पोपटी
_नवीमुंबई शेजारील उरण, पनवेल, पेन, अलिबाग तालुक्यात जानेवारी ते मार्च महिन्यात तयार केली जाणारी पोपटीची रेसिपी.
वाढणी-५ जणांसाठी.
लागणारा वेळ: ४५ मिनिटे
पोपटीचे साहित्य:
२ किलो गोड्या वालाच्या शेंगा (सोबत तुरीच्या शेंगा आणि मटार घेतली तरी चालते)
मामोडा (भांबुर्डीची) पाने
भरपुर पेंढा/पला-पाचोळा, सरपण
१ सर्व साहित्य बसेल मातीचा माठ
मीठ चवी प्रमाणे
हवे असल्यास
👇🏻👇🏻👇🏻
बटाटे ५
अंडी ५
चिकनचे ५ ते ६ पीस मोठ्या आकारात कापलेले आणि दही १ वाटी, धणे पावडर २ च चमचे, जिरे पावडर २ चमचे,,आलं-लसूण पेस्ट ४ च चमचे,,व्हिनेगार २ च चमचे, मीठ-तिखट चवीपुरते, तंदुरी मसाला चमचे, लिंबुरस २ च चमचे, चाट मसाला या पासून तयार केलेल्या मिश्रणात ३ ते ४ तास मेरीनेट केलेले
चिकन बांधायला केळीची पाने (चिकन बांधून टाकल्याने त्याचा मसाला इतर वस्तूंना लागत नाही)
_(पोपटी फक्त वालाच्या शेंगाची केली जाते वरील सर्व पदार्थ पर्यायी आहेत)_
क्रमवार मार्गदर्शन:
पोपटी ही एक गावरान पाककृती आहे. उरण, पनवेल, पेन, अलिबाग परिसरात जे वाल पिकतात त्यांना गोडेवाल म्हणतात. अशा वालच्या शेंगा घ्याव्या. या शेंगा अवश्यकता वाटल्यास धुवून घ्याव्या. बटाटे धुवून घ्यावेत.
चिकनचे पीस सुद्धा केळीच्या पानात बांधून घ्यावेत. २ पिसचा १ बंच करावा.
मातीचे मडके घेऊन त्याच्या तळाच्या पाव भागात सर्वात खाली मामोड्याचा (भांबुर्डीचा) पाला भरावा. चवीप्रमाणे मीठ मग त्यावर वालच्या शेंगा, बटाटे, अंडी, चिकनचे तयार केलेले बंच आणि पुन्हा चवी प्रमाणे मीठ टाकावे. उरलेल्या जागेत मामोड्याचा (भांबुर्डीचा) पाला ठासुन भरावा.
एका उघड्या जागी (ज्या ठिकाणी आग पेटविता येईल) माठ उपडा करून ठेवावा त्यच्यावर जमा केलेला पेंढा (पालापाचोळा) एकत्र करावे. मामोड्याचा पाला ठासून भरलेला असल्यामुळे आतल्या वस्तू बाहेर येत नाहीत) आणि शेकोटीरूपी आग लावून द्यावी. माठाच्या सर्व बाजूंनी पालापाचोळा जळत असेल याची दक्षता घ्यावी. २५ ते ३० मिनीटे असाच जाळ राहू द्यावा. आपण ठेवलेला माठ लालबुंद झालेला आपणांस आढळून येईल. काठीने तो माठ बाहेर काढावा. काठीनेच वर भरलेला मामोड्याचा पाला काढावा (माठातली वाफ हातावर येऊ नये म्हणून). मग़ शेंगा, बटाटे, चिकन, अंडी काढून घ्यावी. आणि गरम गरम शेंगा सोलून खाव्या. शेंगा खाल्यावर ३० मिनीटे पाणी पिण्याचे टाळावे.
चेतन गावंड, उरण-रायगड
(९८१९७५९१०५)
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट.
No comments:
Post a Comment