Thursday, April 5, 2018

गव्हाचे शंकरपाळे

गव्हाचे शंकरपाळे

२० वर्षापूर्वीची गोष्ट.....बर्याच आवडत्या पदार्थांपैकी शंकरपाळी हा एक लाडका पदार्थ.लग्नानंतर पहिल्यांदाच शंकरपाळी करत होते. फोनवरून वहिनींना सगळे प्रमाण विचारुन घेतले. घरात सगळे साहित्य असल्याची खात्री करुन घेतली. मग काय... अति उत्साहाने करायला सुरूवात केली.वहिनींनी सांगितलेल्या प्रमाणात १ वाटी दुध...१ वाटी डालडा आणि १ वाटी पिठीसाखर घेतली. वेलदोड्याची पूड घातली...मिश्रण चांगले एकत्र केले. यात मावेल तेवढा मैदा घालून घट्ट पीठ मळायचे होते. त्यानुसार मिश्रणात मैदा टाकला. मी माझ्याकडे होता तेवढा सगळा मैदा घातला. (मैदा किती लागेल याचा अंदाज नव्हता.) हे काय.....पीठाचा गोळाच बनेना...मिश्रण अजून रबरबीतच होते. आता काय करायचे... घरी एकटीच... दुकान लांब....बेत फसला असे वाटत असतानाच गव्हाचे पीठ घालून बघावे असे सुचले.मग गव्हाचे पीठ घालून घट्ट पीठ मळले.आणि ते जाडसर लाटून त्याचे तुकडे करुन मंद गॅसवर लालसर तळले. चवीला अफाट...अगदी बिस्कीट सारखे झाले.
  तेव्हापासून आता पर्यंत मी शंकरपाळी साठी कधीही मैदा वापरला नाही. पूर्ण गव्हाचेच पीठ वापरते.तुम्ही पण करुन
बघा.

डॉ.अस्मिता भस्मे.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment