Sunday, September 9, 2018

सांबार वडी/पुडाची वडी

सांबार वडी/पुडाची वडी

साहित्य

कोथिंबीर (निवडून, धुवून,चिरून, पसरुन ठेवावी), मिरची-लसूण-जिरे ठेचा,तीळ,धणे भरड, काजू-बदाम-किसमिस, खोबऱ्याचा किस,शेंगदाण्याचा कूट,हळद,तिखट,धणे, तीळ, मैदा,बेसन,हिंग,तेल,मीठ

कृती

• १ मोठी वाटी मैद्यात २ चमचे बेसन,तिखट,हळद,तेल,मीठ घालून घट्ट कणीक मळून घ्यावी.
• कढईत तेल तापल्यावर काजू बदाम किसमिस खरपूस तळून घ्यावेत.
• हिंग,धणे,तीळ,ठेचा, हळद,तिखट,खोबऱ्याचा किस, शेंगदाण्याचा कूट चांगले भाजून घ्यावे, मग यात कोथिंबीर घालून मिश्रण कोरडं होईपर्यंत चांगलं परतून घ्यावे.
• काजू,बदाम, किसमिस घालावेत आणि मिश्रण थंड होऊ द्यावे.
• कणकेचे लिंबाएवढे गोळे बनवून पारी लाटून वरील मिश्रण भरून आयताकृती आकारात वडी व्यवस्थित बंद करून घ्यावी.
• तेल तापले की वड्या तळून घ्याव्यात.

मस्स्स्त... लागतात...😋😋

जयश्री खराडे.

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

वैदर्भीय सांबारवडी

तयारी-साॅससाठी

चिंचेच्या कोळात काळा मसाला, गूळ, मीठ चवीप्रमाणे घालणे.

पारीसाठी -

दीड वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, मिरची पावडर, मीठ, तेल चवीप्रमाणे, बेकींग पावडर व ओवा अगदीच चिमटीभर घालून कणीक मळून ठेवावी.

सारणासाठी

मोठी कोथिंबीर गड्डी धुवून, निथळून, बारीक चिरुन ठेवणे.
अर्धी वाटी सुके खोबरे, पाव वाटी खसखस, थोडेसे तीळ सुरमट भाजून घेणे.
बारीक चिरलेला १ कांदा,
आले, लसूण, हिरवी मिरची वाटण,
काळा मसाला.
काजू, बेदाणे चवीनुसार तळून.

कृती

• तेल तापवून मोहरी तडतडावी.
• कांदा चांगला गुलाबीसर परतून आले-लसूण पेस्ट परतावी.
• त्यावर मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करावे. त्यावर धणा-जिरा पावडर, किंचित काळा मसाला, काजू, बेदाणे, खसखस, खोबरे, तीळ, वाटीभर बेसन घालून खमंग परतणे. •वरुन गूळाची पावडर, कोथिंबीर घालून सर्व मिश्रण चांगले एकत्रित करुन गॅस बंद करावा. •मिश्रण थंड होऊ द्यावे.
•कणकेची लिंबाएवढी पारी घेऊन ती उभट लाटावी, त्यावर पातळसर साॅस लावून कोथिंबीरीचे मिश्रण पसरावे.
•फोटोत दाखवल्याप्रमाणे वडी बंद करुन तेलात खमंग तळून घ्यावी.

दीपाली प्रसाद

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

गव्हाच्या पिठाचा हलवा

गव्हाच्या पिठाचा हलवा

साहित्य

१ वाटी कणीक - ही मऊसूत पोळ्यांची आहे
२ वाट्या पाणी
१ वाटी साखर
१ वाटी साजूक तूप
काजू,काळे मनुके,वेलची पावडर,केशर

कृती

१.प्रथम पाणी उकळून घेऊन त्यात साखर घालून बाजूला ठेवणे.
२.आता कढईत निम्मे तूप घेऊन तापवणे. त्यात काजू, केशर, कणीक क्रमाने झटपट घालणे.
३कणीक सुरमट भाजणे.
४.आता त्यात साखरेचे पाणी घालून झाऱ्याने सतत हलवणे.
५.लगेच मनुके, वेलची पावडर घालणे, मिश्रण ६.कडा सोडायला लागल्यावर हलवा तयार.
७.वेलची पावडर अगदी बेताचीच घालणे.

दीपाली प्रसाद

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

लिट्टी-चोखा

लिट्टी-चोखा

जेंव्हा पहिल्यांदा खाल्ले...😋 नावापासूनच नवखेपणा होता..
माझ्या बिहारी मैत्रिणीकडे टेस्ट केली ही डीश... त्यांची ऑथेन्टिक डीश!!
चोखा म्हणजे आपल्याकडच्या भरीतामध्ये थोडेसे बदल.आणि लिट्टी म्हणजे स्टफ केलेली बाटी.पण भारीच टेस्ट आणि कॉम्बिनेशन आहे हे...
तसे तर ही लिट्टी ते घट्ट रश्शाच्या चिकनसोबत खातात, अजब कॉम्बिनेशन आहे ना पण सुपर लागतं असं म्हणतात.😊
       इंडक्शनने पुकारलेल्या असहकाराने सगळी भिस्त ओव्हन महाराजांवर, मग हा पदार्थ तर होणेच होते...😄

साहित्य

लिट्टीसाठी - कणीक,डाळया/फुटाण्याची डाळ यांची मिक्सरमधे केलेली भरड (याला सत्तू म्हणतात),बारीक चिरलेला कांदा-लसूण, कोथिंबीर, लिंबू रस,तेल,मीठ
चोखा - भरीताची वांगी, बटाटा, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा-लसूण-हिरवी मिरची-कोथींबीर, लाल तिखट, तेल,मीठ

कृती

• गव्हाच्या पिठात कडकडीत तेलाचं मोहन घालून पिठाला चांगल चोळून घ्यावे. चवीपुरतं मीठ घालून घट्ट कणीक मळून घ्यावी.
• डाळयांच्या पीठात कांदा,लसूण, कोथिंबीर,मीठ, लिंबू रस घालून छान मिक्स करून घ्यावे, थोडसं पाणी शिंपडून साधारणपणे पिठाचा गोळा होईल असे पहावे.
• कणकेच्या लाटीत पुरणाप्रमाणे पीठ भरून सर्व बाजूंनी गोळा बंद करून घ्यावा.
• ओव्हन १८०°से १५ मिनिटे प्रीहिट करावे.
• सर्व लिट्टींना सगळीकडून तेल चोळून घ्यावे, ट्रेमध्ये लिट्टी ,ठेवून २० मिनिटे १८०°से बेक करून घ्यावे. मग लिट्टी उलटून दुसरया बाजूनेही १० मिनिटे बेक करावे. लिट्टी रेडी..
• वांगी,बटाटे ओव्हन/गॅस/कोळसे कशावरही खरपूस भाजून घ्यावेत. टोमॅटो ला खालच्या बाजूस चिर देवून ते पण भाजून घ्यावेत.
• साल काढून स्मॅश करून कांदा,लसूण,मिरची, तिखट,मीठ,कोथिंबीर घालून छान मिक्स करावे, तेल कच्चेच घालावे.
चोखा रेडी...

खायला देताना लिट्टी तुपात घोळवून चोखा,लोणचे,चटणी, कांदा लिंबू सोबत वाढावे.

तळटीप: लिट्टी डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवूनही भाजू शकता.

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

पॅटीस/चीज पॅटीस

पॅटीस/चीज पॅटीस

१.बटाट्याची भाजी करतो तशी करावी फक्त २.यात बटाटा भाजी पूर्ण बारीक स्मॅश करून घ्यावी.
३.सँडविच ब्रेड मिळतात ते फ्रेश आणावा.
तयार भाजी ब्रेड ला लावून त्यावर चीजचे एक स्लाईस ठेवून दुसरा ब्रेड चा तुकडा ठेवावा, आणि नंतर त्याचे त्रिकोणी चार काप करून घ्यावे.(आवडीनुसार नाहीतर दोन्ही चालतात)

बेसन आवरण

१.यात गरजेनुसार म्हणजे किती साधारण पॅटीस बनवतो, त्यावर,किती बेसन पीठ घ्यायचं ते घ्यावे.
२. त्यात चवीपुरतं मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा, हळद आणि मी यात एक्स्ट्रा पिझ्झा मसाला होता तो घेतला १ चमचा घालावे.
३.तयार मिश्रणात पाणी घालून ते प्रमाण थोडं पातळसर ठेवावे.(हवे असल्यास घट्ट ठेवू शकता)
४.पॅन मध्ये तेल गरम करण्यास ठेवावे आणि तयार ब्रेड  तुकडे बेसन मिश्रणात घोळून तळून घ्यावे, गरम गरम पॅटीस तयार !!😊

पुदिना चटणी:

मूठभर पुदिना, तेवढीच कोथिंबीर, अर्धा लिंबू रस, चवीपुरतं मीठ, २ ते ३ हिरव्या मिरच्या(तिखट किती हवे त्यावर) ४ पाकळ्या लसूण, आलं सर्व गोष्टी एकत्र मिक्सर ला बारीक करून पेस्ट करून घ्यावी.
पुदिना चटणी तयार 😁

रोशनी राजगुरू

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

तोंडली भाजी

तोंडली भाजी

तोंडली चिकट ,तुरट पण तोंड आले की खावीत !!

🔘साहित्य:

तोंडली,
लाल तिखट (ठेचा ,मिरची तुकडेही चालतील )
आले लसूण पेस्ट,
खोबरे कूट
मीठ

🔘कृती

१.तेलात फोडणी देऊन तोंडली परतून घ्या . २.वरील साहित्य टाका.
३.पाण्याचा शिपका मारा .
४.वाफेवर शिजवा .
५.अर्ध्याकच्च्या असताना गॅस बंद करा .
६.सुकी भाजी म्हणून खा.

काकासाहेब वाळुंजकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

पाकातली मावा-ड्रायफ्रुट करंजी

पाकातली मावा-ड्रायफ्रुट करंजी

साहित्य

मैदा,मिल्क पावडर, साखर, तूप,ड्रायफ्रुटची भरड, जायफळ पूड, वेलची पूड,मीठ.

कृती

• मैद्यात पाव चमचा मीठ, एक चमचा साखर, वेलची-जायफळ पूड आणि कडकडीत तूपाचे मोहन घालावे. तूप मैद्याला चांगले चोळून घ्यावे.याचे घट्टसर पीठ मळून घ्यावे.
•एक कप साखरेत अर्धा कप पाणी घालून पाक बनण्यास ठेवावा.चांगला उकळून घट्टसर झाला की गॅस बंद करावा.
•पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून मिल्क पावडर परतून घ्यावी, २ चमचे साखर घालावी.जायफळ-वेलची पूड घालावी.थोडं थोडं दूध घालून मिश्रण सतत हलवत रहावं. भांड्याला चिकटेनासं झालं की करंजीचं माव्याच सारण तयार.
• मैद्याच्या कणकेची मोठी पोळी लाटून, गोल कटरने छोट्या एकसारख्या पुऱ्या बनवाव्यात.
•पुरीवर माव्याची छोटी गोळी मग ड्रायफ्रुट भरड अस भरून करंज्या बनवून घ्याव्यात.
• मध्यम आचेवर तळून लगेच पाकात  टाकाव्यात.दुसरा करंजीचा लॉट तळेपर्यंत या पाकात ठेवाव्यात, मग निथळून बाजूला ठेवाव्यात.
• अजून थोडी ड्रायफ्रूट पूड वरून भुरभुरावी.

नक्की करून बघा..

ता.क - इथे खवा मिळत नसल्याने मिल्क पावडरशिवाय पर्याय नाही. तुम्ही हेच सगळे 'खवाच' वापरून करा.

जयश्री खराडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

ग्रैनोला बार

ग्रैनोला बार

ओटस्...
माझं सुपरफूड...फेवरेट फूड..
मी फक्त ओटस् खाऊनही जिवंत राहू शकते..भरपूर पदार्थ बनवते मी ओटस् पासून.
ग्रैनोला बार/एनर्जी बार तर खूप फेव्हरेट... खूप खूप पौष्टिक पदार्थांनी बनलेला आणि चटकन पोट भरणारा....

साहित्य

२कप ओटस्,१ कप भरडलेल्या डाळया,१ कप खोबरे,
प्रत्येकी अर्धा कप-१.शेंगदाणे भरड,
२.जवसाची बारीक पावडर,
३.तीळ,
४.हव्या त्या ड्रायफ्रुटस् ची भरड.
चॉकलेट चंकस्,मध,गूळ,पिनट बटर,मीठ.

कृती 

• ओटस् बेकींग ट्रेमध्ये पसरून १५-२० मिनिटे २००°सें. रोस्ट करून घ्यावेत.
• गूळ किसून घ्यावा.पीनट बटर,मध आणि गूळ चांगले एकत्र करून घ्यावे आणि १०-१५ मिनिटे तसंच झाकून ठेवावे.त्याला पाणी सुटतं.
• यात वरील सर्व जिन्नस घालावेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत.
• ट्रेमधे बेकींग शीट पसरून हे मिश्रण ओतावे. आणि थोपटून एकसारखे करून घ्यावे.
वर हवे ते टॉपींग्ज लावू शकता.
• ओव्हन १८०°सें. १०-१५मिनिटे प्रिहिट करावे.
• ओव्हनमधे ट्रे ठेवून १५-१७ मिनिटे १८०-१९०°सें बेक करावे.
• थंड होऊ द्यावे...
•हव्या त्या आकारात वड्या कापून घ्याव्यात. हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

मस्त खा...

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

केळीची भाजी

केळीची भाजी

साहित्य

कच्ची केळी, लाल मिरच्या, धणे, ओलं खोबरं, फोडणीचे साहित्य.

कृती

१.केळीच्या फोडी,मीठ घालून उकडून घेतल्या. २.लाल मिरची ,धने तेलात खमंग भाजले.
३.ओलं खोबरे ,वरील मसाला हळद वाटून भाजीत घालून पाच मिनिटं उकळले .
४.खोबरेल तेल ,हिंग ,मोहरी ,कढिपत्ताची वरून फोडणी दिली.

वैशाली मोरजकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

भरलेल्या मिरच्या

भरलेल्या मिरच्या

साहित्य

जाड मिरची, बेसन पीठ, तांदळाचे पीठ,मीठ , लाल तिखट , धणे-जिरे पावडर , हळद , आमचूर , चवी पुरती साखर.

कृती

१.मिरचीला उभी चीर दिली.
२. बेसन पीठ व तांदूळ पीठ तेलात परतले.३.सगळा मसाला पीठात घालून मिरचीत भरला.
४. हिंग , जिरे - मोहरी च्या फोडणी वर वाफेवर शिजवल्यात.
५.छान चविष्ट झाल्या आहेत.

वर्षा वाघ

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

सोया खिमा

सोया खिमा

१.२०-२५ सोयाबीन चंक्स मीठ घातलेल्या गरम पाण्यात भिजवून १० मिनिटांनी पिळून पाणी काढून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
२.कढईत तेल गरम करून बारीक चिरलेल्या २-३ मिरच्या, १ चमचा आलं लसूण पेस्ट,१ मोठा कांदा(बारीक चिरलेला),२ टोमॅटो(बारीक चिरलेला)हे सर्व परतून घ्यावे.
३.कुस्करलेले चंक्स व चवीनुसार मीठ घालून ५ मिनिटे शिजवून घ्यावे.
४. आता थोडीशी कोथिंबीर भुरभुरली की बस्स....
५.सोया खीमा तयार....😋😋😋

सानिका गावडे

धन्यवाद !!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

अन्नपूर्णा-कविता

रसगुल्ले

भारी ,भारीच गडे ,
गोल धवल रुपडे ।
तरंग सभोवती ,शर्करेचे कडे,
मधुर कसे, दुग्धाभ्र वडे ।
अन्नपूर्णेची जादू की गडे,
चाखण्याआधी रसना तडफडे।
नसे कोणा खाण्याचे वावडे ,
वाटते रस होऊनि गुल व्हावे ।
रसल्ले होऊन  रसनेवर विरावे  ,
परिसहात जपत स्मरत विहरावे।
साखर आरोळी मारत धावावे,
या मुखातून त्या मुखास तृप्तावे।
होऊन रसगुल्ले ,रसगुल्ले नमावे ।।

बासुंदी

छान आहे तुकबंदी ,
मस्त झाली पाक बासुंदी ।
काकांची का घ्यावी दीक्षा ,
वैशाली स्वयं सिद्ध लक्ष्या ।।

अन्नपूर्णेचे हात हजार,
कणाकणामध्ये भरली चव अपार।

© काकासाहेब वाळुंजकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

किती हे छान काम,
पहिला आला गुलाबजाम।
मग झाली घाई जयश्री,
ताईची आली रसमलाई।
गोड जिभेला चटका दयायला,
आला सोया चंक्स मसाला।
रसिकाची मग वाढली सीमा ,
सानिका ने पाठवला चपाती खिमा।
ह्या सर्वाना वा,वा देत ,
मग आला जेवणाचा साधा बेत।
वैभव भाऊचा प्रश्न सोडला,
संजय भाऊचा आत्मा तृप्त झाला।
अन आजचे पदार्थांची वा,वा करता करता ,
अन्नपूर्णा गटावरील सगळयांचा रसिका ज्वाला शांत झाला।

©वैशाली वेटाळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

ढेमसं भाजी

ढेमसं भाजी

पाककृती१

1) साधे चौकोनी तुकडे करून जिरं, मोहरी, कडीपत्ता घालून फोडणी करावे.
आलं-लसूण पेस्ट घालून लाल तिखट, हळद, मीठ घालून ढेमस्यांच्या फोडी घालून.. त्यावर झाकण ठेवावे..
झाकणावर पाणी घालून वाफेवर ही भाजी शिजवावी..
भाजी शिजली की त्यात थोडा गोडा मसाला,घालून मिक्स करायचे आणि कोथिंबिर घालून सजवावी.

पाककृती २)

वरील प्रमाणे चौकोन फोडी करूनच वरील प्रमाणेच फोडणी करून फक्त त्यात हरभरा डाळ किंवा मूग डाळ घालून भाजी करावी..

बाकर भरून भाजी

• छोटे छोटे ढेमसं घेऊन ते धुवून घ्यावे.
•त्या ढेमस्यांवर आडवा चिरा देऊन (पोट फोडून) त्यातल्या बिया काढून घ्याव्या..

••बाकर-

एक मोठा कांदा खूप बारीक चिरून घ्यावा.. चॉपर नी बारीक होतो तसा.. *त्यातच आलं-लसूण पेस्ट घालून, भाजीला लागेल त्या प्रमाणात लाल तिखट, हळद, मीठ, धने जिरं पूड, गोडा मसाला ,सुकं खोबरं किस घालून सर्व एकत्र कालवून घ्यावं.आणि हे मिश्रण त्या पोट फोडलेल्या ढेमस्यांमध्ये भरावं..

•असे सर्व ढेमसे तयार करून घ्यावेत.
• कढईत तेल तापवून घ्यावं.
•त्यात जिरं- मोहरी, कडीपत्याची फोडणी करून त्यात हे बाकर भरलेले ढेमसे सर्व व्यवस्थित गोल मांडून ठेवावे.
• झाकण झाकून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे.
•अधून मधून झाकण काढून वरखाली करावेत..
•शिजल्यावर त्यावर कोथिंबीर पेरून भाजी खायला घ्यावी..
•खूपच छान लागते ही भाजी..

सुजाता

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

हरबरा/हरभरा उसळ

हरबरा/हरभरा उसळ

साहित्य 

आठतास भिजत ठेवून नंतर मीठ घालून शिजवून घेतलेले हरभरे, कांदा,टोमॅटो, खवलेलं खोबरं अर्धा नारळ, मालवणी मसाला (किंवा गरम मसाला पावडर आणि लाल तिखट) तेल,आलं -लसूण पेस्ट , मीठ , कोथींबीर

कृती

•हरभरे मीठ टाकून चांगले शिजवून घ्यावेत.
•नंतर वाटणासाठी थोड्याशा तेलात उभा चिरलेला कांदा, मालवणी मसाला ,ओलं खोबरं परतवून घेऊन थंड झाल्यावर मिक्सरला लावून घ्यावं.
•भांड्यात दोन चमचे तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यावा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टॉमेटो पण परतवून घ्यावा नंतर तयार केलेलं वाटण त्यात परतवून घ्यावं..
•शिजवून ठेवलेला हरभरा घालावा.
•थोडं रटमटू द्यावं...
•शेवटी ओली कोथिंबीर भुरभुरावी...
•हरभरा उसळ तयार...

संजय गावडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

कुरडईची भाजी

कुरडईची भाजी माझी रेसिपी

कुरडईचा चुरा १/२ तास पाण्यात भिजत घालावा.साधारणमऊ झाल्या पाहिजे इतपतच.. पाणी निथळून सुटसुटीत करून घ्यावी. मग कांदा बारीक चिरून थोड्या जास्त तेलावर परतून घ्याव्या.जिरे मोहरी ,हिंग फोडणी ,हिरवी मिरची बारीक चिरुन घालावी.

(लाल तिखट पण चालेल)मग कुरडई घालून व्यवस्थित हलवून घ्यावे. कोथिंबीर घालावी,पावसाळ्यात ही माझी आवडती भाजी बरेचदा त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो मग वेगळी भाजी !! चव आणि दिसायला ही खरच सुंदर लागते.एकदा तरी करून बघाच ,मीठ काळजीपूर्वक घालावं कारण कुरडईत मीठ असतेच!

यामध्ये टोमॅटो, ढबू मिरची ऐच्छिक घालू शकता पण काही मसाले नाही घातले तरी ही भाजी चविष्ट लागते.
एकदा पाहुण्यांना शाकाहारी डिश म्हणून  केली होती ,वेगळाच भाव खावून गेली ही भाजी !!

डॉ संध्या झाडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

कडीपत्ता चटण्या

कारळे कडीपत्ता चटणी

साहित्य व कृती

भाजलेले तीळ-अर्धा वाटी,
कारळे-अर्धा वाटी 
अर्धा वाटी कडीपत्ता,
सुकी लाल मिरची - ५-६
२ टेबलस्पून तेल,
मीठ , हवे असेल तर लसूण.
     
मिरची, कडीपत्ता, तेलात परतून घ्यावे. आणि सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढून घेऊन चटणी करावी.

डाळे कडीपत्ता चटणी

साहित्य

अर्धा वाटी डाळे, लसूण अर्धा वाटी कडीपत्ता, ३चमचे तिखट, मीठ लिंबू रस, साखर,
२ टेबलस्पून तेल.

कृती

•तेलात कडीपत्ता, लसूण, तळून घ्या.
• लिंबूरस तेलात घाला. कड कड आवाज आला की डाळे घाला.तिखट घाला आणि परता.
•मग सगळे पदार्थ एकत्र करून बारीक करून घ्या.
•चटणी दह्यामध्ये घालून पण छान लागते.

अंजली अतुल जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

कढीपत्त्याची चटणी

     बहुतेक करून सगळेजण कढीपत्ता चटणीसाठी तळून घेतात. पण मी एक वेगळा प्रयोग  करून पहायचे ठरवले.... कढीपत्ता न तळता तसाच वापरण्याचा. यामुळे कढीपत्याचा घमघमाट चटणी संपेपर्यंत तसाच राहतो. थोडीशी काळजी घेऊन केले तर १५ दिवसांपर्यंत टिकते चटणी. बेंगलोरला कढीपत्त्याच्या काड्या नव्हे तर फांदीच विकण्यासाठी ठेवतात.

  सर्वप्रथम कढीपत्ता फांदी सकट बादलीमधे ३-४ वेळा पाणी बदलून खळबळून घ्यावा.नंतर काड्या काढून पिण्याच्या पाण्याने परत एकदा स्वच्छ धुऊन निथळत ठेवायचा. पूर्ण पाणी निथळल्यावर त्याची कोवळी व खराब पाने काढून टाकावीत....म्हणजे चटणी जास्त टिकते. पाने सुट्टी करून कट्ट्यावर पसरून ठेवावीत. थोड्यावेळाने जागा बदलावी म्हणजे राहीलेले पाणी गळून जाते. नंतर एक एक पान उलट सुलट कोरड्या कपड्याने पुसून घ्यावे... माझा या चटणीच्या वेळी दिवसभर हाच खेळ चालू असतो.

...नंतर पाने रात्रभर तशीच कट्ट्यावर पसरून दुसऱ्या दिवशी चटणी करते. उन्हात वाळवले/तळले की मूळ चव बदलते. मी १५-२० दिवसांची चटणी करून ठेवते. नंतर २-३ महिन्यांनी परत नंबर येतो या चटणीचा. त्यामुळे मी करते ते प्रमाण सांगते... तुम्ही सोयीनुसार करा.

साहित्य

कढीपत्ता ५०-६० काड्या
सुक्या खोबऱ्याचा किस १ वाटी
लसूण ९-१० पाकळ्या
फुटाण्याची डाळ ६ वाट्या
जिरे २ चमचे
लाल तिखट ६ चमचे
मीठ चवीनुसार .

कृती

•खोबऱ्याचा किस थोडा परतून थंड करून घ्यावा.
•वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र चांगले बारीक करून घ्यावे.
•अतिशय चविष्ट खमंग चटणी तयार.
•नंतर थोडावेळ ताटामधे पसरून पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
• माझ्या आईकडून कुठल्याही पदार्थाला लवकर शाबासकी मिळत नाही.
•पण ही चटणी तिला खूप आवडते.😎. यातच  मी भरून पावते.😊
  
डॉ.अस्मिता भस्मे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

मखाणा चिवडा

मखाणा चिवडा

साहित्य

२०० ग्रॅम मखाणा,
१ पळीभर तेल,
फोडणीला मोहरी, हळद, मीठ, साखर, कडिपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मिरची पावडर.

कृती

• तेल कडकडीत तापवून त्यात मोहरी टाकावी.
• मोहरी तडतडले की त्यात हळद, मीठ, साखर, कडिपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मिरची पावडर हे सर्व साहित्य घालावे.
•गॅस बंद करुन सर्व मिश्रण एकजीव करुन त्यात माखाणे घालून चांगले ढवळून घ्यावे व आस्वाद घ्यावा.

दीपाली प्रसाद

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

भरलेली कारली

भरलेली कारली

साहित्य

कारली, कांदा, जिरे, तिखट,हळद, आमचूर पावडर,गरम मसाला (आवडत असल्यास) मीठ,कोथिंबीर,तेल.

कृती

•कारल्याचा वरचा भाग जरा किसून काढावा. •मग मध्ये एक चीर देऊन मिठाच्या पाण्यात उकळावी.
•उतरवून त्यातील बिया छोट्या चमच्याने काढून टाकाव्यात.
•एका कढईत तेल घालून त्यावर जिरे परतून कांदा परतावा बाकी मसाले घालावेत.
• कोथिंबीर घालून थोडे थंड करून वरील कारल्यामध्ये भरावेत जर वाटत असेल मसाला बाहेर येईल तर दोरा बांधावा.
•थोड्या तेलात भरलेली कारली परतावीत. •शिजलेली असल्यामुळे जास्त परतायची गरज नाही.

रिमा मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

सोया चंक्स मसाला.

सोया चंक्स मसाला.

     माझ्या छोट्या मुलीला सोयाबीनची भाजी खूप आवडते. खूप दिवसात स्पेशल काही केले नव्हते म्हणून करायचे ठरवले.काल शनिवार...शनिवारी संध्याकाळी मी सुट्टी घेते.इतर दिवशी रात्रीचा स्वयंपाक ६.३०च्या आतच करून जाते. काल घरीच असल्याने थोडी टंगळमंगळ करत स्वयंपाकाला उशीर झाला. तोपर्यात माझी छोटी मुलगी झोपी गेली. इतर वेळी तिला जेवण्यासाठी झोपेतून उठवणे तसे कठीण... पण काल सोयाबीनची स्पेशल भाजी केलीय असे म्हटल्यावर पटकन उठली. तर सोये हुए को जगानेवाला असा हा सोया चंक्स मसाला.

    ग्रेव्हीची भाजी करताना दरवेळी माझे प्रयोग सुरू असतात.... यावेळी बनवलेली ग्रेव्ही चाबूक की काय म्हणतात ना, तशी झाली होती.

साहित्य

        सोया चंक्स, कांदे २, टोमॅटो २, लसूण ५ पाकळ्या, १/२ इंच आले,१हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, काळे मिरे ८, लवंग १, चक्रीफूलाची १ पाकळी, तमालपत्र पानाचा १इंच तुकडा,दालचिनी १/२ इंच, धणेपूड १/२ चमचा, जिरेपूड १/४ चमचा, लाल तिखट, १ १/२ चमचा, मगज बी चमचे, बदाम ३, काजू ५, वेलदोडा १,दही १चमचा, मीठ चवीनुसार. फोडणीसाठी ३ चमचे तेल, २चमचे तूप,१/२ चमचा जिरे.बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.

कृती:

•एका भांड्यात पाणी गरम करून ५ मिनिटे सोयाचंक्स शिजवावेत.
• कढईमधे तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा मस्तपेैकी लालसर भाजून घ्यावा.
•थंड झाल्यावर त्यामध्ये बाकी सगळे साहित्य घालून मिक्सरमधे चांगले वाटून घ्यावे.
•एका कढईमधे तेल व तूप गरम करून त्यामध्ये जिरे टाकावे व वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतावा व शिजवलेले सोयाचंक्स आणि पाणी टाकून उकळी आणावी.
•वरून कोथिंबीर भुरभुरावी.
  
डॉ. अस्मिता भस्मे

धन्यवाद!!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा