Sunday, April 8, 2018

चैत्रगौरीतील ओल्या चण्यांचं हम्मस

चैत्रगौरीतील ओल्या चण्यांचं हम्मस

चैत्रगौरीतील हळदीकुंकू ही आपली भारतीय महिलांची पारंपरिक किटी पार्टी आहे. बाकीच्या हळदीकुंकवात कसं, चटपट उरकतं काम. म्हणजे संक्रांतीच्या वेळेची हळदीकुंकवं, जावं हळदीकुंकू लावावं, तिळगूळ घ्यावा अन घरी यावं. दिवाळीमध्ये तर सगळ्याच बाया घरच्यांची दिवाळी मजेत व्हावी म्हणून घाईघाईने घरी पळतात. गौरीजेवणाचं तर विचारू नका एवढं सुपरफास्ट होतं. नवरात्रीमध्ये बऱ्याच जणींचा उपवास असतो मग खाण्याची काही मज्जा नाही.
पण चैत्रगौर- आधी येतेच वसंतात. वासंतिक फुलांच्या वासांनी हळदीकुंकूवालं घर दरवळत असतं. चैत्रगौरीची सुरेख आरास त्यातला अंगडं टोपड ल्यालेला बाळकृष्ण अगदी मन सुखावतो. अश्या वातावरणात आलेल्या बायांना घरी घाईने जाण्याची ओढ नसते. तसं त्यांना घरी सणासुदीचा स्वयंपाक नसतो आणि दिवस मोठा झाल्यानं दिवेलागणीला वेळ असतो. अश्यावेळी ती वाटली डाळ आणि मस्त वेलचीचा सुवास मिरावणारं ते खास वासंतिक पेय- पन्हं, आणि खास सख्या जमलेल्या; बेत अगदी जमतो. गप्पा टप्पा करत ही 'नमस्कार पन्ह' पार्टी  (hi tea सारखं) रंगते अगदी.
मग ओटीत घातले जातात ओले चणे.
घरी येऊन हे चणे तव्यावर तेलाचा काटा दाखवून खरपूस भाजून वर लिंबू, तिखट मीठ घालून मस्त लागतात. पण आज आपण जरा या देशी काळ्या चण्यांची विदेशी हम्मस डीप बनवण्याची पाककृती बघू.

साहित्य:

उकडून घेतलेले काळे चणे, भाजलेले गोरे तीळ, ऑलिव्ह तेल, लिंबू/ कैरी, पुदिना, लाल तिखट, मीठ, बेसिल पानं (तुळशीपण चालेल)

कृती:

सगळ्या गोष्टी मिक्सरवर फिरवून छान पेस्ट करावी. वाटीत घेऊन थोडं ओलीव्ह तेल आणि लिंबूरस (कैरी असेल तर लिंबू नको) टाकून फेटून घ्यावे.
असं हम्मस पिटा ब्रेड सोबत खातात, पण कटलेट, फ्रेंच फ्राईज अगदी सँडविच ला लावण्याची चटणी म्हणूनही हे हम्मस छान लागतं.

© दीप्ती पुजारी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment