Thursday, April 5, 2018

गोड आप्पे

गोड आप्पे

साहित्य:

जाडा रवा पाऊण वाटी, गूळ पाऊण ते एक वाटी, जाडे पोहे (धुऊन, पाणी काढून )अर्धी वाटी, दही पाऊण वाटी, एक पिकलेले केळे, आवडत असेल तर काकडीचा किस अर्धी वाटी, कातलेले ओले खोबरे पाव वाटी, कणिक पाव वाटी, वेलची पूड आणि काजू तुकडे करून. मिश्रण तयार करण्याची

कृती

वर सांगितलेले सर्व जिन्नस (केळे सोडून)एकत्र कालवून एकजीव करावेत. शेवटी केळे कुस्करून त्यात कळवावे. मिश्रण सरबरीत दाट होते. आप्पे पात्राला साजूक तुपाचा हात लावून ते गरम करावे. व एक-एक  मोठा चमचाभर  मिश्रण घालून खरपूस तांबूस रंग येईपर्यंत शिजवावे. मग बाजू परतून मिनिटभरासाठी शिजू द्यावे.

आप्पे हा पदार्थ अनेक निरनिराळे जिन्नस वापरून कधी गोड तर कधी तिखट अशा विविध स्वादांत बनवता येतो.
आता मी जी कृती सांगणार आहे ती उडदाची डाळ व तांदूळ वापरून बनवायच्या तिखट आप्प्यांची आहे.

साहित्य:

एक वाटी उडदाची डाळ, २ वाट्या तांदूळ, अर्धी वाटी जाडे पोहे, तीन -चार हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), पाव वाटी कोथिंबीर (बारीक चिरून), काजू तुकडे, ओल्या खोबऱ्याचे छोटे तुकडे /कातळ्या, मीठ चवीप्रमाणे आणि तेल .

कृती

उडदाची डाळ व तांदूळ स्वच्छ धुऊन एकत्र करावेत आणि ते कोमट पाण्यात भिजवून झाकून ठेवावेत.
साधारण चार - साडेचार तासांनी पोहे धुऊन त्यातील पाणी काढून टाकावे. ते पोहे डाळ -तांदूळ मिश्रणासोबत मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. डोश्याच्या पिठासारखे पीठ झाले पाहिजे. त्यात मीठ घालून ढवळून घ्यावे. तयार मिश्रण उबदार ठिकाणी झाकून ठेवावे व आठ ते दहा तास आंबू द्यावे. आंबलेले मिश्रण फुगून येते. तेव्हा त्यात चिरलेली मिरची, कोथिंबीर, काजू व खोबऱ्याचे तुकडे घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे.  आप्पेपात्राला तेलाचा हात लावून गरम करावे. ते तापल्यावर चमचा-चमचाभर मिश्रण घालून आप्पे खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यावेत, परतावेत. मग दुसऱ्या बाजूने  मिनिटभर भाजून घ्यावेत व स्वच्छ सुती कपड्यात किंवा पेपर टॉवेलवर काढावेत आणि चटणी सोबत खायला द्यावेत.  ता. क. आप्पे बनविण्याच्या आणखी पाककृती पाहिजे असल्यास मी दर आठवड्याला एक - एक करून इथे सांगत जाईन.

प्रीती कामत तेलंग

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment