Saturday, July 28, 2018

लेख-सांडगे

माचीवरील सांडगे...

नाव वाचून "माचीवरील बुधा" या सर्वांगसुंदर मराठी चित्रपटाची आठवण आली ना?

तर झालं असं...
सध्या  महिनाभर माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मी खूप व्यस्त आहे. त्यामुळे घरकामाचं नीटसं नियोजन होतच नाहीए..
उन्हाळकामाचे दिवस.. काहीतरी करायचंच ही खुमखुमी काही जात नाही ना..

थोडंफार केलं..सांडगे करायचे होते.मटकीची डाळ आणून बरेच दिवस झालेले..भरडून आणणं राहत होतं..
अखेर काल सकाळी अंदाज आला की आज बाहेरची कामं नाहीएत फारशी..मग साडेनऊ वा विचार आला..आज सांडगे करावेत.मग भरडून आणायचे तर चक्की घरापासून बरेच अंतरावर.. हातात गाडी ही नव्हती..

मग केलं गरम पाणी आणि टाकली की एकदम किलोभर डाळ भिजत..
भिजेपर्यंत म्हटलं बाकीची कामं उरकू..
बारा वाजले...

डोक्यात असं गणित होतं..
मिक्सर वरच डाळ बारीक करून दोन वाजेपर्यंत सांडगे घालून होतील...

उन मी म्हणत होतं...

बारा वा मिक्सर काढला..पाहते तर लाईट नाही!
अरे देवा!
आता?
मग इकडचं काम आवरत बसले..पावणेतीन वा लाईट आली
पटकन् डाळ वाटली...बाकीची तयारी झालीच होती दरम्यान

लसूण वाटीभर सोलून ठेवलेला ,वाटीभर कोथिंबीर चिरलेली..
हिरव्या मिरच्यांचे देठ काढलेले...

काही मिनीटांतच वाटणघाटण झालं..हळद,मीठ,थोडं लाल तिखट घातलं.
आता सांडगे घालायला घेणार...तेवढ्यात निसर्गानं आपले रंग दाखवायला सुरुवात केली हो...
आभाळ भरून आलं आणि वाराही भरारा वाहू लागला..
पावसानं चाहूल दिली..

धुंद वातावरणात मस्त बेभान व्हायचं सोडून मी डोक्यावर हात ठेवून बसले..

सहा वाजेपर्यंत असंच वातावरण राहिलं..
रडायला येत होतं..

मग ते मिश्रण डब्यात भरलं आणि ठेवलं फ्रीजमध्ये..

रामभरोसे!!

लाईट येतजात होती.
धाकधूक मनात ठेवून उरकलं..
गादीवर अंग टाकलं खरं..झोप कुठं लागतेय?
चार वा उठले..
सण असल्याने घरकाम उरकलं..अंघोळही झाली.. नेहमीप्रमाणे योगाभ्यास झाला..
आणि लगेचच सांडगे घालायला घेतले.
मी आणि संकटकाळी सतत माझ्या पाठीशी खंबीरपणे असलेली माझी मुलगी...मिळून सांडगे घातले.

सकाळी ७.१० च्या आकाशवाणीवरील बातम्यात 
"सातारा, सोलापूर जिल्ह्यात येत्या २४ तासात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता" वर्तवण्यात आली हे स्वतःच्या कानांनी ऐकलेलं...

टेरेसवर सांडगे ठेवणं धोकादायक वाटलं...
उचलणं सोपं जावं म्हणून एकाच प्लास्टिकच्या कागदावर घालण्याऐवजी एक परात,एक शिबा, तीन चंदेरी ताटं वापरलेली..
मग ताटं ठेवायची कुठं?

तेव्हा चिरंजीव मदतीला आले.
दिवाळीच्या सुटीत अंगणात किल्ला करतो.त्यावर ठेवायला शिवाजी महाराज आणलेले आहेत.. ते चिरंजीवांना पैकबंद करून ठेवायचे नसतात..सो..त्यांनी अंगणात शिल्लक बांधकाम साहित्यातून शिवरायांना उनपाऊस,थंडीचा त्रास होऊ नये म्हणून घर बांधलंय..त्यावर एक सेंट्रींगची प्लेट टाकलीय...त्याला आमचे चिरंजीव " शिवरायांची माची" म्हणतात...
ती जागा त्यांनी उपलब्ध करून दिली.
शिवाय शिवाजी महाराज जसं आपलं रक्षण करतात तसं सांडग्यांचंही रक्षण करतील , याची हमी दिली..
आणि सगळे सांडगे माचीवर सेटल् झाले..

माचीवरील सांडग्यांना मस्तच उन लागतंय..
डोळ्यासमोर ही आहेत.
आपली माची आईला उपयोगी पडली या खुशीत स्वारी येताजाता सांडगे तोंडात टाकतेय..

(ही त्याची मेख माझ्या लक्षातच नव्हती आली...
हाहाहाहा...)

सविता कारंजकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment