Saturday, August 25, 2018

अस्पारागस आणि पालकाचे सूप 

🔷अस्पारागस आणि पालकाचे सूप🔷 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

गेल्याच आठवड्यात आमच्या घराजवळ ‘LIDL’ या जर्मन कंपनीचे किराणा मालाचे नविन दुकान उघडले. स्वस्त आणि दर्जाही मस्त अशी त्याची जाहिरात पाहून कुतूहलमिश्रित उत्साहाने कालच आम्ही त्या दुकानाकडे वळलो. आणि पाहता पाहता स्वस्त आणि मस्त ताज्या भाज्या, फळे आणि इतर किराणा मालाने पिशव्या भरभरून घेऊन घरी आलो. तिथे त्या कोवळ्या, लुसलुशीत भाज्या मला अशा काही खुणावत होत्या की न राहवून मी अस्पारागस आणि पालकाच्या २-२ जुड्या घेतल्या. आता आज ह्याचे काही करावे म्हणून विचार केला की आज जेवणात, वांगीभात, भेंडीची भाजी आणि चपात्या आहेत. तर मग दुसरी भाजी कशाला? बाहेर पाउस पडत होता तर म्हटलं गरमागरम सूप करावं म्हणून मग जे केलं ते हे पौष्टिक सूप.

🌿साहित्य
१ मध्यम कांदा 
२ चमचे साजूक तूप
३ चमचे कणिक
४ कप व्हेजिटेबल ब्रॉथ
२ अस्पारागस जुड्या (अस्पारागस (https://en.wikipedia.org/wiki/Asparagus) ही अमेरिकेत, युरोपात होणारी एक पौष्टिक रानभाजी.)
२ कोवळ्या पालकाची जुड्या 
१ कप फेटलेलं दही 
अर्धी वाटी किसलेलं चीज (मी गोट चीज घेतलेलं)
चवीनुसार मीठ आणि मिरीपूड 
अर्ध्या लिंबाचा रस

🌿कृती:
१.अस्पारागस धुऊन, निवडून (जून देठी काढून) साधारण दोन इंचाचे तुकडे केले.
२. पालक धुऊन निवडून चिरून घेतला.
३.कांदा बारीक चिरून तुपावर गुलाबीसर रंग येईपर्यंत परतला. ४.त्यात कणिक घालून ते मिश्रण सोनेरी रंग येईस्तोवर मध्यम आचेवर परतले.
५.त्या मिश्रणात आधी करुन ठेवलेला व्हेजिटेबल ब्रॉथ थोडा थोडा घालत ढवळून मिश्रण उकळायला ठेवले.
६. चिरलेले अस्पारागस आणि पालक यांचा मिक्सरमध्ये बारीक वाटून प्युरे केला.
७. उकळत ठेवलेल्या मिश्रणात हा प्युरे घालून संपूर्ण मिश्रणाला उकळी येईपर्यंत (झाकण न झाकता) मध्ये मध्ये ढवळत राहिले.
८.चांगली रसरशीत उकळी येताच विस्तवाची आच मंद केली.
९. मंद आचेवरच मिश्रणात थोडे थोडे दही घालून एकजीव केले. एकजीव होताच सूपचे पातेले चुलीवरून उतरवले.
१०. त्यात मीठ, मिरपूड, किसलेलं चीज आणि लिंबाचा रस घालून ढवळून सूपच्या वाडग्यामध्ये ओतले आणि गरमागरम ओरपलं. 

© सौ. प्रीति कामत-तेलंग 

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment