Sunday, August 19, 2018

तीळ खोबरे चटणी 

🔷तीळ खोबरे चटणी🔷

आज पावसाची रिपरिप दिवसभर होती.
बाहेर जायला मन होईना .तिचा
सध्याकाळच्या भाजीचा प्रश्न ...

"जा ना ! काहीतरी भाजीपाला घेऊन या .दिवसभर मोबाईल मोबाईल कंटाळा कसा हो यत नाही ?"

"आज नाही जात !"
"बाहेर पाऊसंय ! तू जातेस ! आण कशी भाजी चालेल !"....मी 

"मी ?अजिबात नाही ! कपडे खराब होतात पावसात बाहेर गेलं की ! मला सर्दी होते! 
जा उठा, बंद करा ते मोबाईलवर टिचक्या मारायचं ! "

तिचा सूर तार सप्तकाकडे फिरण्या अगोदर.......

मी ...
"एक काम करू मस्त पापड भाजतो ."
"लाल टोमॅटो आहेत तुला फार बारीक चिरता येतात."
"तू चिर. मी कांदा चिरतो."
"घरात झिरो नंबरची शेव आहे . पापडावर टाकून भारीच लागते .हॉटेलमध्ये वॉर्मिंग अप साठी हेच देतात."

"करा, काही ही करा, मला चालेल !"
"पण,"
"पण काय ,"
"तीळ खोबऱ्याची चटणी करा, काय ?"

आज्ञा शिरसावंद्य .
भारीच! बरेच दिवस झाले चटणी संपलीय .
हा शॉर्टकट मला बाहेर रिपरिपीत जाण्यापेक्षा मनापासून भावला .

मी ... 

साहित्य:

*भाजलेले बिगर पॉलिश केलेली हावरी चार मोठे चमचे 
* एक मोठी खोबऱ्याची वाटी 
बारीक तुकडे केलेली ,
*एक कुडी लसूण टरफलांसह,
*जिरे र्धा चमचा 
*ओवा पूड अर्धा चमचा 
*मीठ चवीनुसार (पाव चमचा )
*लाल तिखट दीड चमचा.
(तिखट खात असाल तर वाढवा )

१.मिक्सरमध्ये खमंग भाजलेली हावरी (तीळ )व खोबऱ्याचे तुकडे टाकून फिरवले .
नंतर 
२.ओवा ,जिरे पूड टाकून मिक्स केले.
३.लाल तिखट व मीठ प्रमाणात टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतले .
४.शेवटी लसूण टाकून एकत्र केले 

खूप खमंग लागते . 
कोरडी खा .
जेवताना चाटण म्हणून तोंडी लावा.
बाहेरगावी जाणार आहात, चपातीवर टाकून घेऊन जा .
कमी तिखट करा नि मुलांना डब्यातही द्या .
जेवताना इतर भाजांची चव वाढवण्यासाठी ताटात अवश्य चमचाभर टाकून ठेवा .
पाहुणा आवडीने खाईल .
कडकडीत तेल तीळखोबरे चटणीवर टाका. चपाती भाकरी बरोबर सुक्या भाजीला पर्याय छान लागते .

फारच छान झाली हो चटणी !

"हो का ! माझी आई करायची."

(वादळापूर्वी असते तशी शांतता )

"तुम्ही जरा कमीच खा ."
"मला राहू द्या ! "
"नाही तर असं करते; उद्या आई येतेय.तिला आवडते माझ्या हातची चटणी !"

"काय तुझ्या हातची ? ",

"असू द्या हो तुम्ही केली काय नि मी केली काय, शेवटी माझ्या आईलाच देणार ना ! "
( पुढे चालू)
"मेलं डोळ्याचं ऑपरेशन नस्तं ना झालं; तर मीच केली असती ."

"बरं समजलं ! ही सगळीच दे !मी तरी आई ,आई मध्ये फरक करत नाही !"

आली ना हरदासाची कथा पूर्वपदावर ! 
( डोळ्यातले भाव सेल्फी काढण्यासारखे ....पण नको ...)

मी आपला तीळ तीळ चटणी तुकड्याला लाऊन, मनातल्या मनात मिटक्या मारत मुकाट्याने खात होतो !!

काकासाहेब वाळुंजकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment