बटाटा भरीत
आपण सर्वत्र सर्वदा वांग्याचे भरीत आवडीने खातो .ते करण्याचे प्रकार व पद्धती भिन्न असतात पण फावल्या निवांत वेळेत रुचिपालट म्हणून बटाट्याचे भरीतही खमंग व थोडे जहाज केले तर भारीच मज्जा येते चला मग जरा करण्याची पद्धत पाहू या !
★कोण किती खाणार हे विचारून घ्या तिखट की मध्यम ते ही विचारा उगीच कमी पडायला नको.
★मस्त गोल गरगरीत मध्यम आकाराची बटाटी मंद आचेवर गॅसवर सावकाश भाजून घ्या कारण सध्या चुली इतिहास जमा होत चालल्या आहेत .चुलीच्या राख वा कोळशाच्या हारात बटाटे भाजले तर चव चौपट वाढते .आता बटाट्याच्या पोटात चमचा ,चाकू,किंवा उलथणे टोचून पाहा सहज आरपार गेले तर बटाटे भाजले असे समजायला काहीच हरकत नाही .
★ बटाटे थंड होईपर्यंत एक काम करू या ! कांदा बारीक चिरून घेऊ. आता पाहा बर लाल तिखट हिरवी मिरची यापैकी जे उपलब्ध असेल व आवडेल ते चालेल .फोडणीचे साहित्य तर मसाला डब्यात आहेच.
★आता भाजलेले बटाटे शांत झाले असतील .मला थंड झाले असतील असेच म्हणायचे होते .बाहेरचे कव्हर काळे झालेले असेल पाहा तुम्हाला आवडते का पण मला मात्र फार आवडते .मी बटाटे कुस्करून घ्या .गाभ्याचा भाग किंचित कच्चा राहिला तरीही काही वाईट वाटून घेऊ नका.
★ तवा (म्हणजे तवाच नव्हे तेव्हा जे उपलब्ध असेल ते )गॅसवर ठेवा तापला की थोडे तेलौदार्य दाखवून चमचाभर जादाच टाका मग त्यात जिरे मोहरी कढीपत्ता व बारीक चिरलेला कांदा न करपू देता गाभुळा भाजून घ्या आता लाल तिखट किंवा टेचा यापैकी एकच हं ! सहन होईल असे तिखट टाका .परतण्याअगोदर मीठ टाका .कोथिंबीर असणारच मग तीही धुवून चिरून भरतावर टाका .सर्व मस्तपैकी एकत्र करून घ्या.
★ज्वारीची भाकरी आहे .बरं नसू द्या .आहो बाजरीच्या भाकरीबरोबर फारच छान लागते दोन घास जास्तच जातात.जाऊ द्या मग निदान चपाती तर आहे..
★चला आता कशाला उशीर .चवबदल रुचिपालट म्हणून करूनच पाहा बटाटा भरीत अस्सल गावरान!!
काकासाहेब वाळुंजकर
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment