साबुदाणा खीर
१ वाटी साबुदाणा प्रथम थोडा भाजून घ्यावा. गार झाल्यावर ६तास भिजत घालून, नंतर भिजलेली साबुदाणा२ वाटी उखळत्या पाण्यात पूर्ण शिजवून घ्यावा. नंतर त्यामध्ये गुळ/साखर आपणास हवे ते घालून थोडी उखळी आणावी.
खीर तयार
खाते वेळी दूध घालून खावयास घ्यावी.
वैशाली वेटाळे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
ओल्या मटर ची खीर
साहित्य
ओले मटर
खवा
दूध
साखर तूप
सुख्या मेव्याचे काप
कृती
एका भांडयात पाणी घेऊन त्यात मटर व साखर घालणे व वाफवून घेणे नंतर पाण्यातून काढून गार पण्याखाली धरणे नंतर बारीक वाटून घेणे एका भांडयात तूप घालुन हे वाटन परतवने ग्यास बंद करुन त्यात दूध घालुन एक सारखे मिक्स करणे व गालुन घेणे पुन्हा है मिश्रण ग्यास वर ठेवणे मंद ग्यास वर उकळी येऊ देणे पण सतत चमच्याने हलवत रहाणे उकली यायला लागली की त्यात खवा वसाखर घालणे हवी असल्यास थोड़ी आटवने वरुन सुकामेव्या चे काप व वेलची पावडर घालणे.
ममता संसारे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
शेवयाची खीर
साहित्य
दूध उकळून घ्या
त्यात तूप, साखर घाला
शेवया परतून घ्या
दुधात शेवया घाला
२-३ मिनिट उकळा
उकळत असताना मोबाईल बघु नका
झाल्या शेवया तयार
त्यानंतर ताव मारा
आपल्यासोबत थोड्या प्लुटोलापण द्या🐕
सुचिकांत
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
रताळी ची खीर
साहित्य
उकडलेली रताळी
दूध
साखर
तूप
वेलची पावडर
केशर काड्या
उकडलेली रताळी सोलून, कुस्करून घेणे.
दोरे,असतील तर काढून टाकून....
जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालून त्या वर रताळी कुस्करा परतून घेणे
त्यात दूध,साखर घालून उकळणे
त्यात वेलची पावडर,केशर काड्या घालणे.
थंड अथवा गरम कशीही चांगली लागते.
🔺शिंगाडा खीर/लापशी🔺
शिंगाडा पीठ,दूध,साखर, वेलची पावडर,तूप
जाड बुडाच्या पातेल्यात
मंद गॅस वर तूप घालून त्यावर शिंगाडा पीठ थोडे भाजून घेणे त्यात दूध ,साखर,वेलची पावडर घालणे
सतत ढवळत राहावे.
🔺गव्हाची खीर🔺
गहू १वाटी (लापशी रवा मिळतो दुकानात )तांदुळ २चमचे गूळ /साखर ओल नारळ चव, जायफळ, वेलची पुड, सुका मेवा, खसखस पुड ,रवा आणि तांदुळ कुकर मध्ये शिजवून घेणे, गूळ साखर मिक्स करून घेणे शिवलेले गहू, गूळ साखर खसखस पुड घालून नारळ मिक्स करून चाट करून घेणे मग खाली उतरून वेलीचं पुड आणि सुका मेवा घाला, वाढायच्या वेळी दूध घाला आणि खीर वाढा!
अंजली अतुल जोशी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
मकाणे खीर
मकाणे तुपावर परतणे
मिक्सर मधुन रवाळ करणे
परत थोड्या तुपावर परतुन दुध साखर , वेलचीपुड , केशर , बदाम काजूचे काप घालून उकळवणे .
खुपच छान लागते
वर्षा वाघ
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
खारकेची खीर
खारिकचे बारीक तुकडे करून भिजत घालणे आतमधली बी काडून टाकणे नंतर कुकरला लाऊन मीक्सरला बारीक करुन गुळ टाकून शिजवून घेणे त्यामध्ये बदाम काजूगरची बारीक केलेली पावडर टाकून ढवळणे यामुळे खीर घट्ट होते शेवटी साजूक तूप दूध वेलची पावडर टाकणे सजावटीसाठी काजू बदामचे बारीक तुकडे टाकणै अशी हि लहान मोठ्याना आवडणारी खिर तयार
वैशाली हेगिष्टे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
रवा खीर
साहित्य
रवा, किसलेले खोबरे,खसखस,साजूक तूप,साखर, दूध,कन्डेन्स्ड मिल्क, किसमिस,वेलची-जायफळ पूड
कृती
* भांङयात आधी कोरडच खोबर भाजून घ्याव, त्यासोबत खसखस फण खमंग भाजून घ्यावी.
* मग तूप टाकून रवा सोनेरी रंगावर छान भाजून घ्यावा.
* रवा भाजला की दूध घालून २ उकळया काढाव्यात.
कन्डेन्स्ड मिल्क, किसमिस,वेलची-जायफळ पूड घालावी.
* खायला देताना एक चमचा तूप घालून द्यावे.
🔺तांदळाची खीर🔺
साहित्य
सुवासिक तांदूळ, दूध, तूप,घरची साय,साखर, बदाम,दुधात भिजवलेल्य केशर काड्या,वेलची-जायफळ पूड
कृती
* तांदूळ स्वच्छ धुवून, निथळून घ्यावेत.तूपावर छान खमंग भाजून घ्यावेत.पाणी घालून भात शिजण्यास ठेवावा, अर्धवट शिजला की दूध,साखर घालून २-३ उकळया काढाव्यात.
* केशराच दूध घालाव.
* बदाम, साय फेटून घालावी.
* खायला देताना एक चमचा तूप आणि बदाम काप घालून द्यावेत.
🔺भगर-खोबरे-खजूर खीर🔺
साहित्य
१ वाटी भगर,१/२ वाटी ओले अथवा सुके खोबरे, १/२ वाटी खजूर,साजूक तूप,साखर, दूध,कन्डेन्सड मिल्क/साय, वेलची-जायफळ पूड,१ लवंग,ड्रायफ्रुटस् हवे ते...
कृती
* भगर स्वच्छ धुऊन,निथळून घेऊन तुपावर खमंग भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरला रवाळ वाटून घ्यावी.
* खजूर तुपावर परतून ते ही मिक्सरला वाटून घ्यावेत.
* एका भांड्यात तूप गरम झाले की ड्रायफ्रुटस् चे काप तळून घ्यावेत मग खोबरं सोनेरी रंगावर भाजून घ्याव.
* यात वाटलेली भगर,खजूर मिक्स करून दूध, साखर घालून,दूधातच चांगली शिजवून घ्यावी.
* शिजत आली कि कन्डेन्सड मिल्क घालावे.
* वेलची-जायफळ पूड घालावी.
* केशर काड्यांनी सजवून गरम गरम खायला द्यावी.
हम्.म्..
एकादशी दुप्पट खाशी सदरातली डीश असली तरीही... खमंग भगर,तुपातली खजूर अप्रतिम स्वाद देते जिभेला..!!
आणि मग ब्रम्हानंदी टाळी....
🔺साबुदाणा-पाईनअॅपल चंक्स् खीर🔺
साहित्य
रात्रभर भिजवलेला साबुदाणा, दूध, साखर, कन्डेन्स्ड मिल्क, अननसाचे अगदी बारीक काप, जायफळ पूड, किंचित मीठ
कृती
*) साबुदाणा थोड्या पाण्यात उकळायला ठेवावा, १ उकळी नंतर दूध,साखर घालावे.
*) एका बाजूला किंचित तुपावर अननसाचे तुकडे परतावेत आणि साखर घालून कॅरामलाईज करून घ्यावेत.
*)खीरीमध्ये कन्डेन्स्ड मिल्क,जायफळ पूड आणि हे कॅरामलाईजड् चंक्स् घालावेत.
खीर तय्यार..
छोटासा ट्विस्ट... पण जाम मस्त चव देवून जातो..!!
जयश्री खराडे.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
खीर गोड झाली
आईने रात्री निपटेभर जोड गहू व मूठभर शेंगदाणे पातेल्यात भिजत घातले .शनिवार असल्याने मारुतीला फोडण्यासाठी नारळ आणला होता त्यातला आर्धा प्रसाद म्हणून आम्हा भावंडांना वाटला .एक बोटकाएवढा टुकडा देवापुढे ठेवला एक दर्शन घेऊन तिने आपल्या तोंडात टाकला .
रात्री ते भिजत घातलेले गहू व शेंगदाणे माझ्या स्वप्नात आले काय बरं करणार आई याचे कुरडया पापड्या मग शेंगदाणे का बरं भिजवले ? स्वप्न घेऊनच सकाळ उजाडली .आईने आंघोळ करून चूल पोथेरा केलेला मातीचा सुगंध नाकला गुदगुल्या करत होता .मी पण तयार झालो .तिला मदत करावी लागते ना ! आम्ही पाच व एक बहीण तिला कामं उरकता थकायला होतं .
चुलीवर पातेल्यात पाणी उकळ्या मारत होतं .तिने गहू चांगले धुऊन घेतले मला शेंगदाणे धुवायला सांगितले मी वाटंच बघत होतो .धुता धुता चार पाच दाताखाली रगडले काय भारी लागत होते अगदी भुईमुगाच्या शेतात ओल्या शेंगा खाल्ल्यावानी .पुन्हा खाणार एवढ्यात ती म्हणाली ,बास खिरीत टाकायला कमी पडत्यान .
आता आलं लक्षात आज बाप जेवण घरी खिरीचा बेत .
चुलीवरचं उकळतं पातेलं खाली ठेवलं दुसरं जरा मोठं जाड बुडाचं चुलीवर ठेवून आईने जाळ सरपण टाकून मोठा केला .आता तापलेल्या पातेल्यात चार चमचे घरचं तिने कडवलेलं तूप टाकलं .
मस्त तुपकट घमघमाट घरभर दरवळत होता .त्या वासाने अंगणात मोठ्याने पुस्तक वाचणीरी छोटी बहीण पुस्तक बगलेत धरून चुलीजवळ आली .
आई काय करतेय? लय भारी वास येतोय .
तिच्याकडे दुर्लक्ष करत आईने तोवर भिजवलेले टपोरे गहू आणि शेंगदाणे तुपात टाकून परतून घेलले .
गव्हाची खीर करतेय .बहीणीने टाळ्या वाजवत अंगण गाठलं .पातेल्यावर झाकण ठेऊन चुलीचा जाळ कमी केला .डब्यातून बदाम काळे किसमिस विलायची बाहेर काढली बदामाच्या फोडी करता करता पातेल्यात उकळतं पाणी टाकून झाकण ठेवलं .गहू शेंगदाणे पातेल्यात उकळत असतानाच मलाही भुकेच्या उकळ्या फुटू लागल्या. हा मेवा व वेलदोडे बारीक करून आईने उकळत्या पातेल्यात टाकले व झाकण ठेवले .मला गुळाचा डबा घ्यायला सांगितला .ठरावीक आकाराचा गुळ बाजूला काढून माझ्याकडे देत म्हणाली ,हा बारीक कर .मी मनापासून कामाला लागलो एक खडा दाढेखाली धरून गुळपान करून आईच्या स्वाधीन करत म्हणालो .मी टाकू का पातेल्यात !
नको म्हणत तिने पातेल्यातून गव्हाची शितं पळीव घेऊन शिजल्याचा अंदाज घेतला .चांगले मऊ शिजले होते .दाबल्याबरोबर त्याच्या पोटातला पांढरा चीक बाहेर येत होता .आईने गुळ पातेल्यात टाकला .चांगले एकत्र करून पुन्हा झाकण ठेवले व मंद हारावर खीर जशी शिजत गेली तसा गुळचट गंध घरभर धिंगाणा घालू लागला .
साळीचा भात ,भजी ,गवार ,भेंडी वरण व चपाती तिने आम्ही झोपेत असतानाच करून तयार होते .मला आवरायला सांगून तिने पूजेची तयारी केली. ताटात गव्हाची वीटकरी खीर ,पांढरा भात दोन भजी वरण चिमूटभर गवार भेंडी वाढून पाणी घेतले देवापुढे निरंजन लावली .अगरबत्ती पेटवून बापालाही निवद दाखवला पदर डोक्यावर सावरत त्याच्यापुढे काहीतरी पुटपुटली .मनोभावे डोळे मिटून दर्शन घेतले .बाहेर बहीण तिचा अभ्यास आवरून आली .आईने पटकन ताटं केली .आम्ही बहीण भावाने खीरीवर खीर वरपत ताव मारला .मी म्हटले आई खीर फारच गोड झालीय .ती तृप्त नजरेने माझ्याकडे पाहतच राहिली .
आज तीस पस्तीस वर्षानंतरही ती गोड खीर व तृप्त मायेची नजर आठवतो आहे .मनात रुतलेला गोडवा आठवून आठवून गिळतो आहे . कारण आज अशी गुळ खोबर्याची खीर काळाआड गेली मी केली तर मीच गारगरम करत खातोय .पण या खिरीबरोबरच आईला आठवतोय .पण बापजेवण कधी मनाला येईल तेव्हा घालतोय .
काकासाहेब वाळुंजकर
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
नखुल्यांची खीर
वाटीभर नखुले, पाउण वाटी गूळ, चमचाभर खसखस, वेलचीपुड, दूध ,तूप, बदामाचे काप
पातेल्यात चार वाट्या पाणी ऊकळले की त्यात नखुले शिजायला टाकावेत. मधुनमधून हलवत रहावे. मऊ शिजल्यावर गूळ घालावा. चटका आल्यावरक् बदामाचे
काप व वेलचीपूड घालावी. दूधतूप घालून खावी.
टीप
निम्मा रवा व निम्मे गव्हाचे पीठ किंचित मीठ घालून घट्ट मळून घेते. हातावर छोटी गोळी घेऊन बारीक लांब वळून घेऊन नखाने छोटे छोटे पोकळ नखुले करते. कडक ऊन्हात ते वाळवून ठेवते. वर्षभरात लागेल तेंव्हा खीर करता येते. पारंपारिक पदार्थ आहे.
मंगला डोंगरे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
दुधीची खीर
साहित्य
दुधी पावकिलो
1/2 ली दुध
50 ग्राम खवा
गोडी प्रमाणे साखर/गूळ
दुधी भाजण्यासाठी 2 चमचे तूप
थोड्याशा शेवया
आवडीनुसार काजू बदाम,
चिमूटभर वेलची पावडर
कृती
प्रथम दुधी किसून स्वच्छ धुवून घ्या, नंतर पूर्ण पिळुन घ्या, पाणी पूर्ण काढून बाजूला ठेवा.
एका पातेल्यात 1/2 दूध उखलायला ठेवावे, उखळी काढून थोडं दूध आटवावे, नंतर त्यामध्ये साखर घालून घ्यावी, बाजूला तव्यावर/ कढई वर 2 चमचे तूपावर पिळुन ठेवलेला दुधी भाजून घ्यावा, व तो उखळलेल्या दुधात टाकावा, नंतर चांगली उखळी काढून दुधी शिजवून घ्यावा. नंतर काजू बदाम घालावेत.
चिमूटभर वेलची पावडर घालावी, व गॅस बंद करून थोडा झाकून ठेवावी.
गरम गरम खावयास घ्यावी.
टीप
गुळ घालावयाचा असेल तर थोडी खीर कोमट झाल्यावर गूळ घालावा,
कारण गरम दूध फुटत.
सौ. वैशाली वेटाळे.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
श्रीमंत खीर
साहित्य
१वाटी शेवया
१/२ लीटर दूध
१वाट्या साखर (प्रमाण कमी जास्त)
१०० ग्रॅम खवा
केशर,वेलची
वाटी भरून बदाम,काजू,पिस्ते,चरोळी(काप करून)
२चमचे साजूक तूप
कृती
केशर चमचाभर दुधात भिजवावे
खवा भाजून ठेवावा.दूध केशर एकत्र करून आटवत ठेवावे. अटत आल्यावर साखर ,वेलची घालावी साधारण अटल्यावर त्यात तुपात तांबूस परतून शेवया घाल्याव्या थोडे उकळू द्यावे.त्यात परतलेला खवा घालून थोडे घट्टसर झाल्यावर त्यात वाटीभर सुकामेवा घालावा. ही खीर थंड खूपच छान लागते
तृप्ती लोणकर
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
राजगिरा खीर -
साहित्य
१वाटी राजगिरा, साखर, दूध, सुका मेवा, विलायची पुड., पाणी
कृती
राजगिरा धुऊन 1वाटी पाणी टाकुन कुकर मध्ये 3शिटी करून शिजवून घ्या. दूध उकळत ठेवा, उकळी आली की शिजवलेला राजगिरा टाका, आणि मिक्स करा मग साखर विलायची पुड, सुका मेवा घाला आणि 1उकळी काढा.
थंड /गरम कशीही खा
अंजली अतुल जोशी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
मुगाचे कढण (खीर )
साहित्य
मूग ,गुळ ,ओल खोबर,वेलची पावडर ,,काजूगर ,खोबर्याचे तुकडे
कृती
मूग खमंग भाजावेत .मिक्सर्ला भरड वाटावे .ताटात काढून ,पाखडुन साले काढावीं .उकलत्या पाण्यात घालून मऊ शिजवावे .गुळ घाला वा .गुळ शीजल्यावर .बारीक वाट्लेले खोबरे ,मीठ .वेलची ,खो.काप ,काजूगर घालून पाच मिनिटांनी खीर उतरावी .
कोकणात उपासाला ही खीर करतात .भाजलेल्या मुगाचा छान वास येतो .
वैशाली मोजरकर
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
आंब्याची खीर
पिकलेला एक आंबा घेऊन पातळ रस काढून घ्यावा...
अर्धा लिटर दूध गरम करावे... दूध गरम झाल्यावर त्यात हळूहळू आंब्याचा रस ओतावा आणि हळूहळू ढवळत रहावे. खीर साधारण दाट होऊ लागली की त्यात साखर घालून ढवळून मंद आचेवर शिजू द्यावे... ( ज्यांना आवडत असेल त्यांनी वेलचीपूड टाकावी)
संजय गावडे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
माझी एक *खीर* या विषयावर पोस्ट होऊद्या म्हणजे गाडी रुळावर येयील
वय झाल्यावर म्हणा ,आजारपणात म्हणा , बाळ-बाळंतीणीसाठी म्हणा , सणा वाराला गोडा साठी म्हणा घरोघरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे खीर आता पर्यंत तुम्ही खुप सारे प्रकार वाचले आता मात्र मी तुम्हाला डांगराची (लाल भोपळा )खीर पोस्ट करतोय .त्यात लोहाच प्रमाण जास्त असल्याने व पचनास हलका असल्याने घरातील लहानांपासुन थोरांपर्यंत सगळे अगदि बिनधास्त ताव मारु शकता
साहित्य
१ वाटी पिकलेला लाल भोपळा किसुन
४ चमचे साजुक तुप
१ लीटर दुध
१/२ वाटी गुळ
काजु, बदाम ,बेदाणेे ,पीस्ता काप पाण्यात भिजवुन (नाही भिजवले तरी चालतील )
वेलची -जायफळ पुड
कृती
१.सर्व प्रथम पॅन मध्ये १ चमचा तुप गरम करुन त्यात ड्रायफ्रुटस गुलाबी रंग येयीस्तोवर भाजुन काढुन घ्या .
२. तोपर्यंत एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध तापायला ठेवा मधुन मधुन ते हलवत रहा साय न येता कामा त्यामुळे गॅस मंद ठेवा.
२.त्याच कढईत उरलेल तुप घालुन किसलेला भोपळा परतवुन घ्या त्याला पाणी सुटेल ते पाणी सुके पर्यंत परतवा म्हणजे दुसरीकडे दुध चांगल आटेल
३.आता हळुहळु दुध भोपळ्यात घाला त्या वेळेस हलवत रहा नाहीतर गुठळ्या होतील . वेलची - जायफळ घालुन हलवत रहा (ती खीर आहे हे विसरु नका 😅) थोडी घट्ट झाल्यावर गॅस मंद करा व गुळ घालुन १ मिनीट वर ठेवा व लगेच खाली उतरवा नाहीतर दुध फाटु शकते किंवा खाली उतरवुन मिक्स करुन परत १ मिनीट गरम करुन घेतल तरी चालेल .झाली तयार भोपळा खीर
#या भोपळ्याला काशीफळ , गंगाफळ , डांगर अशी नाव आहेत
# खीर करताना ती सारखी हलवावी म्हणजे खाली बुडाला लागत नाही व वर सायही धरत नाही .
कु.महाजन सागर
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
उपवासाची डिंकाची खीर
१ वाटी डिंक, १/२ वाटी खारीक पुड , सुंठ पावडर १ -२ चमचे, चिरलेला गुळ पाऊण वाटी, किसून सुके खोबरे , काजू बदाम चिरून आपल्या आवडीनुसार, साजुक तुप
सर्व प्रथम साजुक तुपात डिंक तळून घ्या
हा डिंक, गुळ, खारीक पुड, सुंठ पावडर ५ वाटी पाणी घालून भिजत घाला .गूळ विरघळला की हे पाणी उकळायला ठेवा
एक उकळी आली की त्या मध्ये खोबरे घाला , परत उकळी आली की काजू बदाम घाला .लगेच गरम गरम प्या. पण जरा सावकाश, नाहीतर जीभ पोळेल
आमच्या गुजराती समाजात ही खीर पर्युषण पर्वात व नवरात्रा मध्ये करतात.
हिना दोशी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment