Saturday, March 3, 2018

लेख-घरातली फ्रँकी

मुलांना वैविध्यपूर्ण खाऊ काय करायचा?असा प्रश्न पडलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि स्वयंपाक घरात रस असणाऱ्या सगळ्यांसाठीच एक छान अनुभव सांगतेय....
परवाची गोष्ट.नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळची कामे उरकली.स्वयंपाकही झाला.मटणमसाला घालून केलेली फ्लॉवर बटाट्याची भाजी,कढी,तूरडाळीची चिंचगुळाची आमटी,भात ,चपात्या...असा साधा मेनू होता.(सुदैवाने माझी मुलं लहानपणापासून सगळ्या भाज्या आनंदाने खातात.असाच मेनू त्यांना आवडतो.जंक,फास्टफूडही आवडीने खातात पण प्रमाण कमी....बरेचदा घरीच करतो आम्ही)वैष्णवी आणि तिचे बाबा डबा घेऊन गेले.सर्दीमुळे चिरंजीव दहा वा उठले.स्वारी अक्षरशः खाबूगिरी करणारी...प्रचंड चवीनं खाणारा...तो आधी जेवण डोळ्यांनी जेवतो....भाज्या शिजवण्यापूर्वी कोणत्या रंगाच्या होत्या,काय घातल्याने रंग बदलला,एवढा मोठा कांदा भाजीत दिसत कसा नाही,असे असंख्य प्रश्न घेऊन स्वयंपाकघरात रेंगाळत असतो तो.
तर त्या दिवशी त्याला काहीच खायची इच्छा नव्हती.मग अळम् टळम् करत दुपारचा एक वाजला.औषध घेण्यासाठी तरी जेवलंच पाहिजे, असं सांगितलं तेव्हा चिरंजीव तयार झाले....पण.......
आज चटपटीत खायचा मूड होता.पिझ्झाच हवा,नाहीतर नकोच जेवायला या मुद्द्यावर गाडी अडली.
मी मागवू शकत होते किंवा दुसरं काहीतरी बनवूही शकत होते.पण मला केलेलं वाया जाऊ द्यायचं नव्हतं...मग मी घोषणा केली..(एव्हाना वैष्णवीही भूक भूक करत आली होती)...
आज मी फ्रँकीज् बनवतेय..
पण होईपर्यंत कुणीच स्वयंपाकघरात यायचं नाही......
आयतीच टीव्हीपुढे बसण्याची संधी /मुभा मुलांना मिळाली. ती कोणतं चैनेल लावायचं यावरून भांडू लागली आणि मी शांतपणे मोर्चा चुलीकडे वळवला.
सर्वात आधी नारळ-पुदिन्याची चटणी बनवली.मग तवा गरम करायला ठेवला.तव्यावर घरचं...हो चक्क घरचं लोणी टाकलं ,त्यावर सकाळी केलेली चपाती गरम करायला ठेवली.चपातीला सॉस लावला वरून पुदिन्याची चटणी लावली,चाटमसाला भुरभुरला चपातीच्या अर्धगोल भागात फ्लॉवर ची भाजी ठेवली.चपातीचा राहिलेला भाग दुमडला..आणि मंद गैसवर ती चपाती दाबून दाबून कुरकुरीत होईतो खमंग भाजली.भरपूर लोणी लावलं..
तो अर्धगोल खाली उरतवून पिझ्झा ज्या आकारात कापतात त्या आकारात कापली..छोट्या डिशमधे ठेवले ते पीसेस आणि मुलांना बोलावलं.
खमंग वासाने अर्ध्याहून अधिक काम केलेलचं...उरलंसुरलः काम रंग आणि आकाराने केलं..
अक्षरशः ओरडली मुलं...खाऊन पाहिल्यावर चा त्यांच्या चेह-यावरचा आनंदच सगळं सांगून गेला.
आई,तू कश्श्ली भारीयैस गं !!
या वाक्याने मी " वर्ल्डस् बैस्ट शेफ "असल्याचं जाहीर करून टाकलं माझ्या बोबडकांद्यानं...
सहा चपात्या कमी पडल्या.
रात्रीच्या औषधांची आता गरजच उरली नाही ,असं चिरंजीवांनी ठरवलं.
पुन्हा कधी हा मेनू करशील गं आई?
असा लाडीक प्रश्न विचारत स्वारी गळ्यात पडली...
आणि मी आता कोणती भाजी संपवायचीय ,हे तपासायला फ्रीजकडे वळले....

- सविता कारंजकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment