Thursday, November 15, 2018

अनारसे

अनारसे

साहित्य:

• १ कप तांदूळ
• १ कप किसलेला गूळ
• १ चमचा तूप
• खसखस
• तळण्यासाठी तूप / तेल

कृती:

● तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
● चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.
● किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. स्टिलचा डबा वापरू नये शक्यतो प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे.
● ५-६ दिवसांनी हे पीठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे. पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. ही पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.
● पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही व गोल राहिल.
●अनारसे तळताना ब‍र्‍याचदा तो फसफसतो. तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा कारण हे पीठ ५-६ महिने सहज टिकते.
● अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे.

सौ. वैशाली वेटाळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment