Saturday, March 3, 2018

चला दही लावू!!

दही लावणे!!

दही लावणं ही कला आहे . पण सुगरणी दही ऊत्तम लावतात ते नकळत त्यातील शास्त्र पाळून.

त्या काय करतात मी माझ्या आईवरून सांगते .आई दुध तापवायची , त्याचं तपमान काटापाणी झालं की दह्याचं १चमचा विरजण हळूच सोडायची .आणि दह्या साठी खास चीनी मातीचा सट होता आमच्याकडे . ऊभा, पसरट दोन्ही होते . आहेत अजूनही  . भांडं गरम ऊबदार राहील असं ठेवायची . विरजणाचं काहीतरी बिनसलं तर  नेहमी आजी कडून विरजण आणायची,  शेजारून विरजण आणताना मी कधीच पाहिलं नाही . आजीचं विरजण कायमच मस्त असायचं नि सायीचं दहीसुध्दा .

पुढे त्यातील शास्त्र कळलं . दही विरजण लावल्यावर ऊबदारच हवं नाही तर जीवाणू वाढणार कसे ? परवा भाचीने सट मागितला तेव्हा सारं आठवलं . विरजण लावल्यावर   दूध घुसळायचं तरी  किंवा आधीच  सर्व बाजूकडून विरजण लावून घ्यायचं .   म्हणजे मग छानच लागतं दही .

ऊन्हाळ्यात ३/४तासात ही लागतं . थंडीत मात्र २४तासही लागतात . तपमानाचा फरक दुसरं कायं ?
एकदा  माझ्याकडे विरजण नव्हतं पण दूध खूप होतं ,मला तर दही खायची हुक्की आली होती  कारण थालीपिठं केली होती .

मग कधीतरी वाचलेले आठवलं . लाल किंवा हिरवी मिरची ऊभी चिरून दुधात घाला . मी घातली तशी नि काय लागलयं दही ! वा मस्त . नंतर आत्ताआत्ता यू ट्यूबवर  पाहिली ही पध्दत. यापुढे  कोणाकडे मागायला नको  म्हणून ही फार आवडली. चांदीच्या नाण्याचंही करून बघितलं  .नाही लागलं . पण ते विरजण वापरून पुढचं दही मात्र छान लागलं  .

दह्याच्या ऊपयुक्ततेबद्दल काय लिहावं ? सर्वांनी दही खायला हरकत नाही  ,दह्या पेक्षा दह्याची  निवळ व ताक चांगलं .पण ताक सुध्दा मिक्सरचं नको . घुसळलेलचं हवं तरच त्यात ताकाचं ताकपण येतं मिक्सरला ती चव नाही ,पातळ बेचव ताक ते . मला ताक करताना गणित लागायचं शेवटी मी शोधून काढलं  १०० वेळा घुसळलं की साधं ताक  छान होतं ,सायीच्या ताका साठी ५००वेळा घुसळावं लागतं .  ताक सुध्दा लयीत घुसळलं तर त्या घुसळण्याच्या आवाजावरून ताक होत आलयं का? इतकं सुगरणी  अचूक सांगू शकतात .  घुसळण्याने हातावरचे दाबबिंदू छान दाबले जातात ,त्यामुळे निराशेचा विकार टाळता येतो म्हणूून   एका मैत्रीणीचा  नवरा तिला ताक घुसळून द्यायचा .किती छान विचार! करायला हरकत नाही हा उपाय . तर ताक हे  जगातील अतिसुंदर ऊपयोगी पेय आहे . साक्षात देवराज ईंद्रालाही ते दुर्लभ अशा आशयाचे एक सुभाषितही प्रसिध्द आहेच .

ताकातले जीवाणू आतड्यातील पचनाला मदत करतात ,म्हणून जर बाळाला ,लहान मुलांना जुलाब झाले तर ताक द्यायचं  ऊठसूट जुलाब थांबवायसाठी गोळ्या घेतल्या तर हे ऊपयुक्त जीवाणू मरून जातात. . पचन आणखी बिघडते . म्हणून शरीराशी बोला. त्याला कशाची गरज वाटतेय ते विचारा, एकदा का माणसं अशी शरीराच्या भाषेप्रमाणे वागायला लागली तर मग डॉक्टरही नको  गोळ्याही नकोत .  काय मग ?आज पासून ताक स्वतः घुसळून प्यायला सुरूवात करणार ना ?मीही केलय!!

डॉ वृंदा कार्येकर
पुणे

टीप

डॉ.तृप्ती लोणकर
दुधात दही घालून जर कुकरमधे ठेवून पाच मिनिटात गॅस बंद केला तर तासाभरात दही लागते

डॉ वृंदा कार्येकर:-
दुध गरम घेऊन मिरच्या( २वाडगा भर दूध )फोडून  ऊभी चिरून दुधात घाला ,ठेवून द्या  लागतं ५/६तासात आता प्रत्येकीचे वेगळे ऊपाय आले आहेत करून कळवा .

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment