Wednesday, November 14, 2018

लेख-मुंबईची खाद्य संस्कृती

मुंबईची खाद्य संस्कृती

तृप्ती लोणकर
 
पठ्ठेबापूराव म्हणतात
*मुंबई. नगरी बडी बाका
 जशी रावणाची लंका*

अगदी अक्षर अन् अक्षर खर आहे.सात बेटांची मिळून तयार झालेली ही मुंबई. एक अनोखे शहर आहे.

       अस म्हणतात की देशावर राज्य करणारा जो राजा असतो तो त्याचा चेहरा त्या देशाला/शहराला देतो. याला अपवाद फक्त मुंबईचा.इकडे येणारा माणूस आपला रंग मुंबईला देत नाही तर तिचा म्हणजे मुंबईचा रंग स्वतःच्या अंगावर घडवतो.

                  संपूर्ण भारतभर फिरल तरी मुंबईची सर कशालाही येत नाही.तिच कल्चर सगळ्यात वेगळे आहे.*सगळ्या रंगात रंगून मुंबईचा रंग न्यारा आहे*

              प्रत्येकजण वीतभर पोटासाठी या नगरीत प्रवेश करतो.त्या पोटाचे लाड तर मुंबई अतोनात पुरवते.प्रत्येकाच्या खिशाला परवडेल आणि जिभेला तृप्त करेल असे खाद्यपदार्थ मुंबईत मिळतात.त्यामुळे आपल्या होमस्टेट पासून दूर आल्याचा फील निघून जातो

             सकाळच्या ब्रेकफास्टच्या व-हायटी पहाता हे विश्वचि माझे घर. या उक्ती प्रमाणे आसेतू हिमाचल तयार होणाऱ्या पदार्थांची हजेरी लागते.
*अगदी पावा पासून ते पराठ्यापर्यंत* ज्याला जशी भूक. तसे त्याने खावे.  तुमच्या खिशात कमी पैसे आहेत भूक जास्त आहे. तर वडापाव,ब्रेडबटर,आहे.त्यापेक्षा जास्त हव असेल तर. डोसा,इडली-सांबार घ्या.दुपारच्या जेवणासाठी महाराष्ट्रियन. थाळी आहे.दुपारच्या भुके साठी पाणीपुरी,भेळपुरी,रगडा-पॅटीस ,चायनीज भेळ खा.रात्री साठी पंजाबी,मोगलाई खावून अगदी शाही थाट साजरा करा. हलक आणि अधून-मधून तोंडात टाकायला हव असेल तर गुजराथी पदार्थ दिमतीला असतील.

            अशी ही मुंबईची रंगीबेरंगी खाद्य संस्कृती तिच्याच सारखी आकर्षक आहे.मुंबई खरे पाहता महाराष्ट्राची राजधानी. त्यामुळे मराठी खाद्यसंस्कृती ही तिची स्वतःची आहे.पण तिने इतर भारतीय राज्यांना स्वतःच्या थाळीत मानाने स्थान दिले आहे. केवळ काही काळा पुरते नाही तर कायमचे ते पदार्थ मुंबईचे झाले.त्यांनी आपल्या अस्तित्वाने मुंबईची शान वाढवली.

              लांबच लांब असलेला  समुद्र किनारा  हा निसर्गाने मुंबईला दिलेले आणखी एक वरदान त्यामुळे मत्स्याहार हा तर. *मुंबईच्या गळ्यातला रत्नहार* म्हणावा लागेल.त्यामुळे सामिष आहारालाही मुंबईत  पहिले स्थान देतात.अनेक प्रकारचे ताजे मासे आणि त्यापासून बनलेले पदार्थ हे तर मुंबईच्या  खाद्य संस्कृतीचा मान बिंदू आहे.तर अनेक प्रकारचे मांस युक्त पदार्थही  मुंबईत. मानाने मिरवीत असतात.

              व्रत-वैकल्यांच्या फराळी पदार्थांचे देखील मुंबईत वैविध्य आहे.उत्तरेकडून शिंगाडा हा पदार्थ स्वीकारून त्याचे मराठमोळे थालीपीठ,गुजराथी पद्धतीचा ढोकळा असे अनेक पदार्थांची बहू प्रांतीय रुपे  आपल्याला पहायला मिळतात.
गोड पदार्थाबाबत बंगालने बाजी मारलेली दिसते.चमचम,मलई सँडविच,रसगुल्ला असे पदार्थ मराठमोळ्या थाळीत मानाने बसतात.गुजरातकडून दुधपाक,सारखे तर उपहारात कोरडे फरसाणाचे पदार्थ कोणत्याही प्रांताच्या माणसाच्या घरात मानक-यासारखे ठाणमांडून असतात.

             जरी मुंबई ही सर्वप्रांतिक पदार्थांनी नटलेली असली तरी तिचीही काही खाद्य आपत्ये आहेत.ती अगदी साता समुद्रापार प्रसिद्ध आहेत. त्यापैकी बटाटा वडा हा मुलगा. अगदी  जेवणाच्या ताटापासून ते मधल्यावेळच्या उपहाराच्या डीश पर्यंत डौलाने वावरत असतो.त्याबरोबर पावाची दोस्ती झाली आणि गरीबाच्या दुपार,रात्रीच्या जेवणाची सोय करतो
तर पाव-भाजी नावाची मुंबईची मुलगी पार्टीची शान झाली
तर रुचिपालटाची राणी ठरली.

             अशी महाराष्ट्राची अनभिषिक्त साम्राज्ञी मुंबई प्रत्येकाच्या जिभेचे चोचले पुरवत येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या पदराखाली घेते आहे.

         मुंबादेवीने दिलेल्या आशीर्वादाला जागते आहे मुंबादेवीने मुंबईला  सांगितले आहे तुझ्या पदराखाली येणाऱ्या प्रत्येकाला मी अन्न देईन पण माझ्या कडे रहायला जागा मागू नये. म्हणूनच मुंबईची संस्कृती,आणि खाद्य संस्कृती ही उत्कृष्ठ दर्जाची आहे.

तृप्ती लोणकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment