रसगुल्ले
साहित्य
१ लीटर दूध,१ कप साखर,२ चमचे मैदा, साबूत वेलदोडे, केशर काड्या, व्हिनेगर
कृती
• पातेल्यात १ लीटर दूध उकळण्यास ठेवावे, दूध खळखळून उकळल्यानंतर २-३ चमचे व्हिनेगर दूधात घालावे. गॅस बंद करावा. पातेले न हलवता ५ मिनिटे तसेच ठेवावे.
• ५ मिनिटांनंतर एका सुती कपड्यातून हे गाळून घ्यावे, कापडाची पुरचुंडी करुन हलके हलके दाबून पाणी काढून टाकावे, जास्त दाबून पाणी काढू नये अन्यथा मिश्रण जास्त कोरडे होवून रसगुल्ल्यांच्या ओलसरपणात फरक पडतो.
• ही पुरचुंडी १-२ तासांसाठी कुठेतरी लटकून ठेवावी,म्हणजे अतिरिक्त पाणी निघून जाईल.
• २ तासांनंतर पुरचुंडी सोडून हे मिश्रण ताटात/परातीत काढून घ्यावे आणि तळहाताने दाब देऊन चांगले मळून मऊसूत करून घ्यावे. यात २ चमचे मैदा घालावा व व्यवस्थित मळून घ्यावे.
(* मैदा मिक्स केल्याने रसगुल्ले पाकात विरघळत नाहीत.)
• पीठाची एक गोळी बनवून बघावी, जर यावर क्रॅक्स दिसले नाहीत मऊसूत गोळी बनली तर पीठ व्यवस्थित मळले गेले, नाही तर आणखी थोडावेळ पीठ मळून घ्यावे.
पीठाचे छोटे छोटे रसगुल्ले बनवून घ्यावेत.
• एका बाजूला पाक बनवून घ्यावा, पाक बनवताना १ कप साखरेत ३-३.५ कप पाणी टाकून उकळण्यास ठेवावे, वेलदोडे टाकावेत.
• पाक चांगला उकळला की केशरकाड्या घालाव्यात आणि मोठया आचेवरच गोळे पाकात सोडावेत, झाकण ठेवून ८-१० मिनिटे असेच उकळू द्यावेत.मग झाकण काढून ४-५ मिनिटे बारीक गॅसवर उकळू द्यावे.
• गॅस बंद करून, भांड्यावर झाकण ठेवून असेच साधारण १ तासासाठी रसगुल्ले मुरु द्यावेत.
• एक तासानंतर फ्रिजमध्ये ठेवून मस्त थंड करून घ्यावेत.
खायला देताना वेलदोडे काढून, आवडत असल्यास पिस्त्याची पूड भुरभुरून द्यावेत...
जयश्री खराडे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment