Wednesday, March 7, 2018

टोमॅटो डोसा

टोमॅटो डोसा

साहित्य : 

तीन  वाट्या तांदूळ ,
सहा मोठे लाल टोमॅटो (चिरून फोडी करून) ,
दोन कांदे ,
४-५ लाल सुक्या मिरच्या,
चिमूटभर मोहरी,चिमूटभर हिंग,अर्धा चमचा जिरे
चवीनुसार मीठ.

डोशाचे पीठ बनावण्याची कृती :

तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन ३-४ तास पाण्यात भिजत घालून ठेवा.
चार तासांनी भिजवलेले तांदूळ,टोमॅटोच्या फोडी व लाल सुक्या  मिरच्या मिक्सरवर फिरवून वाटून पेस्ट करून घ्या.
आता ही वाटलेली पेस्ट एका मोठ्या पातेल्यात काढून घ्या व त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
या पेस्टमध्ये पाणी घालून साधारणपणे नेहमीच्या डोशासाठी भिजवतो तसे पीठ भिजवा. आता हे पीठ चांगले फेटून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व मिक्स करा.
डोशाचे पीठ तय्यार आहे.

डोसा बनवण्याची कृती :

गॅसवर डोशा चा  तवा तापत ठेवा. तवा तापल्यावर आंच मंद करा. तव्याच्या पृष्ठभागावर कच्चा बटाटा किंवा कांदा फिरवून घ्या आणि हाताने थंड पाणी शिपडून सूती फडक्याने तवा पुसून घ्या.
एका वाटीत डोशाचे पीठ घेऊन ते तव्यावर मध्यभागी थोडेसे ओता आणि ओल्या वाटीने तव्यावर गोल गोल फिरवत सगळीकडे पसरवा. जितके शक्य तितके पातळ पसरा.
डोश्याच्या कडेने उलथण्याने थोडे तेल सोडा व गॅसचे आंच वाढवा.
डोसा सोनेरी ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या.
रंग बदलून ब्राऊन झाला की उलथण्याने डोसा पलटी करा व दुसर्यार बाजूने भाजून घ्या.
डोसा दोन्ही बाजूंनी चांगला भाजला गेला की तव्यावरून सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्या आणि आपल्या एखाद्या आवडत्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या कोरड्या पूड चटणीसोबत सर्व्ह करा.

रश्मी काजरेकर-पाताडे

टिप्स :

डोश्याचे पीठ शिल्लक उरले व जर १-२ दिवस जुने झाले तर ते टाकून न देता त्यात दोन टेबलस्पून दूध घालून अर्धा तास बाजूला ठेवून द्या. अर्ध्या तासाने पीठातील अतिरिक्त आंबटपणा निघून जाईल आणि ते पुन्हा डोसे घालण्यासाठी वापरण्यास योग्य होईल.

सविता आंबेकर

नेहमीचेच डोसा पीठ पण त्यात बारक चिरलेला कांदा-टोमॉटो, गाजर आणि बीट किसुन ,बारीक चिरलेली मिरचि व  चवीनुसार मीठ घालुन केला!!!  अशा प्रकारे बीट गाजर खाल्ले जाते.बीट गाजर खीऊ घालण्या साठी, मुलांसाठी उत्तम पर्याय

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment