Thursday, March 15, 2018

दहिवडी


मुगडाळीचे दहिवडे:

2 वाट्या मुगडाळ, अर्धी वाटी उडीद डाळ 2 तास वेगवेगळ्या भिजत घालाव्यात.
उपसून थोडी हळद, काळे मिरे, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर, थोडे खवलेले नारळ (ऐच्छिक) घालून वाटून घ्यावे. इडलिपीठापेक्षा थोडे घट्ट रवण असावे.

एकबाजूला  अर्धे दही लोणून त्याचे घट्टसर ताक करून घ्या. त्यात साखर, मीठ, हिरवी मिरची +आलं+जिरं  वाटून, कोथिंबीर आणि सैंधव मीठ घालून ढवळून ठेवा.

आता, तेल तापवत ठेवा. गरम झाल्यावर थोडे मोहन  आपल्या रवणात सोडा. ढवळून छोटे छोटे (आठवा लग्नांमध्ये मिळणारे मिनी बटाटे वडे) वडे तेलात तळायला सोडा.

वडे बाहेर काढले की पाण्यात न टाकता ह्या ताकात सोडा.

आयत्या वेळी उरलेले अर्धे दही फेटून त्यात चवीनुसार साखर मीठ घालून वडे सोडलेल्या मिश्रणात ओता.

खजूर, चिंच, जिरं आणि मीठ घातलेली चटणी आणि पुदिना, मिरची, आलं, कोथिंबीर , मीठ अश्या दोन चटण्या वरून वाढण्यासाठी ठेवा.

तळटीप: उगाच वडे तळायला कंटाळला असाल तर सरळ वाण्याकडे जा, छानसे बटर(चाहसोबत खाण्यासाठी जो गोल गोल बेकरी पदार्थ मिळतो तोच)  विकत आणा, आणि खाण्यापूर्वी 15 मिनिटे तयार दह्यात सोडा, दहिवड्याचा विषय मोडा.☺️

© दीप्ती पुजारी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment