Friday, August 17, 2018

बेसन कुडकुड्या 

🔷बेसन कुडकुड्या🔷 
पोरं मारती उड्या 

तुम्हाला टूरला जायचंय !
तुमची मुलं बाहेरगावी शिकताहेत ! 
मुलं सकाळ संध्याकाळ काही दुसरं खायला मागताहेत !
हो तुम्हाला ही चहाबरोबर काही खावंसं वाटतंय !
मित्रमैत्रिणी पाहुण्यांना चहाबरोबर अचानक काय देऊ ?
आईकडे जायचंय ,तिला चवदार बदल म्हणून काय बरं न्यावं !
असे एक ना अनेक प्रश्न गृहिणीसमोर असतात .अशा वेळी खरेच मुलंच काय पण तुम्ही पण उड्या मारत खाल या कुडकुड्या !
हा शब्द माझ्या मुलाने तयार केला कारण त्या खाताना कुडकुड वाजतात. यात ही फार हुशार!! मुलांना चांगले संस्कार व्हावेत, वाईट कानावर पडू नये म्हणून तिने लहनपणापासून मुलांच्या पार्श्व भागाला ,टरबूज असं नाव दिलं .हे काही वाईट नाही पण चांगले ही नाही .
चल बेटा टरबूज धू ! 
असं म्हणायचं कारण शी धू म्हणायचं कसं तरीच वाटतं पण तिने टरबूज याचा अर्थच बदलून टाकला आज मुलं भली मोठी झाली आहेत 
टरबूज खायचं का रे बाळा!
असं म्हटल्यावर कोणतं मूल धाडस करीन?
तर सांगायचा मुद्दा हा होता की कुडकुड्या नामकरण आमचंच पण ह्या जरा मेहनतीने व उगिनीगिने केल्या तर घरच्या बाजारपेठेत मागणी वाढते .
डब्बे गोडाऊन रिती होतात. खरं वाटत नसेल तर करून पाहा. तुम्ही पण डबे भरून न्याल; तोंड भरून खाल .पण नाव मात्र हेच राहू द्या उगीच अर्थक्षय नको ..

कुडकुड्या 

साहित्य:

दोनास एक भाग याप्रमाणे बेसनपीठ व मैदा 
भरपूर लसूण व हिरव्या मिरचीचा ठेचा 
प्रमाणशीर लाल तिखट 
हळद
हिंग
जिरे ओवा बारीक भुकटी 
मीठ 
कसूरी मेथी पूड 
आमचूर पावडर 
चिमूटभर खा.सोडा किंवा बेकिंग पावडर 
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

१.बेसनपीठ व मैदा एकत्र चाळून घेऊन मिक्स केल्यानंतर त्यात हळद ,हींग ,ठेचा ,ओवा जिरे पूड,आमचूर सह वरील जिन्नस पिठात मिक्स करून कडकडीत तेलाचे मोहन टाकावे .
२)यात मीठ किंचित जास्त असेल तरी चालते पण मीठाच्या सहनशीलतेनुसार ते वापरावे .
३)चांगले मिसळून जसे लागेल तसे पाणी टाकून घट्ट मळावे .पण इतके ही नको की लाटताना हुडहुडी भरेल. मळण्याची मेहनत चव वाढवून कुरकुरीतपणा वाढवते .
४)दहापंधरा मिनिटे बाजूला भिजत ठेवण्यापूर्वी तिखट मीठाची चव माखायला काही हरकत नाही .
५)कढईत तेल तापले असे वाटले की पोळपाटावर मावेल अशा आकाराची लाटणी घेऊन तेल लावून पातळ वाटून घ्या.मध्ये मध्ये सुईने टोचून आकर्षक पद्धतीने छिद्रे पाडून मंद आचेवर तळून घ्या जरा पुरीपेक्षा लालसर या कुडकुड्या फुगणार नाहीत पण कुरकुरीत होतील विशेष म्हणजे तेलही धरत नाहीत .तळणे हेही एक कौशल्य समजा कच्ची न ठेवता जास्त जळणार नाहीत हे पाहावे .
६)थंड झाल्यावर डब्यात तळाशी कागद टाकून ठेवा .पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ टिकतात जसे दिवस जातील तशी टेस्ट वाढेल व डबा खाली होत जाईल पण मुलांना कोणत्या डब्यात ठेवल्या आहेत ते सांगा. त्यांच्या हाताला येतील अशा ठिकाणी ठेवा .
भूकमोड करण्यासाठी , टाईमपास म्हणून तर कधी स्वयंपाकाला उशीर होत असेल तर ह्या कुडकुड्या भूकही भागवत नाहीत व पोटही भरत नाहीत पण खाण्यातही खंड पडत नाहीत .मग करून बघायला काय हरकतंय ! 

काकासाहेब वाळुंजकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषा प्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment