा असेल त्याप्रमाणे,अंदाज घेत पाणी टाकायचे..आधी अर्धवट उकडलेले आहेतच बटाटे,त्यामुळे आता गॅस बंद करून,झाकण ठेवायचे 15,20 मिनटं...!
नंतर,कोथिंबीर टाकणे
बाबांना कोथिंबीर अति,अति प्रिय आहे,ते खूप टाकतात!
त्यामुळे तुम्हाला जितपत आवडते,तितपत टाकावी.
वृषाली गोखले
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
सांबार मसाला बटाटा रस्सा भाजी
आपल्याकडे सांबार मसाला असतोच त्याच मसाल्याचा वापर करून ही एक वेगळ्याच चवीची भाजी. लहान मुलाना खुप आवडेल.
चार-पांच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, चार लाल टोमॅटो, हवे असतील तर अर्धी वाटी फ़्रोझन किंवा उकडलेले मटार, एवढे सामान हाताशी असले की झाले.
गॅसवर एका जाड बुडाच्या कढईत फोडणीसाठी थोडेसे तेल तापवून त्यात अर्धा चमचा जिरे घालावे.जिरे चांगले तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून मंद आचेवर ते परतत रहावेत. सगळे पाणी आटले कीटोमॅटो एका बाजूला करून मधला भाग मोकळा करुन घ्यावा. (टोमॅटो कढईतच असु द्यावेत) या मधल्या मोकळ्या भागात एक चमचा साखर घालून ती परतत रहावी. परतून सोनेरी झाली कि टोमॅटो मिसळुन घ्यावेत. त्यात एक चमचा सांबार मसाला व अर्धा चमचा लाल तिखट घालावे. नीट मिसळुन घ्यावे. मग त्यात हवे असतील तर वाफवलेले मटार घालावेत.
मग त्यात दोन ते तीन कप पाणी घालावे. उकळले की त्यात उकडलेले बटाटे कुस्करुन किंवा किसून घालावेत. एखाद्या बटाट्याच्या फोडीही घालाव्यात. चवीनुसार मीठ घालून उकळू द्यावे.
सौम्य चवीची ही बटाटा सांबार भाजी, चपाती वा पावाबरोबर छान लागते.
मंजिरी होनकळसे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
बटाटा भगर पापड
साहित्य
बटाटा,भगरीचे पीठ,मीठ,लाल तिखट.
कृती
बटाटा उकडून घ्यावा.साल कढून किसून घ्यावा.त्यात मावेल इतक भगरीच पीठ घालावे.मीठ, तिखट घालून घट्ट मळावे.प्लॅह्टिकच्या कागदाला तेलाचा हात लावून पापड लाटावेत.खूप पातळ लाटू नये.सावलीत किंवा पंख्याच्या वाऱ्याला वाळवावेत.वाळल्यावर एक तास उन्हात ठेवावेत.
उपवासासाठी तळण्यासाठी चविष्ट पर्याय आहे.
भगरीच्या पिठा ऐवजी साबूदाणा पिठ पण वापरू शकता.
सौ.वैशाली पाटील
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
मंचुरियन स्टाईल
साहित्य
बटाटा, बेसन,कांदा,ढब्बू मिरची, टोमॅटो,लसूण,ओवा, हिरवी मिरची,लाल तिखट, कोथिंबीर, मीठ,टोमॅटो सॉस, तेल.
क्रुतीः
बटाट्याच्या फिंगर चिप्स सारख्या फोडी करून घ्याव्यात. बेसनमधे मीठ ओवा आणि पाणी घालून भज्याच्या पीठा इतपत पातळ करावे. कढईत तेल गरम करावे. बटट्याच्या फोडी पीठाच्या मिश्रणात बुडवून त्याची भजी तळून घ्यावीत.
एका भांड्यात ३चमचे तेल गरम करावे. त्यात उभे पातळ चिरलेले कांदा, ढब्बू मिरची, टोमॅटो ,लसूण घालून थोडे परतावे. नंतर तिखट मीठ ,बारीक चिरलेली हिरवी मिरची ,टोमॅटो सॉस घालावे. शेवटी केलेली बटाटा भजी घालून परतावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. चटपटीत मंचुरियन स्टाईल बटाटा तयार.
डॉ.अस्मिता भस्मे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
बटाटा शेंग भाजी
साहित्य
पाव किलो बटाटे, शेगलाच्या शेंगा ४किंवा ५, फोडणीसाठी कांदा, कडीपत्ता, लाल मसाला वाटप- ओल्या नारळाचा किस, सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ चवीनुसार आणि फोडणीसाठी तेल
कृती
प्रथम बटाट्याच्या साली काढून बटाटे पाण्यात घालून ठेवणे नंतर शेगलाच्या शेंगांचे आपल्याला हवे असतील त्या उंचीचे तुकडे करून घेणे त्याच्या साली नीट काढुन घेणे नंतर ओल्या नारळाचा किस, सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर हे चांगलं भाजून याच वाटप तयार करून घेणे फोडणीसाठी कढईत तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात कांदा कढीपत्याची फोडणी करावी नंतर त्यात मसाला घालावा ( ज्यांना जितक्या प्रमाणात तिखट हवं त्याप्रमाणे मसाला घालणे.. आम्ही मालवणी मसाला वापरतो त्याप्रमाणे तो घालतो) मसाला घातल्यावर तो तेलात चांगला परतून घेणे आणि मग त्यात तयार वाटप टाकणे ते हि चांगलं परतून घेणे मग त्यात बटाटा व शेगलाच्या शेंगा चांगल्या धुऊन त्यात घालणे आणि बटाटा आणि शेंगा हि त्या वाटपात चांगल्या परतून घेणे आणि मग बटाटा आणि शेंगा चांगल्या प्रकारे शिजतील या प्रमाणात पाणी घालणे सगळंच पाणी शिजताना आटऊ देऊ नका थोडी थापथपितच भाजी ठेवावी म्हणजे ग्रेव्ही ठेवावी त्यामुळे भाजी अगदी सुकी ना होता छान लागते आणि चवीप्रमाणे त्यात मीठ घालावे व झाकण ठेऊन चांगली शिजू द्यावी. अशा प्रकारे बटाटा शेंग भाजी तयार.
सुचिता सर्पे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
मी बटाटयाची साले काढते .चौकोनी लांबट तुकडे करते व तळते मंद आचे वर.तळून झाल्यावर मीठतिखट भूरभरते की खायला तयार.
डॉ.वृंदा कार्येकर
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
बटाटा फिंगरचिप्स
साहित्य
बटाटा,काॅर्न फ्लाॅवर,मीठ, तेल
कृती
बटाटा सोलून त्याचे लांब चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्यावेत.तळायला तेल गरम करून घ्यावे.कापलेले बटाटे बर्फाच्या गार पाण्यात दोन--तीन मिनिटे ठेवावेत.नंतर पाण्यातून काढून कोरडे करावेत.काॅर्न फ्लाॅवर व चवी पुरते मीठ ताटात मिसळून घ्यावेत.हे मिश्रण *कोरडेच* असावे.त्यात बटाट्याचे काप घोळवावेत.दुसऱ्या प्लेटमध्ये घोळवलेले बटाट्याचे काप काढून जास्यीचे पीठ झटकून तळावेत.मध्यम आचेवर तळावे.जास्त आचेवर करपतात व मंद आचेवर तळल्यास मऊ पडतात.मध्यम आचेवर सोनेरी तळावेत.
सौ.वैशाली शंकर पाटील
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
बटाट्याचा किस पाककृती (दोघांसाठी):
२ मध्यम आकाराचे बटाटे किसून किस गार पाण्यात घालावा. कढईत १ चमचा साजूक तूप गरम करावे. त्यात अर्धा चमचाभर जिरं घालावं. ते तडतडू लागताच 2 हिरव्या मिरच्यबारीक चिरून घालाव्यात. फोडणी करावी. बटाट्याचा किस पाण्यातून निथळून त्यात घालावा. मध्यम आचेवर परतत शिजवावा. एक वाफ काढावी. अर्धवट शिजला असताना अर्धी वाटी शेंगदाणा कूट त्यात घालावे. चवीप्रमाणे मीठ व साखर घालून मिश्रण एकजीव होईल असे ढवळत परतावे. बटाटा शिजला की किस ताटलीत वाटीत काढून त्यावर कातलेले खोबरे घालून सजवावे व खायला द्यावे. बटाटा किस तय्यार
प्रीती कामत तेलंग
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
कच्चे केळे व पोहे बटाटा कटलेट
कच्च्यी केळी आणि बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यावे.
हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, लसूण,मीठ,हळद एकत्र मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.घट्ट पणा साठी त्यात कच्चे पोहे घालावेत.मिक्सर /मधून छान बारीक करून घ्यावे.
लहान चपटे गोळे करून घ्यावेत
Sallow or deep तळून घ्यावे
कुरकुरीत छान evening snacks तयार.
अंजली जोशी
No comments:
Post a Comment