Friday, March 9, 2018

इस्ट इंडियन बाटली मसाला:

इस्ट इंडियन बाटली मसाला:

मुंबईजवळील पालघर, ठाणे ह्या बाजूला East Indians ह्या नावाने ओळखला जाणारा ख्रिस्त समाज त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. त्यांचा East Indian बाटलीतील मसाला  मांसाहारी खवैयांमध्ये  खूप प्रसिद्ध आहे. तर ह्या मसाल्याची आणि नंतर त्यापासून तोंपासू

कोंबडी रश्याची बैजवार कृती:

कोरडा मसाला:

साहित्य

3किलो रेशीम पट्टी मिरच्या. (इथे ब्याडगी नका घेऊ, चव वेगळी असते रेशिमपट्टीची)
250 ग्रॅम हळकुंडे
250 ग्राम तीळ
250 ग्रॅम मोहोरी
250 ग्रॅम जिरे
250 ग्रॅम खसखस
250 ग्रॅम कबुली चणे
250 ग्रॅम गहू
250 ग्रॅम काळी मिरी
50 ग्रॅम दालचिनी
50 ग्रॅम धने
10ग्रॅम बडीशोप
10 ग्रॅम जावंत्री (जायफळाची फुलं)
10 ग्रॅम वेलदोडे(मोठे)
10ग्राम लवंगा
10 ग्राम गोलमीरच्या (सर्वसुगंधी, हे शेपूट असलेल्या काळ्या मिऱ्यांगत दिसतात)
10 ग्रॅम तिरफळ
10 ग्रॅम नागकेशर
10 ग्राम जायफळ
10 ग्राम बाजा फुल
5 ग्राम शाहजिरे

कृती

सर्व साहित्य साफ करून वेगवेगळे कोरडे भाजून मग दळून घ्यावे.

ह्या मसाल्याला इस्ट इंडियन बाया बिअर च्या रिकाम्या बाटलीत (का?🤔- त्या गडद रंगाच्या असल्याने मसाल्याला थंड ठेवीत असाव्यात असा माझा अंदाज आहे.) ठासून भरून ठेवत असत. त्यामुळे ह्या मसाल्याला बाटली मसाला असं म्हणतात.
तर भरताना बिअर बाटल्या किंवा अंबर रंगाच्या काचेच्या बरण्या वापरा.

आता इस्ट इंडियन बॉटल मसाला वापरून चिकन:

1. चिकनला साफ करून दही, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि थोडा बॉटल मसाला लावून 3-4 तास शीतकपाटात मुरवत ठेवावे.

2. 1 किलो चिकनला 3-4 कांदे, 3 मोठे टोमॅटो, चवीनुसार लसूण आणि आले (लसूण जास्त छान लागतो.)बारीक कापून घ्यावे.
3. चवीनुसार चिंचेचा कोळ (मी 4 ते 5 पोहे खाण्याचे चमचे घेते)
4. कढीपत्ता, 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून

5. इतका जामानिमा झाला की कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण, आलं, कांदे घालून परतावे. कांदे गुलाबी रंगावर आले की टोमॅटो आणि थोडे मीठ घालावे.
5-6 टे चमचे बाटलीतील मसाला घालावा.
मिश्रण तेल सोडू लागले की चिकन घालून 5 मिनिटे परतावे.
गरम पाणी (रश्याची जेवढी आवड असेल त्या प्रमाणात) घालून झाकून शिजु द्या.

आता रश्याच्या प्रमाणात नारळाचे दूध काढून घ्या. 2-3 पाण्यापर्यंतही चालेल.

चिकन 20 मिनिटांत शिजत येईल, तेव्हा नारळाचे दूध, चिंचेचा कोळ टाकून एक उकळी आणा.
वर कोथिंबीर भुरभुरा.

आता हे चिकन आंबोळ्या, नीर डोसे, पोळी किंवा भात कश्याहीसोबत खा.

तळटीप

कोरडा मसाला करण्याचा  कंटाळा येत असेल तर ज्यूड'स रेसिपी ह्या ब्रँड चा आयता ईस्ट इंडियन बॉटल मसाला फर्मास मिळतो. तो आणा आणि सुटा.

दीप्ती पुजारी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment