Thursday, March 15, 2018

कोथिंबीर तिखट आणि पोहे

कोथिंबीर तिखट आणि पोहे

साहित्य -

कोथिंबीरीची एक जुडी, सुक्या खोब‍ऱ्याची एक वाटी, लाल तिखट, थोडं ज‌िरं, मीठ.

कृती -

ज‌िरं थोडंसं भाजून त्याची पावडर करून घ्यावी. खोबरं किसून भाजून घ्यावं. कोथिंबीर निवडून आणि धुऊन घ्यावी. बारीक चिरुन ठेवावी.

भाजलेलं खोबरं मिक्सरमधून बारीक करुन घ्यावं. त्यात ज‌िरे पावडर मिसळावी. ते वेगळं काढून घ्यावं. मग चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार लाल तिखट, मीठ घालून मिक्सरमधे वाटून घ्यावं. त्यात वाटलेलं खोबरे, ज‌िरे पावडर मिसळावी. पुन्हा एकदा चांगलं वाटून एकजीव करावं.हे झालं कोथिंबीरीचे तिखट तयार! हे तिखट उपासालाही चालतं. त्यात दही घालून किंवा नुसतंही आपण ते खाऊ शकतो. पोळी किंवा भाकरीबरोबरही ते छान लागतं.
कोथिंबीर ओली असते, त्यामुळे हे तिखट लगेच डब्यात भरु नये. तिखट तयार झालं की दोन-तीन तास ताटात पसरुन ठेवावं. थोडंसं वाळल्यानंतर डब्यात भरावं.

आता पोह्यांची तयारी करू.

थोडेसे जाडे पोहे भाजून त्यात कच्चे गोडेतेल, तयार केलेलं कोथिंबीरीचे तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून कालवा. मस्तपैकी इन्स्टंट नाश्ता तयार होईल.

सविता करंजकर.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment