🔷कढी गोळे🔷
जोपर्यंत कढीगोळे खाल्ले नव्हते तोवर कढी-भजी इज दी बेस्ट अशाच भ्रमात होते...
पण लो-कॅलरीज कढी गोळे खाल्ल्यानंतर...एकदम मस्त!!!
तशी मला फारशी कढी आवडत नाही, पण कढीगोळयांसोबत जेवढी जाईल तेवढी ओके.. कढीगोळे हा विदर्भातला, मुख्यत: हिवाळ्यात होणारा प्रकार कारण ओल्या तुरदाण्यांपासून होणारा हा पदार्थ, बाकी वेळी तुरडाळ+ किंचित हरभराडाळ भिजत घालून करतात...
नमनालाच गेल घडाभर तेल.. कृती च सांगते
साहित्य:
गोळयांसाठी -
अर्धी वाटी तूरडाळ+२ चमचे हरभराडाळ २ तास पाण्यात भिजवून उपसून काढून ठेवावी, लसूण,
हिरवी मिरची,
जिरे,
कोथिंबीर,
मीठ.
कढीसाठी-
आंबट दही,
बेसन,
हिरवी मिरची,
लसूण,
कढीपत्ता,
मोहरी,
हिंग,
अगदी चिमूटभर हळद,
मीठ,
साखर,
तूप
फोडणीसाठी
तेल,सुक्या लाल मिरच्या,लसूण,जिरे.
कृती :
* गोळयांचे सर्व साहित्य मिक्सर मधून अजिबात पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे.
* पातेल्यात तूप गरम झाल की मोहरी, हिंग नंतर लसूण घालावा,मग मिरची , कढीपत्ता, चिमूटभर हळद छान तडतडलं की बेसन,मीठ घालून घुसळलेल दही घालावं.
* थोडी पातळच कढी ठेवावी कारण गोळ्यांमुळे दाटपणा येतो.
* कढी उकळली की छोटे छोटे गोळे कढीत सोडावेत.
* हे गोळे शिजले की कढीवर तरंगतात.
* कोथिंबीर टाकून पातेलं गॅसवरून खाली उतरवावे.
* फोडणीपात्रात तेल गरम झाले की जिरे,लसूण टाकावं, लसूण लालसर झाले की लाल मिरच्या घालाव्यात.तेल तयार...
ओल्या तूरदाण्यांच्या कढीगोळयांची मजा औरच असते.. पण सध्या पर्याय नाही.
खायला देताना थोड्या खोल भांड्यात कढीगोळे वाढावेत मग हे फोडणीचं चुरचुरीत तेल घालावं..
भाकरीसोबत तळलेली लाल मिरची कढीगोळयांसोबत कुस्करून खाताना गजब स्वाद लागतो...
नागपूरच्या भाषेत 'माहौल.'
जयश्री खराडे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment