मऊलुस डोसे
मऊ आणि लुसलुशीत.
माझे सासर उडुपीचे, तुळू भाषिक. त्यामुळे डोसे, इडली, अप्पे,अप्पम, अड्डे, पुट्टू असल्या पदार्थांची आमच्याकडे रेलचेल असते.
मला लग्नाआधीदेखील डोसे येतच होते. (प्रत्येक मराठी स्त्रीला हा विश्वास असतोच) पण मराठी अभिजनांत 'कुरकुरीत पातळ डोसे न तुटता काढता येणे' हा सुग्रणीला सुरेख डोसे येत असण्याचा पुरावा असे. (किमान आमच्या डोंबिवलीमध्ये तरी मी असेच खाल्ले आणि ऐकले/ वाचले होते. 2005 पूर्वीची कथा आहे ही. आधीच स्पष्टीकरण देत्ये, म्हणजे "आमच्यात नाही हो असं" अशी सुरवात करून होणाऱ्या आक्रमणांपासून मी बचवात्मक पवित्रा घेतला आहे असं सुज्ञ वाचकांना समजून येईल.) तर मला असे सुरेख डोसे येत असण्याचा सार्थ अभिमान मी बाळगून होते. पण ते डोसे केल्यानंतर एरव्ही तारीफ करणारा नवरा- समजून घेणाऱ्या नवऱ्यासारखा वागला. (म्हणजे आपली प्रेमाची बायको प्रेमाने जे बनवेल ते चविष्ट *समजून* खावे, त्यात चुका शोधू नये, असं वागणारा) पण माझा सुगरणीचा दंभ मला गप्प बसू देईना. खोदून खोदून विचारले असता त्याने risk घेतली खरं सांगायची. (की बाई हे असले डोसे हॉटेल मध्ये असतात, ते काही तुळू अभिजनांत खात नाहीत. सुरेख मऊ लुसलुशीत डोसे हेच आमच्यातील सुगरणींचे लक्षण आहे)
हुह, एवढंच ना? मीही जाड डोसा घातला, पण तो चिवटच झाला. मग मी त्यालाच उलटून म्हणाले, जड डोसे चिवटच होतात. तोही (सघेन सारखा) बरं म्हणाला आणि मी अजूनच भरीला पडले.)
एके रविवारी आम्ही उभयतां सासरी राहायला गेलो असता सकाळी सासूबाईंच्या हातचे डोसे खाल्ले, आणि....
(एका सासुशी स्पर्धा करणाऱ्या नखशिखान्त मेकअपलेल्या स्टार प्लस वा तत्सम चॅनेल वरच्या आदर्श स्नुषेचं चित्र आणा डोळ्यांपुढे)
"भला इनके डोसे मेरे डोसोसे मऊ और लुसलुशीत कैसे?" (हा डायलॉग माझा स्वतःचा आहे, तुम्हाला कुठली डिटर्जंट पावडर आठवली असेल तर तो निव्वळ योगायोग आहे.) आणि मग माझ्या अंगाची लाहीलाही होऊन सुन्दर डोसा घश्याखाली उतरेना. मग मी (सीरिअल मधील त्या स्नुषेप्रमाणेच) सासूबाईंची तारीफ करून त्यांना डोस्याची पाककृती विचारली.( प्यारसे उनसे उनका राज उगलवया)
तर मऊलुस डोसे:
साहित्य
४वाट्या तांदूळ, १/४वाटी उडीद डाळ, १/६वाटी मेथी (होय एक षष्ठमांशच, त्यांच्या अंदाजे टाकण्याला प्रमाण देण्याचा हा माझा शास्त्रशुद्ध प्रयत्न. आता उडीद डाळीपेक्षा थोडं कमी ह्या तोंडी वाचनाला टंकीत पककृतीमध्ये काय अर्थ आहे? आणि मी सुगरण, आदर्श स्नुषा इत्यादी असल्याने हार मानणार नाही)
कृती:
तांदूळ, उडाळ आणि मेथ्या वेगवेगळ्या ६ तास भिजवून गघरड्यावर (किंवा विद्युत पाट्यावर किंवा आपल्या मिक्सरमध्ये) वाटून घ्या. ७-८ तास किण्वन प्रक्रियेकरिता द्या.
आयत्या वेळी आंबलेल्या रवणात मीठ, 2 खडे गुळ, पाणी घालून पीठ छान फेटून घ्या.
बिडाचा तवा तापवून त्यावर थोडे तेल पसरा.
एक डाव रावण नंतर मुद्दाम डावाने/वाटीने पसराव लागू नये अश्या बेताने तव्यावर सोडा. झाकण लावा.
४० सेकंदानंतर झाकण उघडा. डोसा शिजून सुटेल इतपत झाला की (न उलटता) काढा.
असे सगळ्या रवणाबरोबर करायचे. आणि अर्थातच, घरातील मंडळींना होतील तसे गरम गरम वाढायचे.
🥞🥞🥞🥞🥞🥞
© दीप्ती पुजारी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट
No comments:
Post a Comment