🔺उकडीचे गुळसाखर मोदक🔺
मला उपवास हा प्रकार 'मिठाईच्या दुकानात मधुमेही'असा वाटतो .पण कोण करत असेल तर उपवासाचा वनवास न करताही मिटतो ...दोन वेळा मर्यादित जेवणाऱ्या अर्धशतकी वयाच्या व वजनाच्या माणसाला उपवासाने धरावे ? पण हल्ली उपवासाच्या नावाखाली हादडायची फँशन आलीय .देवाच्या नावावर हल्ली काय खपवले जात नाही?
आज अंगारकी .देवाला मनापासून काहीच न देणे हीच माझी भक्ती कारण त्याच्याकडून काही घेणेही नाही ; पण श्रद्धा व विश्वास अढळ .कुठलेही अवडंबर ,कर्मकांड नाही .पण हिची गणेशभक्ती फारच कडक! या उपवासावरून अनेकदा वाग्युद्धाचे प्रसंग येतात. पण नेहमी मलाच पांढरे निशाण दाखवून शस्त्रसंधी करावी लागते .बहुधा माझ्यासारखे समरप्रसंग नवरे नावाच्या प्राणिमात्रावर नेहमीच गुदरतात म्हणून मला भयभीती वाटण्याचे कारण नाही .
तर मोदक व तेही उकडीचे व मी करावेत असे ठरले कारण कडक उपवासामुळे प्रतिपक्षाची तब्बेत अशक्त झालीय !चला सैन्यातल्या शिस्तीत बदल होईल पण या या देशात यच्चयावत नवरे नाही का म्हणतील?
पण एक अट, 'तू धावते वर्णन करायचे व मी मोदक धावा करायच्या 'याला मान्यता मिळाली व स्वयंपाक क्षेत्ररक्षणास आम्ही तयार झालो व कॉमेंट्री सुरू झाली .
साहित्य:
१ नारळ कीस (खोबरे ही चालेल )
किसलेला गूळ
२ कप तांदूळाचे पीठ
वेलचीपूड
मीठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप
कृती:
१) सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्या. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्या. जितक्या वाट्या कीसलेला नारळ असेल त्याच्या आर्धा किसलेला गूळ व थोडी साखर घ्या.
पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळसाखर एकत्र करून मंद आचेवरपरतत राहा. गूळ वितळला की वेलची पूड टाका. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.
२)पारीसाठी तांदूळाची उकड करण्यासाठी जितके पीठ तितके पाणी असे प्रमाण घ्या. २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी गरजेचे असते मी हो म्हणत मान डोलवली .
३)जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवा. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घाला. चवीसाठी थोडे मीठ घाला. गॅस बारीक करून पीठ घाला.उलथण्याने ढवळा. गोळगाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या . मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊन गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवा.
४)ताटात तयार उकड काढून घ्या. ही उकड व्यवस्थित मळून घ्या .चांगली एकजीव करा . त्यासाठी कोमट पाणी आणि थोडे तेल घ्या. तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्या.
५)उकड व्यवस्थित मळून झाली की त्याचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्याची पारी तयार करा. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या करा. आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करा.
६)चाळणीवर किंवा शिट्टी न लावता मोदक उकडायला ठेवा . वरून झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढा.
आता झाले तुमचे काम ते थंड होऊ द्या .चंद्रोदय व्हायला अवकाश आहे .मी मध्येच म्हटले," एक खाऊन बघू का ?","खा ना ,पण त्या अगोदर विशाल गणपतीच्या दर्शनाला चला. आज खूप गर्दी असणार आहे. निदान दहा तरी वाजतील परत यायला. मग मीच देईन! 'गुळसाखरेचा मोदक' माझ्या गणपतीला"
काकासाहेब वाळुंजकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment