Wednesday, November 14, 2018

लिट्टी-चोखा

जेंव्हा पहिल्यांदा खाल्ले...😋 नावापासूनच नवखेपणा होता..
माझ्या बिहारी मैत्रिणीकडे टेस्ट केली ही डीश... त्यांची ऑथेन्टिक डीश!!
चोखा म्हणजे आपल्याकडच्या भरीतामध्ये थोडेसे बदल.आणि लिट्टी म्हणजे स्टफ केलेली बाटी.पण भारीच टेस्ट आणि कॉम्बिनेशन आहे हे...
तसे तर ही लिट्टी ते घट्ट रश्शाच्या चिकनसोबत खातात, अजब कॉम्बिनेशन आहे ना पण सुपर लागतं असं म्हणतात.😊
       इंडक्शनने पुकारलेल्या असहकाराने सगळी भिस्त ओव्हन महाराजांवर, मग हा पदार्थ तर होणेच होते...😄

साहित्य :
लिट्टीसाठी - कणीक,डाळया/फुटाण्याची डाळ यांची मिक्सरमधे केलेली भरड (याला सत्तू म्हणतात),बारीक चिरलेला कांदा-लसूण, कोथिंबीर, लिंबू रस,तेल,मीठ
चोखा - भरीताची वांगी, बटाटा, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा-लसूण-हिरवी मिरची-कोथींबीर, लाल तिखट, तेल,मीठ

कृती:

• गव्हाच्या पिठात कडकडीत तेलाचं मोहन घालून पिठाला चांगल चोळून घ्यावे. चवीपुरतं मीठ घालून घट्ट कणीक मळून घ्यावी.
• डाळयांच्या पीठात कांदा,लसूण, कोथिंबीर,मीठ, लिंबू रस घालून छान मिक्स करून घ्यावे, थोडसं पाणी शिंपडून साधारणपणे पिठाचा गोळा होईल असे पहावे.
• कणकेच्या लाटीत पुरणाप्रमाणे पीठ भरून सर्व बाजूंनी गोळा बंद करून घ्यावा.
• ओव्हन १८०°से १५ मिनिटे प्रीहिट करावे.
• सर्व लिट्टींना सगळीकडून तेल चोळून घ्यावे, ट्रेमध्ये लिट्टी ,ठेवून २० मिनिटे १८०°से बेक करून घ्यावे. मग लिट्टी उलटून दुसरया बाजूनेही १० मिनिटे बेक करावे. लिट्टी रेडी..
• वांगी,बटाटे ओव्हन/गॅस/कोळसे कशावरही खरपूस भाजून घ्यावेत. टोमॅटो ला खालच्या बाजूस चिर देवून ते पण भाजून घ्यावेत.
• साल काढून स्मॅश करून कांदा,लसूण,मिरची, तिखट,मीठ,कोथिंबीर घालून छान मिक्स करावे, तेल कच्चेच घालावे.
चोखा रेडी...

खायला देताना लिट्टी तुपात घोळवून चोखा,लोणचे,चटणी, कांदा लिंबू सोबत वाढावे.

तळटीप: लिट्टी डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवूनही भाजू शकता.

जयश्री खराडे.
धन्यवाद!!

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment