केळ्याचा ब्रेड
माझी आजी छान मऊ लुसलुशीत केळ्याचा ब्रेड बनवायची. तिच्याकडून तो वारसा आईने घेतला आणि आईचा केळ्याचा ब्रेड आमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळीनी नेहमीच इतका वाखाणलाय की तो बनवल्याबरोब्बर लागलीच संपून जातो. मी मला वारसाहक्काने आईकडून मिळालेली पाककृती रव्याऐवजी कणिक वापरुन थोडीशी बदलून पाहिली आणि हा केळ्याचा ब्रेड पण आमच्या अमेरिकन मित्रमंडळीनी ताव मारत संपवला. ती माझी पाककृती खाली देत आहे. तुम्ही नक्की करुन पहा आणि कसा झाला ते सांगा
साहित्य
४ जास्त पिकलेली केळी, १ कप साखर, दीड कप कणिक, ३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, १ चमचा मीठ, अर्धा कप तेल, सुका मेवा (ऐच्छिक) , दोन चमचा वेलची पूड, अर्धा चमचा जायफळ पूड
पाककृती
एका मोठ्या वाडग्यात केळी कुस्करुन घ्यावे. त्यात साखर आणि तेल घालून ढवळावे.
दुसऱ्या एका भांड्यात कणिक, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करुन हे सुके मिश्रण तयार ठेवावे. ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसला गरम करत ठेवावा. ज्या भांड्यात ब्रेड बेक करणार त्याला आतून २ चमचे तेल चांगले चोळून ठेवावे.
आता सुके मिश्रण केळी-साखरेच्या मिश्रणात हळूहळू मिसळावे आणि शेवटी सुका मेवा, वेलची पूड आणि जायफळ पूड घालुन अलगद ढवळावे. सारे तयार मिश्रण तेलाने माखलेल्या बेकिंग डिशमध्ये ओतावे आणि १८० डिग्री सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटे बेक करुन घ्यावे. तयार ब्रेड ओव्हन बाहेर काढून सुमारे १५ मिनिटे त्याची वाफ निवेल अशा बेताने उघडा ठेवावा. आणि पंधरा मिनिटानंतर एका मोठ्या ताटावर बेकिंग डिश पालथी धरुन ब्रेड अलगद त्या ताटात काढून घ्यावा. आवडीप्रमाणे तुकडे कापून वाफाळलेल्या चहा / कॉफी सोबत ह्या ब्रेडचा आस्वाद घ्यावा.
© सौ. प्रीति कामत-तेलंग
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment